तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी व शारीरिक लक्षणे सुधारण्यासाठी दम्याच्या लोकांनी विविध प्रयोग केले आहेत. जसे की, रोजचे ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे योग्य तंत्र आणि नियमित व्यायाम करणे.
निरोगी लोकांमध्ये सहज श्वास घेणे, ही जगातील सर्वात नैसर्गिक गोष्ट. आपण श्वास कसा घेतो, याचा जाणीवपूर्वक विचार करण्याची किंवा मुद्दाम काळजी करण्याची गरजही भासत नाही. पण, जेव्हा श्वास घेणे कठीण होते, जेव्हा त्रास होतो, तेव्हा त्या श्वासाइतके दुसरे काहीही महत्त्वाचे वाटत नाही. श्वासोच्छवासाची प्रक्रिया करताना आपली प्राथमिक भूमिका काय असते, तर ऑक्सिजन शोषून घेणे आणि फुप्फुसांच्या हालचालीद्वारे कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकणे. जेव्हा एखादी चिंताग्रस्त व्यक्ती तणावाखाली जाते, तेव्हा त्यांच्या श्वासोच्छवासाची पद्धत बदलत त्यांच्या फुप्फुसात हवा हलवण्यासाठी श्वासपटलाऐवजी खांद्याचा वापर करते. श्वास घेण्याच्या या शैलीमुळे शरीरातील वायूंचे संतुलन बिघडते. जेव्हा आपण तणावग्रस्त असतो, तेव्हा आपला श्वासोच्छवासाचा वेग आणि नमुना बदलतो.
सुदैवाने, आपल्या स्वतःच्या श्वासोच्छवासात जाणीवपूर्वक बदल करण्याची शक्तीदेखील आपल्याकडे आहे. वैज्ञानिकशास्त्रात दिसून आले आहे की, तुमचा श्वास नियंत्रित केल्याने तणाव आणि तणावसंबंधित परिस्थिती व्यवस्थापित करण्यात मदत होते. बरेच लोक त्यांच्या श्वासोच्छवासाच्या लयीचा उपयोग विश्रांती घेण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी करतात. जेव्हा आपण तणावग्रस्त असतो, चिंताग्रस्त असतो किंवा इतर प्रकारचे भावनिक त्रास अनुभवतो, तेव्हा आपल्या श्वासोच्छवासावर परिणाम होतो आणि तो अधिक उथळ आणि अनियमित बनतो. उथळ आणि जलद पद्धतीने चालणारा श्वासोच्छवास शारीरिक तणावाची लक्षणे अधिक तीव्र करून चिंतेची भावना वाढवू शकतो. तथापि, श्वास नियंत्रित केल्याने यातील काही त्रासदायक लक्षणे सुधारण्यास मदत होऊ शकते.
अनेक वेळा मोकळेपणाने श्वास घेण्यास सक्षम नसणे, ही कदाचित माणसाच्या बाबतीत घडणारी सर्वात भीतीदायक गोष्ट. ‘श्वास लागला’ ही गोष्ट फार पूर्वीपासून वेदनांशी जोडली गेली आहे आणि त्यामध्ये बरीच वैद्यकीय समानता आहे. तरीही श्वास घेण्यासाठी आलेलात्रासदायक अनुभव हा सामान्यतः जाणवणार्या वेदनांपेक्षा वाईट असतो. खरंच ती भीती अगदी मृत्यूची भीती अशीच असतो. तरीही वेदनेसारखा, श्वासाचा अनुभव सर्वसामान्य नसल्यामुळे, त्याबाबत पाहणार्यांची प्रतिक्रिया तितकी संवेदनशील नसते आणि सहानुभूतीसुद्धा कमी दाखविली जाते.श्वास घेणे हे तसे शरीराचे एक स्वयंचलित कार्य मेंदूमध्ये असलेल्या श्वसन केंद्राद्वारे नियंत्रित केले जाते. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन वापरणारा अवयव आहे. त्यामुळे फुप्फुसातील विविध आजार मेंदूवर सहज परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, ’स्ट्रोक’नंतर झालेल्या न्यूमोनियामुळे मेंदूला होणारी इजा वाढलेली दिसते. याशिवाय मेंदूचे अनेक आजार फुप्फुसावर परिणाम करू शकतात.
‘स्ट्रोक’नंतरच्या च्या पहिल्या ३६ तासांत १५.६ टक्के रुग्णांना फुप्फुसाची तीव्र दुखापत झालेली दिसते, तर ७.८ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना न्यूमोनिया किंवा ब्रॉयकायटिस यांसारख्या आजारांची लक्षणे दिसून येतात. याव्यतिरिक्त, संबंधित वैद्यकीय अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की, दीर्घकालीन फुप्फुस विकार (ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) मेंदूचे विकार वाढवू शकतात.अनेक वैद्यकीय अभ्यास मेंदू आणि फुप्फुस यांच्यातील संप्रेषण नेटवर्क सूचित करतात. दम्यासारख्या आजारानेजगणे अंगवळणी पडायला बर्याच जणांना विशेषतः मुलांना थोडा वेळ लागू शकतो. बर्याच लोकांसाठी दमा त्यांच्या जीवनातमोठा व्यत्यय आणू शकतो आणि अनिश्चितता निर्माण करू शकतो. बर्याच लोकांना असे आढळले आहे की, दम्याचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सकारात्मक मानसिकता ठेवणे. दम्यामुळे आपण करू शकत नसलेल्या अनेक गोष्टींपेक्षा आपण करू शकत असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे उपयोगी ठरते. शिवाय भावनिक समायोजन करून दम्याची लक्षणे नियंत्रित आणि व्यवस्थापित कशी करावी, याबद्दल शक्य तितके शिकून घेणे.
अस्थमा बिघडण्याची किंवा नियंत्रणाबाहेर जाण्याच्या शक्यतेबद्दल लोकांना अगदी ज्यांचा दमा सामान्यतः नियंत्रित होतो, अशांनाही भीती आणि चिंता कायम वाटते. ही असुरक्षित असण्याची आणि भविष्यात काय होईल, याबद्दल काळजी करण्याची भावना सामान्य असू शकते. परंतु, ज्या लोकांना दम्याचा भयंकर झटका आलेला असतो किंवा जेव्हा लक्षणे नियंत्रणात नसल्यासारखे वाटू लागते तेव्हा त्यांना न घाबरणे अशक्यप्राय होते. अनेकांची चिंता त्यांच्या बालपणीच्या रुग्णालयात दाखल करताना आलेल्या भीतिदायक अनुभवातून उद्भवलेली असतो. त्यांच्यासाठी सर्वात भयावह वाईट गोष्ट म्हणजे, छातीत गुदमरल्यासारखे वाटणे. माझ्या एका रुग्णाने स्पष्ट केले की, मला आता कळले आहे की, तणाव आणि चिंता यामुळे दम्याचा अटॅक होऊ शकतो.तुम्हाला दम लागत असेल आणि मग तुम्ही घाबरायला, काळजी करायला लागलात, तर तो वाढेल. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी व शारीरिक लक्षणे सुधारण्यासाठी दम्याच्या लोकांनी विविध प्रयोग केले आहेत. जसे की, रोजचे ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे योग्य तंत्र आणि नियमित व्यायाम करणे. काहींनी सांगितले की, जेव्हा त्यांना घाबरण्याची व गुदमरण्याची भावना येऊ लागली, तेव्हा जर त्यांच्या नातेवाईकाने किंवा मित्राने त्यांना शांत राहण्याची आठवण करून दिली आणि दमा निघून जाईल, असे आश्वासन दिले तर ते उपयुक्त ठरते.
संशोधनात असे दिसून आले आहे की, दम्याचे रुग्ण व्यायामाला किती चांगला प्रतिसाद देतात यात आत्मविश्वास महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दुबईचा रहिवासी जेन्सेन, याने दीर्घ काळ असलेल्या अस्थमावर मात मिळवत ‘माऊंट एव्हरेस्ट’ जिंकला. डेन्मार्क, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, रोमानिया, हंगेरी, बल्गेरिया आणि तुर्कस्तानमधून इराण, पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि तिबेटपर्यंत सायकलिंग केल्याने जेन्सेनचे डोळे विविध संस्कृती आणि निसर्गाजवळ जाणण्यासाठी उघडले.सरासरी १०० किमी सायकलिंग करणारा आणि दररोज १५ किमी धावणारा, जेन्सेन म्हणतो की, “प्रत्येक नकारात्मक विचारासाठी संतुलन साधायचे म्हटले, तर लोकांना पाच सकारात्मक विचार तयार करावे लागतात. एखाद्या साहसाकडे जायचे धाडस लोकांना विशाल आणि सकारात्मक विचार करण्यास शिकवते.”आशादायक वृत्ती आणि आत्मविश्वास लोकांना त्यांचा दृष्टिकोन आणि मूड सुधारण्यास मदत करू शकते, ज्यायोगे फुप्फुसाची क्षमता वाढविण्यात आपोआप मदत होईल. श्वास घेता येणे हा जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे.
-डॉ. शुभांगी पारकर