ईशनिंदेची मानवी ईर्ष्या

10 May 2023 20:53:48
nigam

त्या 
 व्यक्तीला लोकांनी जबर मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतरही जमावाने त्यांच्या निष्प्राण देहाला खेचत-ओढत विटबंना करणे सुरू ठेवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण, लोकांपुढे त्यांचे काहीएक चालले नाही. पण, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, लोकक्षोभ पाहात तो दाखल केलेला गुन्हाही रद्द केला. कोण आहे ती व्यक्ती? कुठली घटना आहे ही? तर ती व्यक्ती आहे, मौलाना निगार आलम आणि घटना आहे पाकिस्तानची!

पाकिस्तानमध्ये ‘तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाची सभा होती. राजकीय पक्षाची सभा म्हटली की, या सभेत पक्षाच्या सर्वेसर्वांची स्तुती केली जातेच. या पक्षाचे नेता आहेत इमरान खान. त्यामुळे सभेत इमरान खान यांच्याबद्दलचे प्रेम-आदर वगैरे वगैरेंवर पक्षाचे पदाधिकारी किंवा लाभार्थी किंवा लाभेच्छुक बोलणारच, यात काही शंकाच नव्हती. सभा सुरू झाली आणि मौलाना निगार आलम याने म्हंटले की, ”मी इमरान खान यांंचा तितकाच सन्मान करतो जितका मोहम्मदांचा सन्मान करतो.” मौलाना निगार आलमने इमरान यांना खूश करण्यासाठीच हे वाक्य म्हंटले हे नक्की! राजकारणात हे नवे नाही. मात्र, सभेला जमलेल्या लोकांना मौलाना निगार आलमने मोहम्मदांची तुलना इमरानशी केली असे वाटले. मोहम्मदांची तुलना किंवा बरोबरी माणसाबरोबर कशी केली? ही ईशनिंदा आहे, असे एका क्षणात ठरवत जमावाने मौलाना निगार आलमवर हल्ला केला. हल्ला इतका हिंसक होता की,त्यातच तो अल्लाला प्यारा झाला!

बिचारा मौलाना. पाकिस्तान म्हणा, इराण म्हणा किंवा इतर अशी अनेक मुस्लीम राष्ट्रे म्हणा, तिथे ईशनिंदेचा कायदा कडक आहे. कुणाला वाटले की, एखाद्या माणसाच्या बोलण्यामुळे ईशनिंदा होते, तर त्या माणसाच्या तक्रारीवर समोरच्यावर गुन्हा दाखल होतो. याबाबत खूप जणांचे म्हणणे आहे की, मुस्लीम राष्ट्रांमध्ये गैरमुस्लिमांना अद्दल घडवण्यासाठी या कायद्याचा सर्रास वापर केला जातो. पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू, ख्रिश्चन समाजावर कायमच ईशनिंदा कायद्याची टांगती तलवार असते. त्यामुळे पाकिस्तानातील बहुसंख्याकांचा कोणताही अत्याचार सहन करण्याची या अल्पसंख्याकांची मानसिकताच तयार झाली आहे. या अल्पसंख्याकांना वाटते की बहुसंख्याक लोकांच्या अपराधाबद्दल किंवा शोषणाबद्दल प्रश्न उपस्थित केला, तर ते मिळून ठरवून आपल्यावर ईशनिंदेअंतर्गत गुन्हा लादू शकतात. काय ही अल्पसंख्याकांची स्थिती!

या सगळ्या परिक्षेपात आपल्या भारतात तर अल्पसंख्याकांची स्थिती सोन्याहून पिवळी म्हणायला हवी. कायदा-सुव्यवस्था समाजभान आणि इतर सगळ्याच आयामात भारतीय अल्पसंख्याकांची स्थिती आणि भूमिका काय आहे, याचा मागोवा घेतला, तर काय चित्र दिसेल? म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवरील पलायनाविरोधात मुंबईतील हिंसक आंदोलन किंवा दिल्लीतील शाहीनबागेचे आंदोलन आणि इतरही अनेक घटनांचा परामर्श घेतला, तर यावर एक स्वतंत्र लेखमाला होईल. बरं देशातल्या बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धा तर नित्यनियमाने पायदळी तुडवण्यासाठीच असतात, असेही काहीजणांना वाटतच राहते. देव तर देव, देशाच्या फुटीरतेचेही खुलेआम समर्थन करणारे देशात आहेत. पण, यांचे सगळे चाळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याआड सुखनैव चालतात.

असो. ‘हिजाब’ मुद्दा बनवून शेकडो निष्पापांना फासावर लटकवणार्‍या इराणमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. युसूफ मेहराद आणि सदरउल्ला यांना कालपरवाच ईशनिंदेच्या गुन्ह्यासाठी फासावर लटकावण्यात आले. हे दोघे ‘टेलिग्राम’ अ‍ॅपवर ’अंधविश्वास आणि धर्माची आलोचना’ या विषयावरील संदेशामध्ये सहभागी झाले होते. या गुन्ह्यासाठी या दोघांना २०२० साली तुरुंगात डांबले गेले. ’इराण ह्युमन राईट्स’च्या मते, इराणमध्ये यावर्षी म्हणजे जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये २३० जणांना ईशनिंदा गुन्ह्यासाठी मृत्युदंडाची सजा दिली गेली. काही लोकांना वाटते की, क्रूर प्रशासनाबद्दल आणि बेलगाम कारवायांबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍यांना इराणचे सरकार ऐनकेनप्रकारे ईशनिंदेबाबत गुन्हेगार ठरवते. कारण, ईशनिंदा केली म्हणून मृत्युदंड दिला की, इराणी नागरिक मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करणार नाहीत. ईशनिंदेआड इराणी सरकारचा जननेतृत्वाला संपवण्याचा एक कटच आहे. किती भयंकर आणि लांछनास्पद आहे. दगडातही देव पाहणार्‍या आपल्या सारख्यांना हे सगळे तर कल्पनेपलीकडचे आहे!

९५९४९६९६३८

Powered By Sangraha 9.0