कृत्रिम बुद्धिमत्ता : एक दुधारी तलवार

10 May 2023 21:50:12
ai

“मी ‘गुगल’ची नोकरी सोडली. कारण, ही कंपनी तयार करत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाच्या भयानकतेबद्दल मला बोलायचे होते. ‘एआय’मुळे संपूर्ण मानवी समाजाला धोका आहे. दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान अधिकच भयानक होत चालले आहे...” हे वक्तव्य आहे ‘एआय’चा प्रणेता, ‘गॉडफादर’ जेफ्री हिंटन यांचे. स्वतःच तयार केलेल्या तंत्रज्ञानावर त्यांनी टीका करत भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी भयानक आणि मानवाच्याही पुढे जाईल, असे वक्तव्य केले आहे. यानिमित्तच ‘एआय’ तंत्रज्ञान आणि भविष्यातील संभाव्य फायद्या-तोट्याचा घेतलेला हा आढावा..

इंग्रजीत ’अ मशीन दॅट थिंक्स’, म्हणजे ‘विचार करणारे यंत्र’ अशी ‘एआय’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची सोपी व्याख्या मानली जाते. आज नाही तर गेल्या सात दशकांपासून या संकल्पनेवर विविध स्तरांवर काम सुरू आहे. १९५० मध्ये प्रसिद्ध गणिततज्ज्ञ अलान ट्युरींग यांनी आपल्या संशोधन प्रबंधात प्रथम ‘एआय’चा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी ’ट्युरींग टेस्ट’ जगापुढे आणली होती. संगणक हा मानवी मेंदूप्रमाणे विश्लेषण करू शकतो का? हे त्यांनी यात मांडले होते. १९५६ त्यानंतर जॉन मॅकथ्री यांनी ‘एआय’चा उल्लेख एका कॉन्फरन्समध्ये केला. याच वर्षांत ‘लॉजिक थिओरिस्ट’ नामक ‘एआय सॉफ्टवेअर’ तयार करण्यात आले. १९७६ मध्ये मार्क पेफ्रॉन यांनी ‘परसेप्शन’ नामक ‘एआय टूल’ विकसित केले. त्यानंतर सातत्याने ही यंत्रणा विकसित होत गेली. आजघडीला तर ‘अ‍ॅपल सीरी’, ‘अ‍ॅमेझॉन एलेक्सा’, ‘आयबीएम वॉट्सन’ आणि याच तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित वाहनेही चालविली जातात.

‘एआय’चे ‘गॉडफादर’ जेफ्री हिंटन यांनीच ‘एआय’च्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केल्याने जगात खळबळ माजवून दिली. त्यानंतर तातडीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेतील सर्वच बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली. ‘एआय’ ही धोक्याची घंटा ठरू नये, वापरकर्त्यांची गोपनीयता हेच प्राधान्य असावे, तसेच यामुळे देशविघातक गोष्टींना खतपाणी घातले जाणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन अमेरिकन सरकारने या कंपन्यांना केले. उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांनीही गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केला. कुठल्याही प्रकारची उत्पादने ही गोपनीयतेचा भंग न करणारी, तसेच देशहिताच्या विरोधात नसावीत, असे आवाहन कंपन्यांना त्यांनी केले आहे. यानंतर ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय) आणि ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ (एएसआय) या दोन भागात ‘एआय’ विभागले गेले आहे.

मग असे हे ‘एआय’ तंत्रज्ञान आपल्यासाठी नवीन आहे का? तर नक्कीच नाही. कळत-नकळत आपण या तंत्रज्ञानाचा वापर करतही असतो. ’अ‍ॅमेझॉन एलेक्सा’, गुगल मॅप्स, विविध अ‍ॅप्समधील चॅटबॉट, फेसबुकचे ‘व्हर्च्युअल असिस्टन्स’ हे सर्वकाही ‘एआय’च आहे. मुद्दा असा की, ‘चॅट जीपीटी’ आणि अन्य संकेतस्थळे थेट वापरात आल्याने आपल्याला हे तंत्रज्ञान नवे वाटू लागले. स्मार्टहोम्स, स्वयंचलित वाहने हा सगळा ‘एआय’चाच पसारा. जर असे असेल, तर मग याचा धोका तो काय?, तर त्यासाठी जेफ्री हिंटन काय म्हणाले ते आधी नीट जाणून घेणे गरजेचे आहे.

‘एआय’ हे भविष्यात अराजकता माजवेल, हा मानवाला धोका आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अर्थात, हे खरं असेलही, पण गुगलमधून बाहेर पडल्यावर जेफ्री हिंटन हे स्वतःच केलेल्या निर्मितीबाबत आता शंका उपस्थित करुन जगाला धोक्याचा इशाला देऊ लागले. एवढेच नाही तर “हे आरोप करण्यासाठीच मी कंपनीतून बाहेर पडलो,” असेही ते म्हणाले. याचा अर्थ नेमका कसा घ्यावा? जेफ्री यांच्या मताविरोधात कंपनीत काही घडले का? जेफ्रींनी इतकी वर्षे ‘एआय’वर संशोधन केल्यानंतर अचानक त्यांना ही जबाबदारी झटकाविशी का वाटली असेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच!

आपल्याकडे अणुऊर्जेचा वापर करून वीजनिर्मितीही करता येते आणि हिरोशिमा- नागासाकीसारखी शहरंही उद्ध्वस्त केली जातात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापराची दोरी ही पूर्णपणे मानवाच्या हातातच आहे. मात्र, जेफ्री यांची भीती यापेक्षा मोठी आहे. अर्थात, आपल्याकडेही ‘एआय’मुळे नोकर्‍यांवर कुर्‍हाड कोसळेल, कंपन्या बंद पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहेच. मात्र, अर्थोअर्थी या नकारघंटेला काही अर्थ नाही. भारतात संगणक आला तेव्हाही अशाच प्रकारच्या आरोळ्या ठोकल्या जात होत्या.

मात्र, पुढे काय झाले हा इतिहास सर्वांसमोर आहे. मोबाईल आल्यानंतर ज्या प्रकारे टेलिफोन बुथ हद्दपार झाले, मात्र मोबाईल तंत्रज्ञानावर आणखी हजारो प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या तसाच प्रकार ‘एआय’च्याही बाबतीत आहे. पण, सध्या जगभरात ‘एआय’मुळे नोकरकपातीचा बागुलबुवा उभा केला जातोयं. ‘एआय’ला भारतात पूर्णपणे विकसित होण्यासाठी आणि ही पूर्णपणे विकसित झालेली यंत्रणा अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप बराच अवकाश आहे, हे इथे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे.

सुरुवातीला भारतातील कंपन्यांना ‘एआय’ तंत्रज्ञान समजून घ्यावे लागेल, ते आत्मसात करुन मग त्याची अंमलबजावणी करावी लागेल. याचा परिणाम साहजिकच स्पर्धेवरही होईलच. ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गुगल’ या बड्या कंपन्यामध्येही ‘एआय’ची स्पर्धा सुरू आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चा प्रमुख व्यवसाय हा संगणक प्रणालीनिर्मितीचा, तर ‘गुगल’चा ‘सर्च इंजिन’ आणि अन्य उत्पादने यावर चालवण्याचा. आता मात्र, ‘मायक्रोसॉफ्ट’ ‘एआय’द्वारे ‘गुगल’ला थेट टक्कर देऊ इच्छित आहे. ‘गुगल’च्या ‘सर्च इंजिन’मध्येही कुठल्याही प्रकारचे मोठे बदल गेल्या दशकभरात झालेले नाहीत. याउलट ‘मायक्रोसॉफ्ट’ने ‘चॅट जीपीटी’च्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘गुगल’नेही ‘चॅट बॉट’ आणले. मात्र, ‘गुगल’ला ‘चॅट जीपीटी’सारखी घोडदौड जमली नाही. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी मूर्त रुप घेईल. हे तंत्रज्ञान ही दुधारी तलवारीप्रमाणेच काम करेल. तेव्हा,कितीही अद्ययावत तंत्रज्ञान असले तरीही त्याची दोरी ही मानवाच्याच हातात असणार आहे. त्याचा वापर विकासासाठी होईल की विद्ध्वंसासाठी, हे भविष्यात समोर येईलच.

Powered By Sangraha 9.0