मुंबई (प्रतिनिधी) : आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ‘गज उत्सव-२३’ चे उद्घाटन दि.७ एप्रिलला केले गेले. भारतातील हत्ती प्रकल्पाला यंदा तीस वर्षे पुर्ण झाली असुन याच औचित्त्यावर आसाममध्ये गज उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, “निसर्ग आणि मानवता यांचे अतिशय पवित्र नाते आहे. निसर्गाचा आदर करण्याची संस्कृती ही आपल्या देशाची ओळख आहे. भारतात निसर्ग आणि संस्कृती एकमेकांशी जोडली गेली आहेत आणि एकमेकांचा आधार मिळवत आहेत. आपल्या परंपरेत हत्तींचा सर्वाधिक आदर केला जातो. त्यांना समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. हा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. म्हणून, आपला राष्ट्रीय वारसा जतन करण्यासाठी हत्तींचे संरक्षण करणे हा आपल्या राष्ट्रीय जबाबदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे”.
राष्ट्रपती असे ही म्हणाल्या की, “ जी कृती निसर्ग, प्राणी आणि पक्षी यांच्या हिताची आहे, ती मानवतेच्या आणि वसुंधरेच्या ही हिताची आहे. एलिफंट संवर्धन क्षेत्रातील जंगले आणि हिरवे क्षेत्र अतिशय प्रभावी कार्बन शोषणारे क्षेत्र आहेत. त्यामुळे हत्तींच्या संवर्धनाचा आपल्या सर्वांना फायदा होईल आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासही मदत होईल, असे म्हणता येईल. अशा प्रयत्नांमध्ये शासनासह समाजाचा सहभाग आवश्यक आहे”.
“आसामचे काझीरंगा आणि मानस राष्ट्रीय उद्यान हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचा अमूल्य वारसा आहेत. त्यामुळेच त्यांना युनेस्कोने 'वर्ल्ड हेरिटेज साइट'चा दर्जा दिला आहे. पुढे त्यांनी नमूद केले की, आसाममध्ये जंगली हत्तींची लोकसंख्या देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गज-उत्सव आयोजित करण्यासाठी काझीरंगा हे अतिशय योग्य ठिकाण आहे”, असं म्हणत प्रोजेक्ट एलिफंट आणि गज-उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधितांना एकत्रितपणे पुढे जावे लागेल यावर ही त्यांनी भर दिला आहे.