नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रेत झालेल्या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्यात यावी, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत. या निर्णयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार दणका बसला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टी. एस. शिवग्ननम आणि न्या. हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने पश्चिम बंगाल पोलिसांना प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि प्रकरणाशी संबंधित सर्व जप्त केलेली सामग्री तात्काळ एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी न्यायालयाने म्हटले की, हिंसाचारामध्ये अॅसिडच्या बाटल्या आणि पेट्रोल बॉम्ब इत्यादींचा वापर करण्यात आला होता. त्यांचा वापर करणाऱ्याविरोधात स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे निर्देश राज्य पोलिसांना देऊन कोणताही हेतू साध्य होणार नाही, असे न्यायालयाचे मत आहे. कारण, हे प्रकरण आता अतिशय गंभीर वळणावर असून त्याचा तपास एनआयएनेच करणे आता आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
प. बंगालमध्ये हिंदू समुदायाने श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले होते. मात्र, त्या शोभायात्रांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. हा हिंसाचार घडविण्यामागे मुस्लिम कट्टरतावाद्यांचा हात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका राज्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली होती.