तामिळनाडूमध्ये पालीच्या नव्या प्रजातीचा शोध;

महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे योगदान

    11-May-2023
Total Views | 73
lizard species


मुंबई (प्रतिनिधी):
तामिळनाडुतील थुतुकडी जिल्ह्यामध्ये पर्णरेषी बोटांच्या पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. भारतीय संशोधकांनी या प्रजातीचा शोध लावला असुन हेमिडॅक्टिलस क्वार्टझाइटीकोलस (क्वार्टझाइट ब्रुकीश गेको) असे तिचे नामकरण केले आहे.

पृष्ठभागाला धरुन ठेवण्यासाठी आवश्यक असणारे बोटांवरील लॅमेले विभागलेले असल्यामुळे या प्रजातीचा समावेश हेमिडॅक्टिलस या पोटजातीत केलेला आहे आणि गारगोटीसदृश्य खडकांच्या (क्वार्टझाइट) अधिवासात आढळत असल्यामुळे या प्रजातीला क्वार्टझाइटीकोलस असे नाव दिलेले आहे. या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, ईशान अगरवाल, स्वप्निल पवार, सत्पाल गंगलमाले, विवेक वाघे आणि रेप्टाईल कॉन्झर्वेशन ऑफ इंडियाचे रामेश्वरम मरीआप्पन यांचा समावेश आहे.

हेमिडॅक्टिलस या पोटजातीतील पालींच्या बोटांच्या खाली असणारे लॅमेले, वृक्षांच्या पानांवर असणार्‍या रेषांशी साधर्म्य साधतात. त्यामुळे त्यांना मराठीत 'पर्णरेषी बोटांच्या पाली' असे संबोधले जाते. घरामध्ये भिंतीवर दिसणाऱ्या पाली याच पोटजातीत समाविष्ट आहेत. हेमिडॅक्टिलस क्वार्टझाइटीकोलस ही प्रजाती घरात सापडणार्‍या छोट्या आकाराच्या 'ब्रुकीश' पालींच्या गटात मोडते. जवळजवळ या प्रजाती सारखी असणारी हेमिडॅक्टीलस ग्लेडोई ही प्रजात यांच्यापासून साधारणतः ८०० किमी उत्तरेकडून मध्य भारत आणि पाकिस्तानातून ज्ञात आहेत.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन यांच्या मार्फत भारतीय द्वीपकल्पामधील पालींचे सर्वेक्षण केले जात आहे. या संशोधनादरम्यान पालीची ही प्रजात आढळुन आली आहे. या पालीच्या पाठीवरील ट्युबरकलची वैशिष्टपूर्ण रचना आणि त्यांचा आकार यावरुन प्रथमदर्शनीच ही पाल इतर कोणत्याही हेमिडॅक्टिलस पोटजातीतील प्रजातींपेक्षा अत्यंत वेगळी असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. जनुकीय संच आणि आकारशास्त्राच्या सखोल अभ्यासा नंतर ही प्रजात जगातील इतर ज्ञात असलेल्या पालींच्या प्रजातींपेक्षा स्पष्टपणे वेगळी असल्याचे सिद्ध झाले. तज्ञांच्या पुष्टीनंतर याबाबतचा शोधनिबंध जर्मनीमधून प्रकाशीत होणार्‍या व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या अंतराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून प्रकाशीत झाला आहे.
"या नव्या प्रजातीच्या पाली शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांवरील क्वार्टझाइटच्या खडकांवरती सापडतात. या टेकड्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५० मीटर पेक्षा कमी आहे. ही प्रजाती निशाचर असुन छोटे किटक हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे. क्वार्टझाईटच्या उघड्या खडकांवरती भक्ष्य पकडण्यासाठी, या पाली रात्री बाहेर पडतात आणि दिवसा खडकांच्या भेगांमधे विश्रांती घेतात. पालींच्या या नव्या शोधामुळे, शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांच्या आणि क्वार्टझाइट खडकांच्या अधिवासाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झालेले आहे."

- अक्षय खांडेकर संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121