नागपुर : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाचं लोकार्पण आज दि. २७ एप्रिल रोजी नागपुरात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उद्योजक गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपुरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेलं 470 बेडचं हे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे. धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे. कर्करोगाच्या रुग्णांना संजीवनी देणारी संस्था म्हणून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटकडे पाहिलं जात आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, "या रुग्णालयात गरिबांची सेवा व्हावी. यासाठी या इन्स्टिट्यूटची उभारणी करण्यात आलेली आहे. गरिबांच्या सेवेच्या उद्देशाने इन्स्टिट्यूटची स्थापना केली. २५ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं आहे. रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूटचं काम पूर्ण झालं. सरसंघचालकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. शैलेश जोगळेकरांचं कार्यात मोठं योगदान आहे." असं ते म्हणाले.
नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे महत्त्व काय?
कर्करोगाच्या उपचारासाठी जागतिक दर्जाची वैद्यकीय सोय उपलब्ध आहे. 470 बेडचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट युनिट. 10 अद्ययावत ऑपरेशन थिएटर. ओन्कॉलॉजी आयसीयू असलेलं मध्य भारतातील एकमेव रुग्णालय असेल. धर्मादाय पद्धतीने कार्य करणारं देशातील सर्वात मोठा कॅन्सर रुग्णालय. लहान मुलांवर सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार देणारं मध्य भारतातील एकमेव रुग्णालय. लवकरच बोनमॅरो ट्रान्सप्लांट युनिट कार्यरत होणार आहे. कर्करोगाच्या उपचारातील नवीन न्युक्लियर मेडिसिन थेरेपी, आयोडिन थेरेपीसाठी वेगळे 10 बेड, अशी सोय मोजक्याच ठिकाणी असेल.