तथागतांचा उपदेश!

11 May 2023 20:29:10
thackeray

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की, भाजप आणि शिवसेना सरकार सत्तेत राहणार. तसेच, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर आता पुन्हा सत्ता स्थापनेची संधी होती. उद्धव ठाकरे यांचा राजीनामा यापूर्वीही नेहमीच चर्चेत होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तर म्हणणेच होते की, उद्धव यांनी आपण राजीनामा देत आहोत याची चर्चा किंवा त्याबद्दल सहमती त्यांनी इतर दोन पक्षाकडून घेतली का? यावर भर म्हणून नुकतचे ’लोक माझा सांगाती’ या आत्मचरित्रामध्ये शरद पवार यांनी लिहिले की, ‘’संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.” उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला असेल? तत्कालीन राज्यपालांनी ‘फ्लोअर टेस्ट’ करायला सांगितली. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मानणारे किती आमदार आहेत, हे समोरासमोर कळले असते. पण, उद्धव यांनी त्याआधी राजीनामा दिला. असो. राज्यात उद्धव यांनी सत्ता गमावली. या अशावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार काल त्यांना भेटायला आले. नितेश म्हणा, ममता म्हणा, केसीआर म्हणा किंवा उद्धव ठाकरे यांनाही देशाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. देशाचे नेतृत्व म्हणजे मोदी-शाह यांना विरोध, तसेच हिंदू समाज आणि श्रद्धांना दुर्लक्ष करणे, हेच या सगळ्यांना वाटत असावे, असे यांच्या वर्तनातून दिसते. या सगळ्या घटनांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासकट सगळ्या विरोधी नेत्यांनी भगवान तथागताच्या उपदेशपर गोष्टीतील गाईची कथा समजून घ्यावी. तथागत गौतम बुद्धांनी शिष्यांना उपदेश करताना गाईची गोष्ट सांगितली होती. ती अशी की, एक गाय केवळ हिरवा चारा मिळावा, यासाठी उंच डोंगर चढण्याचा प्रयत्न करते. पण, तिच्याकडे ना आंतरिक उर्मी असते ना लक्ष्य ना तिची शारीरिक आत्मिक क्षमता असते. त्यामुळे हिरवा चारा खायचा म्हणत डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करतानाच ती खाली पडली. तिला खूप जखमा झाल्या. गौतम बुद्धांनी शिष्यांना विचारले यात गाईची चूक काय? शिष्य म्हणाले, ”डोंगरावर चढण्याचे कौशल्य नसताना, बळ नसताना गाईने डोंगर चढण्याचा अट्टाहास केला. दुसरे असे की, डोंगर चढायचाच होता, तर चढून जाण्यासाठीचे कौशल्य आणि बळी तिने आत्मसात केले नाही. ही तिची चूक.” काही लोक म्हणतात, गाईने डोंगर चढण्यापूर्वी पात्रता कौशल्य आत्मसात केले नाही. तसेच, काहीसे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचे किंवा त्यांच्या पक्षासंदर्भातल्या अध्यक्षपदाचे तर झाले नाही ना?

मेरा नंबर कब आयेगा?

साहेब मला माफ करा, मी तुमच्याबद्दल लिहिले की साहेबांना त्यांचा उत्तराधिकारी निर्माण करायला किंवा निवडायला जमले नाही. तसेच, आणखी काहीकाही लिहिले. यावर तुम्हीपण माझ्याबद्दल काहीतरी म्हणालात. साहेब, दयाघना, ‘जाणताराजा’ कृपाळू महाराजा, तुम्हीच फक्त माझे साहेब आहात. दया करा साहेब, दया करा, माझी मजबुरी, माझी लाचारी आणि असमर्थता समजून घ्या. तुम्ही त्या वांद्य्राच्या साहेबांबद्दल तुमच्या आत्मचरित्रामध्ये उघड उघड लिहिले. मला आणि वांद्य्राच्या साहेबांना पण वाटले की, तुमच्या आत्मचरित्राआड कमळवाल्यांनी स्वतःचे विचार मांडले? कारण, तुम्ही जे बोलता ते करायच नसतं आणि जे करता ते बोलत नाहीत. तुम्हीच केले, हे ढळढळीत सत्य असतानाही त्याबद्दल बोलण्यासाठी लोकांकडे पुरावेही सहज नसतात. त्यामुळेच तुम्ही इतके स्पष्ट वांद्य्राच्या साहेबांबद्दल लिहाल, हे शक्यच नाही, असे वांद्य्राच्या साहेबांना आणि मला वाटते. अर्थात, आम्हाला जे वाटते ते खरे आहे का? आमच्या शंकांचे निरसन करा, अशी विचारण्याची हिंमत निदान माझी तरी नाही. साहेब, तर मी तुम्हाला सांगतो, तुमचा गैरसमज झाला तो गैरसमज दूर व्हायला हवा. तुम्हाला तर माहिती आहे राणे बापलेक. सगळे पत्करले, पण या तिघांच्या समोर काय बोलावं हे मला सूचतच नाही, तर राणेंचा लेक नितेश म्हणाला, वांद्य्राच्या साहेबांनी सापाला म्हणजे मला दूध पाजले आणि मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहे. त्याने तारीखपण सांगितले की, दि. १० जूनला मी तुमच्या पक्षात येणार आहे. आता झाले का? आधीच सगळ्यांना वाटते की, मी वांद्य्राचा कमी आणि बारामतीचा निष्ठावान जास्त. त्यातच माझी खरी वाणीविचार भगिनी सुषमा हिने पण तुमचे गोडवे गायले. मी आणि ताई आम्ही दोघे तुमची माणसं आहोत, असे काही लोक सारखे म्हणत असतात. बरं ते राहू द्या साहेब, मला काय वाटते की, राणेची मुलं म्हणतात की, मी तुमच्याकडे येणार आहे. यायला तशी काही हरकत नाही माझी. पण, तिकडे आधीच भावी मुख्यमंत्र्यांची लाईन आहे. मेरा नंबर कब आयेगा? मी का येऊ तिकडे? काय म्हणता, नवाब मलिक गेल्यापासून जागा रिकामी आहे? काय म्हणता, मुंब्र्याच्या ‘सेव्ह गाझापट्टी’ म्हणणार्‍यांना कुणाची तरी सोबत हवी? एक से भले दो म्हणून?

Powered By Sangraha 9.0