पलावातील फ्लॅटधारकांना मालमत्ता करात सवलत द्या

09 Apr 2023 22:15:28
Raju Patil

डोंबिवली : कल्याण ग्रामीणमध्ये पलावा येथील २५ हजार फ्लॅटधारकांना ‘आयटीपी’ प्रकल्पात समाविष्ट करण्याच्या मागणीनंतर यात श्रेयासाठी एक स्थानिक लोकप्रतिनिधी राजकारण करीत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला होता. त्यानंतर रविवारी फ्लॅटधारकांसोबत आमदार राजू पाटील यांची बैठक पार पडली. यावेळी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचे संकेत आ. पाटील यांनी दिले असून मनपा प्रशासनाला १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. तसेच, नागरिकांची समितीदेखील गठीत करण्यात येणार असल्याचे सांगितले. पलावा कासा रिओ क्लब हाऊसमध्ये रविवारी पार पडलेल्या फ्लॅटधारकांच्या बैठकीला मोठ्या संख्येने फ्लॅटधारक उपस्थित होते.

पलावा येथील प्रकल्प हा आयटीपी प्रकल्प आहे. या प्रकल्पधारकांना मालमत्ता करात ६६ टक्के सवलत दिली गेली पाहिजे. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून या फ्लॅटधारकांना मालमत्ता वसुलीकरिता जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. या फ्लॅटधारकांकडून महापालिकेने ४० कोटी रुपये आधीच वसूल केले आहेत. हे जास्तीचे पैसे परत करावे अथवा ते मालमत्ता कराच्या बिलात सामावून घ्यावे, अशी मागणी आहे. या मागणीला घेऊन नुकतीच आ. पाटील यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली होती. ही मागणी प्रशासनाकडून मान्य करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. मात्र, एक स्थानिक लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणत आहे. हा दबाव श्रेयासाठी टाकला जात असून या कामाचे श्रेय मनसे आमदारांना मिळू नये, हा त्या मागचा उद्देश आहे. हीच बाब रविवारी पार पडलेल्या बैठकीत फ्लॅटधारकांसमोर आमदार पाटील यांनी स्पष्ट केली. प्रशासनाला या प्रकरणी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा काय करायचे ते ठरविले जाणार आहे. तसेच फ्लॅटधारकांची एक समिती स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे हीच मागणी लावून धरली जाणार आहे.

सदरील बैठकीत अनेक फ्लॅटधारकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. पलावामध्ये बिल्डरकडून ज्या सोयी सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे होत्या त्या पुरविल्या गेलेल्या नाहीत. जवळ असलेली देसाई खाडी प्रदूषित झाली आहे. त्या प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पलावा जंक्शन येथे वाहतूककोंडी होत आहे. पलावा उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. ते केव्हा मार्गी लागणार? या परिसरात काही समाज कंटकाकडून अवैध धंदे केले जात आहे. नशेबाजांकडून नागरिकांना रात्रीच्या वेळी त्रास दिला जातो. दिवा-पनवेल मार्गावर रेल्वे लोकल गाड्या सुरु कराव्यात. केडीएमसीच्या बसेस वाढविण्यात याव्यात आदी समस्यांचा पाढाच वाचला. या प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जाईल. मात्र, सर्वात प्रथम मालमत्ता कराचा विषय मार्गी लावला जाणार असल्याचे मनसे आमदार पाटील यांनी नागरिकांना आश्वासित केले.



Powered By Sangraha 9.0