"आता चालच बिघडवायचीय" असा जरी डायलॉग असला तरी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचत आणण्याची जादू पुन्हा एकदा नागराज मंजुळेच्या घर बंदूक बिरयाणी (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाचे नाव जरी काहीसे वेगळे असले तरी कथा काहीशी साधीच आहे. परंतु एका सामान्य कथेची उत्कंठावर्धक अशी मांडणी करण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत आवताडे यांना काही प्रमाणात नक्कीच यश आले आहे. आत्तापर्यँत केवळ बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या अभिनेत्यांनी साकारलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची मिळणारी दाद नागराज मंजुळेला मिळवण्यात यश आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील ‘कोलागड’ परिसरातील नक्षलवादी लोकांचा एक गट आणि त्याच गावातील एका ढाब्यावर काम करणारा आचारी. यांच्या जोडीला पुण्याहून बदली झाल्याने या परिसरात नवीनच आलेला एक पोलिस अधिकारी यांच्याभोवती हे फिरणारे हे कथानक. . खरं तर घर, बंदूक आणि बिरयानी या तीन गोष्टींचा नेमका संबंध चित्रपटासोबत कसा आहे याचा अंदाज बांधणे काहीसे कठीणच. परंतु या तीन गोष्टींचा चित्रपटाच्या कथेत आणि पटकथेत करण्यात आलेला वापर पाहिल्यावर आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. नक्षलवादी संघटनेचा मुख्य म्हणजेच कमांडो असणारा पल्लम (सयाजी शिंदे), हाताला अगदी सुग्रणींसारखी चव असणारा आणि ढाब्यावर काम करणारा आचारी राजू (आकाश ठोसर) आणि निडर आणि डॅशिंग असा पोलिस अधिकारी राया पाटील (नागराज मंजुळे). एकाचे कुटुंब तुटलेले, एकाचे कुटुंब कुठेतरी तुटण्याच्या मार्गावर असलेले आणि एक स्वतःचे कुटुंब तयार करण्यासाठी करत असलेला संघर्ष. या तिघांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारी आवाहने आणि त्यांच्यातील चकमकी यामध्ये हे कथानक गुंफण्यात आले आहे. अगदी छोट्या प्रसंगातून भाष्य करणे ही खरंतर नागराज मंजुळेंची खास शैली आणि या चित्रपटातही ही सांगड लेखक नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांना अगदी अचूक जमले आहे.
चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत आणि काही ऍक्शन सीन्स. एखाद्या बॉलीवूड आणि टॉलिवूडच्या अभिनेत्याच्या एंट्रीला प्रेक्षकांची दाद मिळावी अशी दाद राया पाटीलच्या म्हणजेच नागराज मंजुळेच्या एंट्रीला मिळत आहे. चित्रपटातील नागराज मंजुळेंचे ऍक्शन सीन्स पाहताना आपल्याला कुठेतरी सिंघम चित्रपटाची आणि अजय देवगणची आठवण आल्याशिवाय रहात नाही. प्रत्येक ऍक्शन सिन हा आपल्याला बॉलीवूड मध्ये होऊन गेलेल्या चित्रपटांची कुठेतरी आठवण करून देतेच. परंतु ए.वी. प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने चित्रपटाला नक्कीच उचलून धरले आहे. काही ठिकाणी चित्रपटाचे कथानक पुढे घेऊन जाण्यास मदत करणारे संगीत काही ठिकाणी अगदी उगाच वापरले असल्याचा अनुभव देऊन जातो. पण या सर्वांच्या जोडीला विक्रम अमलादी यांचे छायाचित्रीकरणाची जोड मिळाली आहे हे नक्की. चित्रपटाचा विषय जरी गंभीर असला तरी कथेची हलकी फुलकी मांडणी आणि त्यांना विनोदाचा मिळालेला तडका हा मसाला मात्र बिरयाणीमध्ये योग्य प्रकारे मिसळला आहे.
चित्रपटाचा मुख्य कणा म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे. केवळ मराठीतच नव्हे तर इतर भाषिक चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सयाजी शिंदेनी या चित्रपटातीलही पल्लम च्या भूमिकेला परिपूर्ण यश दिले आहे. मजेशीर पण तितक्याच क्रूर पल्लमचे पात्र सयाजीनी अगदी सहज निभावले आहे. अभिनयासोबतच डायलॉग आणि विनोदाची भट्टी सयाजी शिंदेनी अशी काही जुळवली आहे की बिरयाणी शिजल्यावाचून राहातच नाही. चित्रपटातील इतर दोन मुख्य भूमिका म्हणजे पोलीस अधिकारी राया पाटील आणि आचारी राजू. एका निडर आणि डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याचे व्यक्तिमत्त्व उभे करण्यात नागराज मंजुळेला नक्कीच यश आले आहे. परंतु अभिनयाच्या बाबतीत नागराज मंजुळे नक्कीच काहीसा मागे पडल्याचे पाहण्यास मिळते. निडर आणि डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्वाला आवश्यक असणारा अभिनय पुरवण्यात नागराज मंजुळे कुठेतरी कमी पडला आहे. आकाश ठोसर साकारत असलेल्या आचारी राजूच्या भूमिकेला चित्रपटात जास्त वाव नसला तरी काही सीन्समध्ये आकाश उजवा ठरला आहे. परंतु आपली अभिनयाबाबत आकाशकडून असेलेली अपेक्षा मात्र पूर्ण होत नाही. तर चित्रपटातील सहाय्यक कलाकारांचा अभिनय देखील वाखाणण्याजोगा आहे.
एवढे सगळे जरी जुळून आले असले तरी आताच्या ३० सेकंदाच्या जगात या चित्रपटाची पावणे तीन तासाची लांबी चित्रपटासाठी एक अडचण नक्कीच ठरू शकते. चित्रपटाला कमर्शियल बनवण्याच्या नादात चित्रपटातील काही सीन्स ताणण्यात आल्याने चित्रपट काही ठिकाणी रेंगाळतो. तर चित्रपटाचा क्लायमॅक्स देखील कुठेतरी अधिक ताणल्यामुळे त्याचा प्रभाव म्हणावा तसा प्रेक्षकांवर पडत नाही. इतर चित्रपटांमधून नक्षलवादी संघटना आणिया संघटनेच्या लोकांबद्दल जशी सहानुभूती निर्माण करण्यात येते तसाच काहीसा प्रयत्न या चित्रपटातूनही करण्यात आला आहे. तर आजकाल बऱ्याच चित्रपटामधून सिक्वलची करण्यात येणाऱ्या घोषणेची स्ट्रॅटेजी नागराज मंजुळे यांनी देखील वापरल्याचे दिसते. परंतु चित्रपटातील पोलिसांनीच एकमेकांवर गोळ्या झाडण्याचा सिन काहीसा केविलवाणा वाटतो. तर काही सिन हास्यास्पद वाटतात. अशा गंभीर कथानकाची एक वेगळी बाजू नागराज मंजुळे नक्कीच सादर करू शकले असते. परंतु या काही बाबी वगळल्यास ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट दर्जेदार अभिनयासोबतच विनोदाचे टायमिंग, चित्रपटाच्या मांडणीसाठी आणि दिग्दर्शनासाठी तरी हा चित्रपट एकदा चित्रपटगृहांत जाऊन बघणे आवश्यक आहे.
चित्रपट - घर बंदुक बिरयानी
दिग्दर्शक - हेमंत अवताडे
कलाकार - नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी
रेटिंग - ३ स्टार्स आणि एक स्टार अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अभिनयासाठी
(समिक्षक - शेफाली ढवण)