मुंबई : ‘लव्ह जिहाद’चा वाढता विळखा आणि मोबाईलचे व्यसन हे दोन विषय एकमेकांना संलग्न असून त्यावर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवार, दि. 9 एप्रिल रोजी मयुरेश्वर प्रतिष्ठानतर्फे हशू अडवणी मेमोरियल स्कूल, गोवंडी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात सुमारे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.
मयुरेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने ‘चला पारंपरिक खेळ खेळू’ हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी पाल्य-पालकांसाठी जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ या विषयावर उपसंपादिका योगिता साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’चे धोके आणि त्यासाठी सावधानता कशी बाळगावी, यावर अत्यंत सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
योगिता साळवी म्हणाल्या की, “किशोरवयीन पाल्यांना ‘लव्ह जिहाद’चा जेवढा धोका आहे, तितकाच धोका ‘ड्रग्स जिहाद’चाही आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्स जिहाद’ हे फार मोठे संकट येऊन ठेपले आहे. त्यातून मुक्तीसाठी संस्कार, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आपापसातील स्नेहमय नाते, कुटुंबाकडून मिळणारे सुरक्षित संस्कारमय वातावरणच पाल्यांना या विळख्यातून वाचवू शकते,” असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अॅड. केतकी वैद्य यांनी ‘मोबाईलचे व्यसन आणि दुष्परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ‘आपला कट्टा’ संस्थेचे पंकज भोसले आणि ममता भोसले यांनी मुलांना ‘पारंपरिक खेळ आणि इतिहास’ या विषयावर प्रात्यक्षिक आणि प्रबोधन केले. हशू अडवाणी मेमोरियल स्कूलच्या अश्विनी प्रधान यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.या पूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मयुरेश्वर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मनीषा काळे आणि प्रतिष्ठानचे सचिव राजेश काळे यांनी केले.