पुन्हा तेच ते अन् तेच ते...!

24 Apr 2023 19:51:45
 
uddhav thackeray
 
 
कोरोनाकाळात फेसबुकवरून सरकार चालविण्याचा महापराक्रम करणारे माजी मुख्यमंत्री आता महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. एकनाथ शिंदेंनी झटका दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या उद्धव यांनी महाराष्ट्रभर पक्षाच्या आणि मविआच्या वज्रमूठ सभांचा धडाका लावला. नुकतीच जळगावातील पाचोरा येथे ठाकरे गटाची सभा पार पडली. यावेळी नेहमीप्रमाणे, तेच ते अन् तेच ते पाहायला मिळाले. सभेआधी एका सैनिकाने हनुमान चालीसा म्हटला. त्यात काही वावगं नाही. परंतु, घाईत बोलताना चालीसा चुकीचा म्हटला जातोय, याचे भानही त्या सैनिकाला राहिले नाही. नवनीत राणांना हनुमान चालीसा पठण करण्यास रोखणार्‍या ठाकरेंच्या मंचावर आता हनुमान चालीसा म्हटली जातेय हेही नसे थोडके! यानंतर अंधारे ताईंचे कर्णकर्कश्श वादळ आलं आणि केवळ भाऊ, अक्का अशी विशेषणं लावून निघून गेलं. संजय राऊतांनी तर पाचोरा विधानसभेचा निकालच जाहीर केला. त्यानंतर सभेचे मुख्य वक्ते तथा आकर्षण उद्धव ठाकरेंनी तर कहरच केला. उपस्थितांना त्यांनी टोमण्यांनी मंत्रमुग्ध केले. शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तर तोही खरं सांगेल, पण मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला कळत नाही, असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे त्यांना भारताच्या निवडणूक आयोगापेक्षा पाकिस्तानवर जास्त विश्वास असल्याचे दिसते. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते, फक्त एक बोट ढेकणाला चिरडून टाकू शकते, अशा बाष्कळ विनोदानेही उपस्थिताचे मनोरंजन झाले. घुशी, शेपट्या, उलट्या पायाचं सरकार, आपटी बार, गोमूत्र, चोरट्यांची आणि भामट्यांची औलाद वगैरे हे तर नेहमीचेच. ‘मी हिंदुत्व सोडलं याचे उदाहरण सांगा,’ असा प्रश्न केला खरा, पण अशा उदाहरणांची यादी बरीच मोठी आहे, हेही तितकच खरं. ‘मी हिंदुत्व सोडलेलं नाही,’ असं उद्धव यांना वारंवार सांगाव लागतंय यातच उत्तर दडलय. कुणी गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यास त्याला मारलं जातं, चिरलं जातं, असे सांगत ठाकरेंनी कसायांकडून होणार्‍या हल्ल्यांचा साधा उल्लेखही केला नाही. नव्हे नव्हे, कसायांकडून केल्या जाणार्‍या हल्ल्यांचे ते समर्थन करताय का, असाही प्रश्न निर्माण होतो. मी तुम्हाला जवळचा वाटतो की, एकनाथ शिंदे असा पर्यायी प्रश्न विचारूनही त्यांनी सभेत रंगत आणली.
 
 
नव्या बाटलीत जुनं औषध
 
 
अनेकांनी ठाकरेंच्या सभेला विराट, अतिविराट, अभूतपूर्व अशी विशेषणे लावली असली तरी सभेला मात्र माणसं कमी आणि रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. अगदी 7-7.30 वाजेपर्यंतही निम्म मैदान रिकामंच होतं. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्धव यांनी एकेरी उल्लेख करून खिल्ली उडवली. सत्यपाल मलिक, रोशनी शिंदे अशा अनेकांचा ठाकरेंना कळवळा आला असला तरीही स्वतः मुख्यमंत्री असताना ‘उखाड दिया’ असे छातीठोकपणे कोण सांगत होतं, हेही महाराष्ट्र विसरला नाही. तुम्ही चोरलेलं धनुष्य घेऊन या आणि मी माझं नाव घेऊन येतो, बघूया कोण जिकतं असे आव्हानही ठाकरेंनी दिलं. दरम्यान, बहिणीबाई चौधरी आज असत्या, तर त्यांनाही सरकारने तुरुंगात टाकले असते असा नवा शोध ठाकरेंनी लावला. जोडीला बहिणाबाईंना एकेरी बोलून उद्धव यांनी त्यांच्याविषयी त्यांना किती आदर आहे, हेही निर्देशित केले. आठवतंय का कुणाला बहिणीबाई, ऐकलय का कधी नाव, असा प्रश्न ठाकरेंनी कुणाला केला तर चक्क खानदेशवासीयांना! बहिणाबाईंच्या भूमीतील लोकांनाच ठाकरेंनी बहिणाबाईंना ओळखतात का असा प्रश्न केला. जे की सभा स्थळापासून बहिणाबाईंचे असोदा गाव जवळपास 50 किमी अंतरावर आहे. ठाकरेंचा सोयीस्करपणा नेहमीप्रमाणे या सभेतही पाहायला मिळाला. त्यांनी, ‘इमानाले इसरला त्याला नेक म्हणू नये, जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नये,’ एवढीच ओळ म्हटली. परंतु, पूर्ण ओळी त्यांनी मुद्दामहून टाळल्या. यावर भाजपनेही ट्विट करत उद्धव यांना, ‘इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही. जल्म्दात्याले भोवला त्याले लेक म्हणू नही’, ‘ज्याच्यामधी नाही भाव त्याले भक्ती म्हणूू नही, ज्याच्यामधी नाही चेव त्याले शक्ती म्हणू नही’ या खर्‍या ओळींची आठवण करून दिली. तसेच, ठरवून फक्त कवितेच्या ओळी गाळता येतात. जनतेला विश्वासात घेण्यासाठी नियत साफ लागते, असा टोलाही भाजपने लगावला. त्यामुळे या पूर्ण ओळी उद्धव यांना स्वतः लागू होत असल्यामुळे त्यांनी त्यातल्या काही ओळी गाळल्या का, असा प्रश्न निर्माण होतो. नेमक्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी ठाकरेंनी बाष्कळ विनोद करत तीच कॅसेट पुन्हा ऐकवली. एकूणच नव्या बाटलीत ठाकरेंनी जुनं औषध दिलं इतकच!
 
 
 
Powered By Sangraha 9.0