शिधा वाटपापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत : दीपक केसरकर

05 Apr 2023 15:48:16
-grain-allotted-

कोल्हापूर
: जिल्ह्यातील लाभार्थींसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांनी चार लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात आनंदाचा शिधा वाटप केला. शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश केसरकर यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार श्रीमती जयश्री जाधव, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे व त्याचे वाटपही राज्यात सर्वत्र सुरु आहे. याची कोल्हापूर जिल्ह्यातही प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश केसरकर यांनी दिले.

जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा वाटप अंतर्गत सुमारे ७५ टक्के शिधा प्राप्त झाला आहे. उर्वरित शिधा दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. या शिधा जिन्नसमध्ये रवा, साखर, चणाडाळ व पामतेलचा समावेश आहे. दिनांक १४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थींना शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कवितके यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0