मुंबई (प्रतिनिधी): दक्षिण आफ्रिकेतुन मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवलेल्या चित्त्यंपैकी उदय या चित्त्याचा रविवारी दुपारी ४ वाजता मृत्यु झाला आहे. या चित्त्याचे अलिकडेच नामकरण करण्यात आले होते. उदय सहा वर्षांचा असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यापुर्वी नामिबियातुन आणलेल्या चित्त्यांपैकी चित्त्याच्या एका मादीचा मुत्रपिंडाच्या आजाराने मृत्यु झाला. या मादीचे नाव साशा असुन तिचा मृत्यु २७ मार्च रोजी झाला. कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेल्या चित्त्यांच्या पहिल्या तुकडीत साशाचा समावेश होता. साशा या मादी चित्त्यानंतर उदय या नर चित्त्याच्या मृत्युची ही दुसरी घटना आहे.
भारतातील विलुप्त झालेल्या चित्त्यांचा अधिवास पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रोजेक्ट चित्ताला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली. सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातुन भारतात आठ चित्ते आणले गेले होते. त्यानंतर, फेब्रुवारीमध्ये आणखी १२ चित्ते दक्षिण आफ्रिकेतुन आणले गेले. या चित्त्यांपैकी अनेकांची कहाणी निराळी. पहिल्या तुकडीतील एका चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला. तसेच, कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची एक जोडी सोडताच २४ तासाच्या आत या जोडीने आपली पहिली शिकार केली. ओबान हा नामिबियन चित्ता सतत उद्यानातुन पळुन जात असला तरी त्याला पुन्हा उद्यानात आणण्यात वन विभागाने यश मिळवले. साशा या मादी चित्त्याचा नुकताच मुत्रपिंडातील त्रासामुळे दुर्दैवी मृत्यु झाला, आणि आता सहा वर्षीय उदयचा ही मृत्यु झाला आहे. त्याच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.