इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे अकोल्यात जाळपोळ ; एकाचा मृत्यू , २५ जणांना अटक!

14 May 2023 10:25:43
Akola Violence
 
अकोला : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात दि.१३ मे रोजी संध्याकाळी इंस्टाग्राम पोस्टवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला.दंगलखोरांनी अनेक वाहनांची तोडफोड करून त्यांना आग लावली. या हिंसाचारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.


ही घटना अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एका वृत्तानुसार ,एका व्यक्तीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुस्लिमांचे पैगंबर मुहम्मद यांच्याविषयी एक वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यामुळे अनेकजण जमले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


दरम्यान, पोलिस ठाण्यात आलेला जमाव अनियंत्रित झाला आणि त्यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली. घटनेची माहिती मिळताच दुसरा गटही पुढे आला. काही वेळातच दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हिंसाचाराच्या वेळी प्रचंड दगडफेक झाली आणि सुमारे १० दुचाकी पेटवण्यात आल्या. यादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला . अनेक लोक जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. परिस्थिती पाहता पोलिसांनी परिसरात कलम १४४ लागू केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली त्या माहितीच्या आधारेच २५ दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी १२० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या शहरातील गंगाधर चौक, पोळा चौक, हरिहर पेठ परिसरात ही घटना घडली.




Powered By Sangraha 9.0