मोटार सीटबेल्ट अलार्म स्टॉपरची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

12 May 2023 18:35:31
seatbelt

नवी दिल्ली
: ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे होत असलेले उल्लंघन लक्षात घेऊन, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए)मोटार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री करणाऱ्या, आघाडीच्या पाच ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात केंद्र सरकारने आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि मिशो या पाच ई – कॉमर्स कंपन्यांविरुद्ध ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचे आणि अनुचित पद्धतीने व्यापार केल्याचे आदेश पारित केले आहेत.

कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री होत असल्याची बाब रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पाठवलेल्या पत्राच्या माध्यमातून, ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत असलेल्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा निदर्शनाला आली. या पत्रात कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सच्या आक्षेपार्ह विक्रीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि अनुचित विक्री करणारे विक्रेते/ऑनलाइन मंचावर कारवाई करण्याची तसेच यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १३८ नुसार मोटारीमधून प्रवास करताना सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे. मात्र सीट बेल्ट न लावल्यामुळे वाजणाऱ्या अलार्मचा आवाज थांबवून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अशा वस्तूंची ऑनलाइन विक्री ग्राहकांच्या जीवनासाठी आणि सुरक्षिततेसाठी असुरक्षित आणि धोकादायक असू शकते.
मोटार विमा संरक्षणातही अडथळे
मोटार विमा संरक्षणाच्या बाबतीत दाव्याची रक्कम मागणाऱ्या ग्राहकांसाठी, मोटर सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप वापरणे देखील अडथळा ठरू शकते, कारण यामध्ये विमा कंपनी अशा क्लिप्स वापरणाऱ्या दावेदाराच्या निष्काळजीपणाचे कारण देऊन दावा नाकारू शकते. तर दुसरीकडे, प्रवाशांनी लावलेले सीट बेल्ट प्रतिरोधक म्हणून कार्य करतात आणि वाहनाची धडक झाली तर अशा परिस्थितीत संरक्षक कवच म्हणूनही काम करतात.
Powered By Sangraha 9.0