मायग्रेनमुक्तीचा सकारात्मक मंत्र

01 May 2023 21:25:06
miagren

स्वतःला मायग्रेनपासून मुक्त करून, तुम्ही अधिक सकारात्मक मानसिकता जोपासू शकता आणि वेदनांबद्दल तुमच्या शरीराच्या प्रतिसादावर संभाव्य प्रभाव टाकू शकता. मायग्रेन-मुक्त जीवनाचा आनंद लुटण्याचा, तुम्हाला आवडत असलेल्या क्रियाकलापांमध्ये गुंतून राहण्याचा आणि आनंदी व निरोगी वाटण्याचा सकारात्मक स्व-संवादाने स्वतःला प्रोत्साहित करा.

मला आता मरायचे नाही. मला अजूनही डोकेदुखी आहे. मला डोकेदुखीने स्वर्गात जायचे नाही, मला त्याचा आनंद घेता येणार नाही.” डग्लस अ‍ॅडम्स या सुप्रसिद्ध लेखकाने उद्धृत केलेले हे एक वाक्य, डोकेदुखी किती भयानक असू शकते, याचे वर्णन करण्यासाठी पुरेसे आहे. मायग्रेन तसेच अर्धी डोकेदुखी हा सर्वांत सामान्यपणे आढळणारा डोकेदुखी विकारांपैकी एक.

आजपर्यंत जगातील पाच ते 12 टक्के लोकांमध्ये हा त्रास आढळतो. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने मायग्रेनला सार्वजनिक आरोग्याचा तातडीने लक्ष देण्यास भाग पडणारा महत्त्वाचा आजार म्हणून सूचीबद्धही केले आहे. योग्य आधुनिक वैद्यकीय उपचार असतानाही, काही मायग्रेन रुग्णांना सतत डोकेदुखीचा अनुभव येत राहिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते. मायग्रेन अटॅकशी संबंधित वेदना आणि कार्यात्मक दुर्बलता याचा वैयक्तिक अनुभव पाहिला, तर त्यात विविधता दिसून येते, ज्यामध्ये डोकेदुखीच्या अटॅकची वारंवारता आणि तीव्रता समाविष्ट आहे. जुन्या वैद्यकीय सिद्धांतांनुसार, मायग्रेनची लक्षणे मेंदूतील रक्त प्रवाहातील चढउतारांमुळे असू शकतात. आज मायग्रेन पीडितांच्या वेदना संवेदनशीलतेमध्ये शरीरातील रासायन आणि हार्मोन्स, जसे की, सेरोटोनिन आणि इस्ट्रोजेन, बहुतेकदा महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मोठ्या प्रमाणावर समजले जाते.

एक सामान्य मायग्रेन बहुधा डोक्याच्या एका बाजूला प्रभावित करतो, त्यामध्ये एक तीव्र, धडधडणारी वारंवार होणारी अर्धी डोकेदुखी असते आणि तीक्ष्ण वेदनांमुळे अनेकदा मळमळ, उलट्या, डोळ्यासमोर दृश्य गोंधळ किंवा सोबत आभा (ऑरा) दिसून येतो. ‘क्लासिक मायग्रेन’ हा दृश्य आभासांसह एक सामान्यपणे आढळणारा मायग्रेन आहे. ज्यामध्ये अंधुक दृष्टी, गोंधळलेले विचार, थकवा, चिंता आणि बधीरपणा किंवा शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे यांचा समावेश होतो. मायग्रेनसाठी अद्याप कोणतीही प्रायोगिक चाचणी नाही. म्हणूनच जे लोक दीर्घकालीन वेदनांसह मायग्रेनची तक्रार करतात, त्यांच्यावर कोणी सहसा विश्वास ठेवत नाही किंवा कामाच्या वातावरणात ते नाट्यमय अतिशयोक्ती करीत असल्याचे मानले जाते.

मायग्रेनचा आजार फक्त एक डोकेदुखी म्हणून नाकारला जातो. तरीही त्यांच्यात एखाद्या व्यक्तीचे जीवन, नातेसंबंध आणि सामान्य समाधान गोष्टीत व्यत्यय आणण्याची क्षमता आहे. तीव्र मायग्रेनग्रस्त लोक अपस्मार असलेल्या लोकांइतकाच सामाजिक कलंक व ‘स्टिग्मा’ अनुभवतात. मायग्रेनग्रस्त लोक सहसा असा मानतात की, त्यांच्या डोकेदुखीमुळे त्यांची मित्रमंडळी आणि सहकार्‍यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येईल किंवा त्यांना वारंवार काम चुकवावे लागत असल्याने त्यांची विधायकता तरी कमी होईल. कलंकाचे असे व्यक्तिगत अनुभव आरोग्यासाठी घातक असतात. शिवाय, सामाजिक नातेसंबंध गमावण्याइतके हानिकारक सुद्धा असू शकतात. मायग्रेनसह जगणे व्यक्तीसाठी खूप कठीण असू शकते आणि जेव्हा तुम्ही मायग्रेनसह जगता, तेव्हा मनात नकारात्मक विचार पिंगा घालत असतात यात आश्चर्यकारक असे काही नाही. त्यांना ‘विचार सापळे’ म्हणता येईल. ते इतर मानसिक अनिष्ट परिणामांसह चिंता आणि नैराश्याच्या भावनांना कारणीभूत ठरू शकतात किंवा आयुष्याची गुणवत्ता खराब करू शकतात.

यात आनुवंशिकता आणि पर्यावरणीय घटक विशेष भूमिका बजावतात. मायग्रेन किंवा डोकेदुखीची मुळात भावनिक कारणे आहेत आणि जेव्हा तुम्हाला त्यावर उपाय सापडतो, तेव्हाच ते व्यवस्थापित केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने त्यांच्या भावनांचे व्यवस्थापन करणे आणि नकारात्मक भावनांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खचून न जाणे खूप महत्त्वाचे आहे. अपराधीपणाची किंवा नुकसानीची भावना अनेकदा मायग्रेनला (अर्धी डोकेदुखी) कारणीभूत ठरू शकते आणि सतत डोकेदुखी होऊ शकते. बालपणातील सर्व प्रकारचे अत्याचार आणि गैरवर्तन मायग्रेनशी निगडित असल्याचे दर्शविले गेले असले तरी, भावनिक अत्याचार हा सर्वांत मजबूत आणि लक्षणीय दुवा आहे. बालपणात पालकांच्या घरगुती हिंसाचाराच्या सतत संपर्कात आल्याने मायग्रेनचा धोका वाढू शकतो. अनेक रुग्णांमध्ये लहानपणी झालेले शारीरिक शोषण मायग्रेनचा वाढलेल्या कालावधी आणि डोकेदुखीच्या तीव्रतेशी संबंधित असलेले आढळून येते. तीव्र मायग्रेन असलेल्या रुग्णांच्या तुलनेत दीर्घकालीन मायग्रेन असलेल्या रुग्णांमध्ये रागीटपणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असल्याचेही दिसून आले आहे.

मायग्रेनमध्ये त्याच-त्याच तणावजन्य विचारांचा रवंथ करण्याची लोकांची सवय दीर्घकालीन आजाराचा एक परिणाम असू शकतो. तथापि, जे लोक मायग्रेनला संवेदनाक्षम आहेत, त्यांच्यामध्ये आजार येण्यापूर्वीपासूनच विचारांचा रवंथ करण्याचा स्वभाव जास्त प्रमाणात दिसून येतो. जर तुम्हाला मायग्रेनसोबतच्या वेदना आणि अस्वस्थतेबद्दल अनुभव असेल, जेव्हा वेदना तुम्हाला दुर्बल करतात. तेव्हा, नकारात्मक भावना मनात येणे अशक्य नाही. तुम्ही अनेक गोष्टींवर प्रश्न विचारू लागता, असे का घडते? ते तुम्हीच का? हे इतके वेदनादायक का आहे? अशी अनेक कारणे मनात असू शकतात. तुमच्या मनाला थकवू शकतात. या विचारांमुळे येणारा असह्य तणाव मायग्रेनच्या आणखी अटॅक येण्यास कारणीभूत ठरतो. सकारात्मक विचार करण्याच्या शक्तीचा उपयोग करून, मायग्रेनग्रस्त रुग्ण त्यांच्या एकूण आरोग्यामध्ये संभाव्य सुधारणा करू शकतात आणि त्यांच्या मायग्रेनची वारंवारता आणि तीव्रता कमी करू शकतात. अर्थात या सगळ्या त्रासात वैद्यकीय उपचार वेळोवेळी करायला हवेतच.

स्वतःला मायग्रेनपासून मुक्त करून, तुम्ही अधिक सकारात्मक मानसिकता जोपासू शकता आणि वेदनांबद्दल तुमच्या शरीराच्या प्रतिसादावर संभाव्य प्रभाव टाकू शकता. मायग्रेन-मुक्त जीवनाचा आनंद लुटण्याचा, तुम्हाला आवडत असलेल्या क्रियाकलापांमध्ये गुंतून राहण्याचा आणि आनंदी व निरोगी वाटण्याचा सकारात्मक स्व-संवादाने स्वतःला प्रोत्साहित करा. ‘मी निरोगी आहे, माझ्या मायग्रेनवर माझे नियंत्रण आहे, किंवा मी या वेदनांवर मात करू शकेन,’ यासारखी विचारांची पुन्हा पुन्हा पुष्टी केल्याने तुमचा मेंदू क्रियाशील होतो आणि अधिक सकारात्मक मानसिकतेला चालना मिळते. नकारात्मक विचारांवर सकारात्मक प्रेरणेने मात केल्याने तुम्हाला तणावपूर्ण परिस्थितीत काम करण्यास मदत होते.

 तुम्हाला प्रसन्न करणार्‍या आणि निवांत वाटण्यास मदत करणार्‍या क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा. आवडता छंद असो, निसर्गात वेळ घालवणे असो किंवा प्रियजनांशी संपर्क साधणे असो, तुम्हाला अधिक सकारात्मक दृष्टिकोन राखण्यात आणि तणावाची पातळी कमी करण्यात मदत करू शकते. नियमित माइंडफुलनेस, योगा, ध्यान, विश्रांती आणि भावनांचे नियमन यासारख्या स्व-जागरूकतेच्या पद्धती मेंदूला तणावपूर्ण विचार, नकारात्मक भावना आणि परिस्थितींबद्दल कमी प्रतिक्रियाशील होण्यासाठी तयार करण्यात मदत करतात. यामुळे पीडितांचा वेदनांचा अनुभव सकारात्मकपणे सुधारतो, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास आणि त्यांच्या वेदना प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत होते. तुमच्या मनाच्या सामर्थ्याचा उपयोग करून, तुम्ही मायग्रेन-मुक्त जीवनाच्या शोधात नवीन शक्यता उघडू शकता.

डॉ. शुभांगी पारकर

Powered By Sangraha 9.0