‘डिजिटल भारता’च्या वाटचालीत ‘सायबर सुरक्षा’ महत्त्वाची

09 Apr 2023 22:15:46

राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

मुंबई : “एकीकडे भारताची वाटचाल ‘डिजिटल इंडिया’कडे होत असताना देशातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण वाढत आहे. लहान मुले, महिला तसेच सामाजिक व आर्थिक संस्थादेखील सायबर गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. अशावेळी विद्यार्थी, युवा पिढी तसेच, पालकांनी सायबर गुन्ह्यांबाबत सजग व जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे ‘सायबर’ विश्व सुरक्षित ठेवणे केवळ पोलिसांचीच नव्हे, तर पालक, शिक्षक व एकूणच समाजाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी रविवार,  केले.
 
मुंबई पोलीस सायबर शाखा व ‘इंडियन मर्चंट्स चेंबर’च्या (आयएमसी) महिला शाखेच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सायबर सेफ मुंबई’ पोस्टर स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रविवारी राजभवन येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते आदर्श गौतम, जितेंद्र प्रजापती, मारिया शेख, जहाविका मकवाना, प्रीत खोसला व उनेझा सय्यद या पोस्टर स्पर्धा विजेत्यांना तसेच, अन्य सहा उपविजेत्यांना ‘टॅब’ तसेच, पदक प्रदान करण्यात आले.

यावेळी ‘आयएमसी’ महिला शाखेच्या अध्यक्ष रोमा सिंघानिया, ‘आयएमसी’चे अध्यक्ष अनंत सिंघानिया, ‘आयएमसी’च्या उपाध्यक्ष अमृता सोमैया, ’आमची मुंबई, सुरक्षित मुंबई’ उपक्रमाच्या संयोजिका भारती गांधी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक उपस्थित होते. पोस्टर स्पर्धेत विविध शाळांमधील तीन लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
‘सायबर सुरक्षे’वर जनजागृती गरजेची
 
“आज ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. पासवर्ड मागून खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याचे प्रकार वाढत आहेत. नोकरी, बक्षीस, विजेचे बिल भरण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. महिला व लहान मुलांच्या शोषणाचेदेखील प्रकार घडत आहेत. गेल्यावर्षी देशात ’सायबर सुरक्षे’संबंधी १३.९१ लाख घटना घडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शाळांमध्ये तसेच, महाविद्यालयांमध्ये ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर व्याख्याने व जनजागृती झाली पाहिजे,” असे सांगताना “देशाची सार्वभौमता जशी महत्वाची तितकीच सायबर सार्वभौमतादेखील महत्वाची आहे. अश्यावेळी प्रत्येक व्यक्तीला ‘सायबर योद्धा’ बनावे लागेल,” असेही राज्यपालांनी सांगितले.
 
जामताराला भेट आणि गुन्हेगारांची मदत घेण्याची सूचना

देशातील ’सायबर’ गुन्ह्याचे केंद्र असलेल्या झारखंड राज्यातील जामतारा या गावी मी झारखंडचे राज्यपाल असताना भेट दिली होती. ’सायबर’ गुन्हे करणारी मुले बरीचशी अशिक्षित होती. त्या गावात मोबाईल रेंजसाठी झाडावर चढावे लागते, असे असूनही ते ठिकाण ‘सायबर’ गुन्ह्यांचे केंद्र बनले. या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘सायबर’ गुन्हेगार मुलांचे पुनर्वसन करून त्यांची पोलिसांनी मदत घेतल्यास सायबर गुन्हे थांबविण्यास मदत होईल, अशी सूचना आपण तेथील मुख्यमंत्र्यांना केली.
 
-रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

सायबर फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्नशील
 
‘सायबर’ गुन्ह्यांमधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलीस तयार करीत असलेली मार्गदर्शक प्रणाली राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर लागू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करू. शाळा तसेच, महाविद्यालयांमध्ये ‘रॅगिंग’, धाकदपटशाही व लैंगिक छळणूक थांबावी यादृष्टीनेदेखील प्रयत्न केले जावे. तसेच, ‘सायबर’ सुरक्षित मुंबई पोस्टर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना पोलीस कॅडेट बनवून ‘सायबर सुरक्षे’च्या कार्याशी जोडून घ्यावे.
 
- डॉ नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

‘सायबर’ गुन्हे दररोज घडत आहेत. आज प्रत्येकाच्या परिचयाची कुणीतरी व्यक्ती ‘सायबर’ गुन्ह्यांची शिकार झालेली आढळते. मुंबईत पाच ‘सायबर’ पोलीस ठाणी आहेत आणि ९३ पोलीस ठाण्यांमध्ये ‘सायबर’ पोलीस कक्ष आहे, तरीदेखील ते अतिशय कमी पडत आहेत. ‘सायबर’ गुन्हे ही अतिशय गंभीर समस्या असून प्रत्येक नागरिकाने ‘सायबर सुरक्षे’बाबत जागरूक होणे आवश्यक आहे. ‘सायबर’ गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शक प्रणाली (एसओपी) आपण एक महिन्यात तयार करू.
 
-विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, मुंबई



Powered By Sangraha 9.0