मुंबई : विक्रांत आचरेकर फाऊंडेशन च्या वतीने मुंबईच्या दादर भागात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथील ‘आंबा महोत्सव’ कार्यक्रमाला भेट दिली आणि मार्गदर्शन केले. १२, १३ आणि १४ मे दरम्यान छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथे दुपारी ४ ते रात्री १० या वेळात हा आंबा महोत्सव भरविण्यात आला होता.
महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आंबा व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणं आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचे फळ रास्त दरात उपलब्ध करून देणं हे ह्या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट होते. शेतकरी आणि ग्राहक ह्यांतील दरी कमी करण्याचा हा प्रयत्न होता. आंब्या सोबतच आंब्यापासून बनलेल्या पदार्थांची चवही ह्या महोत्सवांदरम्यात ग्राहकांना चाखता आली. आंबा आणि आंब्यापासून बनलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स हे आंबा महोत्सव चे प्रमुख आकर्षण होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या दर्जेदार खाद्य पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी येथील फूड स्टॉल्सवर घेतला. याशिवाय कोकणातील भव्यदिव्य देखावे आणि त्यासभोवताली बनवलेले सेल्फी कॉर्नर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
भव्य आंब्याची पेटी ज्यात उभे राहून फोटो काढता येतो, शिवाय कोकण किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठेवलेली नाव, आंब्याच्या मोठ्या प्रतिकृती लहान थोरांसाठी उत्तम फोटो काढायची संधी मुंबईकरांना मिळाली. यावेळी उत्तमोत्तम नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मराठी रॅप कलाकारांनी रॅप च्या अंदाजात पारंपरिक मराठी गीतांची उत्तम सांगड घातली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध स्पर्धांच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिक जिंकत, आंबा आणि आंब्याच्या उत्पादनांचा आस्वाद विक्रांत आचरेकर प्रस्तुत आंबा महोत्सव मध्ये मुंबईकरांनी घेतला.