‘लव्ह जिहाद’ हा एक सामाजिक रोग : सुदिप्तो सेन

    12-May-2023   
Total Views |
kerala

‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला. वाद-प्रतिवाद, बंदी असतानाही एक कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहिला. तसेच या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात कोट्यवधींची बॉक्सऑफिसवर कमाईदेखील केली आहे. त्यानिमित्ताने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ‘लव्ह जिहाद’ हा एक सामाजिक रोग असल्याचे विधान दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले. सेन यांच्यासोबत यावेळी चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा आणि चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांच्याशी देखील दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी मृगा वर्तक यांनी बातचित केली. यावेळी सुदिप्तो सेन यांनी या विशेष मुलाखतीत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रश्नांची अगदी सडेतोड उत्तरे दिली...

kerala

यदु विजय कृष्णन यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे पटकथा लेखन केले असल्याचा दावा केला होता. त्यानिमित्ताने मला जाणून घ्यायला आवडेल की, या कथेसाठीचे इतके खोलवर संशोधन कुणी व कसे केले?

सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की, यदुने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची पटकथा लिहिलेली नाही. तो संशोधन करणार्‍या गटाचा केवळ भाग होता. त्याला अजून एक ‘असाईन्मेंट’ दिली होती. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. सुरुवातीला असे ठरले होते की, हा चित्रपट मल्याळम भाषेत करायचा. त्यानंतर मग भाषांतराचे काम यदु करणार होता. चित्रपटाची पटकथा माझ्याच नावावर नोंदणीकृत आहे. तसेच, पटकथेचे लेखन आम्ही तिघांनी मिळून केले - मी, विपुलजी आणि सूर्यपाल सिंग यांनी मिळून ही पटकथा लिहिली आहे. त्यासाठी चार वर्षांपासून या विषयावर आम्ही संशोधन केले. त्यानंतर त्यावर एक माहितीपटही तयार केला. तरीही असं वाटलं की, हे पुरेसं नाही, या विषयावर चित्रपटच व्हायला हवा. तेव्हा विपुल यांना विचारले आणि मग काय लगोलग कामाला सुरुवातही केली. आज देशात १४२ कोटी लोक आहेत, तरीही अजून केवळ एक कोटी लोकांनीच हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट सर्वांनी पाहावा, यासाठी पुढे प्रयत्न करणार आहे.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो. चित्रपटातून एकंदरच घडलेल्या घटनांपेक्षा बदलणार्‍या मानसिकतेवर आपण भाष्य केले आहे. आपल्याकडे या मानसिक बळजबरीच्या बाबींकडे तसं दुर्लक्षच केलं जातं. या घटना घडण्यापासून रोखणंहे केवळ चित्रपटाचं काम नाही. यासाठी आपल्याला न्यायव्यवस्थेची मदतही घ्यावी लागेल, असे तुम्हाला वाटतं का? त्याअनुषंगाने मग कायद्यात काही बदल करायला हवेत का?

नक्कीच, याबाबत मी माझं वैयक्तिक मत सांगतो. मी या मुलींसोबत, ज्यांना धर्मांतर करावं लागलं, त्यांच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवला. मी या प्रकाराकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहतो. मी स्वतः मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे. या सर्वांच्या मानसिकतेकडे माझं लक्ष वेधलं गेलं. त्यांची मानसिक जडणघडण समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. मला असं वाटतं की, कोणत्याही देशात धर्मांतर अनधिकृत असायला हवं. कारण, धर्म ही तुमची सामाजिक ओळख असते. नाही म्हंटलं तरी संपूर्ण समाज तुम्हाला याच ओळखीवरून ओळखतो. तुमच्या सामाजिक-सांस्कृतिक अस्तिवावरून तुम्हाला पडताळून पाहिलं जातं. तुमचा समाज, तुमची भाषा या सर्व तुम्हाला जन्मल्या क्षणापासून तुमच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत, तसेच धर्माच्या बाबतीतही. मी बंगाली भाषिक आहे. आज मी हिंदी आणि इंग्रजी बोलतो, पण विचार प्रथम बंगालीत करतो आणि नंतर भाषांतरित करून बोलतो. शेवटी माझ्या जन्मापासून मला जे मिळालं ते महत्त्वाचं. संस्कृती, धर्म हे आपलं स्वतःच नसतं. यावर आपला मालकी हक्क नसतो. तो तुम्हाला जन्मापासून मिळतो. तुमच्या वडिलांपासून, पूर्वजांपासून मिळतो. म्हणून तुम्ही तो बदलायला नको आणि म्हणूनच मला वाटतं की, धर्मांतरावर बंदी यायला हवी. अर्थात, हे माझं वैयक्तिक मत आहे. याचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही.

‘द केरला स्टोरी’ पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते की, हा मुस्लीमविरोधी चित्रपट नसून ‘इसिस’विरोधी आहे. तरीही समाजातील एका मोठ्या गटाकडून या चित्रपटाला धर्माच्या नावाखाली विरोध होताना दिसतो. कित्येक राजकीय नेते यानिमित्ताने निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना जाहीर धमक्या देत आहेत. यामागे काय कारण असावे, असे तुम्हाला वाटते?

मी तुम्हाला जरा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनचा घटनाक्रम सांगतो. या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाल्यापासूनच गदारोळ उसळला. धमक्या, चित्रपटावर बंदीची मागणी, काही लोक तर चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून न्यायालयापर्यंत गेले. ट्रेलरसुद्धा तोवर आला नव्हता. जसजशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली, विरोधही वाढला. चित्रपट न पाहता टीका करणार्‍या लोकांचं मला खरंच हसू येतं. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. चित्रपट हिट गेला आणि प्रदर्शनानंतर विरोध काही अंशी निवळत गेला. ज्या लोकांनी टीका केली होती, त्यांनीच चित्रपट पाहून झाल्यावर कौतुक केले. काहींनी म्हंटले हा केवळ चित्रपट नाही, हे बौद्धिक आहे. आजही विरोध होतोय, परंतु विरोध तेच करतायेत ज्यांनी चित्रपट अजूनही पाहिलेला नाही. तेही असे हेकेखोर की, चित्रपट पाहणारही नाही आणि टीकाही करणार. ज्या राजकीय नेत्यांनी आम्हाला फाशी द्यायला हवी, असे म्हंटले त्यांनी चित्रपट पाहिलेला नाही. ज्या नेत्यांनी त्या त्या राज्यात या चित्रपटावर बंदी घातली, त्यांनीसुद्धा हा चित्रपट अजूनही पाहिलेला नाही.

‘द काश्मीर फाईल्स’ म्हणा, बेटी मेहमूदीचं पुस्तक ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हे चित्रपट मुस्लिमांच्या जिहादी मानसिकतेवर थेट भाष्य करतात. त्यांच्यावर तेवढी चर्चाही होते. ‘द केरला स्टोरी’हाही याच पठडीत बसणारा चित्रपट. तेव्हा, ’लव्ह जिहाद’ या संकल्पनेविषयी काय सांगाल?

चित्रपटात ’लव्ह जिहाद’ हा शब्द आम्ही कुठेही वापरलेला नाही. त्याची कारणेही म्हणा फार वेगळी आहेत. माझी आणि विपुलची याविषयी फार चर्चा झाली. ‘लव्ह जिहाद’ हा खरंतर एक सामाजिक रोग आहे. पण, तरीही हा शब्द वापरला असता तर त्यावरून पुन्हा बरचं राजकारण झालं असतं. म्हणून त्या शब्दाला आम्ही पूर्णपणे वगळून टाकलं. त्याऐवजी ‘लव्ह’ दाखवलं आणि त्यानंतर ‘जिहाद’ वेगळा दाखवला. गेल्या ७० वर्षांपासून या समस्या भेडसावतायत. परंतु, त्यांच्यावर उत्तमरित्या पडदा पडला जातो. असे काही होतच नाही, हे डोळे झाकून सांगितले जाते. परंतु जे होतंय, त्याची काही उदाहरणे एकत्र करून आम्ही या चित्रपटात मांडली आहेत. हा विषय समोर येणे गरजेचे होते. प्रबोधन होणे गरजेचे होते.

आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केरळमधील या सगळ्या घटना प्रकाशात आल्या आहेत. त्यामुळे या केसशी संबंधित असलेल्या इतर व्यक्ती, जसे तो पिझ्झावाला रमिझ किंवा त्यांची मैत्रीण जिचं चित्रपटतील नाव असिफा आहे, त्यांच्यावर काही कारवाई का करण्यात आली नसावी?

मला अजून त्याविषयी कल्पना नाही. पण, याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगतो. केरळमध्ये खरंतर या चित्रपटाचे खूप कमी प्रयोग होत आहेत. सरकारच्या निष्काळजी धोरणांमुळे बर्‍याच ठिकाणी प्रयोग होऊ दिले जात नाहीत. जिथे होतात, तिथे मात्र प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ आहे. आम्ही केरळमध्ये गेलोही नाहीत, तरीही रमिझ ज्याची भूमिका आहे, त्याच्या पिझ्झा शॉपसमोर जाऊन लोकांनी निदर्शनं केली, निषेध नोंदवला. त्यांच्याकडचा पिझ्झाही कुणी खाऊ नका, असे तिथल्या महिला-मुली इतरांना सांगत फिरत आहेत. तरीही मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, अजूनही पोलीस किंवा ‘एनआयए’ अशा संस्थांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. अजूनही ते मोकाट आहेत. अटक करणं लांबची गोष्ट, साधी चौकशीसुद्धा केली नाही. असिफासारख्या मुली ‘स्मार्ट’ असतात, त्या सहज येतात, ‘ब्रेनवॉश’ करतात आणि तेवढ्याच सफाईदारपणे निघूनही जातात.

चित्रपटावर अशा ’३२ हजार’ घटना घडल्या, म्हणून या आकड्यावरच मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यात तसे तथ्यही काही दिसून येत नाही. मग या संख्येचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल?

३२ हजार तर नव्हत्या मुली, चित्रपटात आम्ही ५० हजार असा आकडाही घेतला होता, ३० हजारसुद्धा म्हटले आहे, ७४६ पण म्हटले आहे. २१६ असा आकडासुद्धा घेतला आहे. आकडे वेगवेगळे आहेत, पण त्याच्याशी या समस्येचा काहीही संबंध नाही.

kerala

 प. बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांत या चित्रपटावर बंदी घातली गेली. न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळूनही हा चित्रपट तिथे प्रदर्शित करायला सत्ताधार्‍यांचा विरोध आहे. हे जसे निर्मात्यांचे नुकसान आहे, तसे ते त्या त्या भागातील प्रेक्षकांचेही. त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे?

एका माणसाने टेलिव्हिजन स्क्रीनवर येऊन धमक्या दिल्या. मी थिएटर तोडेन, स्क्रीन्स बंद करेन, एवढंच काय जीवितहानीच्याही धमक्या जाहीरपणे दिल्या गेल्या. हे सगळं होऊनही जेव्हा प्रशासन शांत बसतं, तेव्हा सरकारनेच बंदीचे निर्णय घेतले, तर त्यात वेगळे काय? मला वाटतं की, मी-एक सामान्य माणूस जेव्हा सरकारविरोधात काही करेन किंवा रस्त्यावर उतरून केवळ निषेध करेन, तरीही मला केवळ पाच मिनिटांत तुरुंगात डांबलं जाईल. या माणसाकडे अशा कोणत्या शक्ती आहेत, ज्याच्याविरोधात सरकार काहीही कारवाई करत नाही? पोलीस त्यांच्याविरोधात कारवाई करायला तयार नाहीत. तो व्यक्ती रोज ट्विट करतो, खुलेआम जाहीर चित्रपटाविषयी जराही कल्पना नसताना बडबड करतो, चित्रपटगृहाच्या मालकांना धमक्या देतो, हे राजकारण नक्की काय सुरू आहे, हे समजून घेतले पाहिजे. मला वाटतं, हा चित्रपट एक लढाई आहे. स्त्रियांच्या हक्काची लढाई. त्यांच्या सुरक्षेची लढाई. जर काही ठरावीक नेते या लढाईविरोधात उभे राहत असतील, तर यापुढे प्रेक्षकांनीच ठरवायचे आहे, हे कितपत बरोबर आहे की किती चूक!

विपुल शाह, निर्माता

लग्नानंतरही धर्मांतर सक्तीचे असू नये!
 
धर्मांतराबाबत माझं एकाच म्हणणं आहे, ज्यांना स्वेच्छेने दुसरा धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी तो स्वीकारावा, लग्नानंतरही धर्मांतर सक्तीचे असू नये, मुलीच्या इच्छेनुसारच तिला धर्म मिळावा. हा चित्रपट पाहताना मला त्या मुलींच्या अडचणींविषयी कळले. धार्मिक, सांस्कृतिक अनेक अडचणी. त्यामानाने मला फार कमी अडचणींचा सामना करावा लागला. शारीरिक अडचणी होत्या, चित्रीकरणादरम्यान लडाख, नुब्रा व्हॅलीमध्ये जिथे प्राणवायूची कमतरता होती, तिथे सर्व लवाजमा घेऊन काम करायचं, तर शारीरिक अडचणी होत्या, डोंगर चढायचे होते, भरपूर चालणं होत होतं, तरीही या मुलींना ज्या दिव्यातून जावं लागलं ते पाहता मी तर म्हणेन काहीही अडचणी आल्या नाहीत.

अदा शर्मा, अभिनेत्री

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.