वंध्यत्व तणावावर सकारात्मकतेचे सृजन

24 Apr 2023 19:40:37
 
 infertility stress
 
 
अनेक स्त्रियांसाठी वंध्यत्व हा बहुधा एक मूक आणि तितकाच जीवघेणा संघर्ष असतो. आज या लेखात याविषयी सकारात्मकता कशी प्रभावी ठरू शकते यावर थोडा उहापोह करूया.
 
ज्याभगिनी गर्भधारणेसाठी धडपडत असतात, त्यांना नैराश्य, चिंता, राग अशा अनेक भावनांनी पछाडलेले असते. अनेक वेळा वंध्यत्व असलेल्या रुग्णांमधील नैराश्याच्या पातळीची तुलना कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांशी व हृदयरोगाच्या रुग्णांशीही केली गेली आहे. असा एक अंदाज आहे की, आठपैकी एक जोडप्याला (किंवा 12 टक्के विवाहित महिलांना) गरोदर राहण्यात किंवा गर्भधारणा झाल्यास ती टिकवून ठेवण्यात अडचण येते. वंध्यत्वाची जाण असूनही, बहुसंख्य वंध्यत्व असलेल्या स्त्रिया कुटुंब किंवा मित्रांसोबत आपले दुःख व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची मानसिक असुरक्षितता वाढते. दुर्दैवाने, जेव्हा भगिनी महिनोन्महिने गर्भधारणेचा प्रयत्न करतात, तेव्हा तणाव अधिक वाढतो. अनेक जोडप्यांना जेव्हा गर्भधारणेच्या समस्या येतात, तेव्हा ते भावनिकदृष्ट्या व्यथित होतात.
 
प्राचीन काळापासून असे गृहीत धरले गेले आहे की, तणाव प्रजननक्षमतेला बाधा आणू शकतो. यामुळे सर्वात लक्षवेधक प्रश्न उद्भवतो तो हा की, वंध्यत्वामुळे ताण येतो की तणावामुळे वंध्यत्व येते? या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. पण, हे निश्चित आहे की, वंध्यत्वामुळे लक्षणीय त्रास होतो. या नकारात्मक भावनांमुळे अधिक नकारात्मक विचार निर्माण होतात, ज्यामुळे नंतर गंभीर नैराश्यदेखील येते.
 
अनेक जोडप्यांमध्ये नैसर्गिकरित्या प्रजनन करण्याची असमर्थता लाज, अपराधीपणा आणि कमी आत्मसन्मानाची भावना निर्माण करू शकते. या नकारात्मक भावनांमुळे वेगवेगळ्या प्रमाणात नैराश्य, चिंता, त्रास होऊन जीवनाचा दर्जा बिघडू शकतो. असे अनेक प्राथमिक पुरावे आहेत की, अत्यंत उच्च पातळीच्या भावनिक ताणामुळे गर्भनलिका अरुंद व बंद होणे, स्त्रीबीज निर्मितीच्या अडचणी येणे, हार्मोनल बदल आणि कदाचित शुक्राणूंचे उत्पादन कमी होणे यामुळे वंध्यत्व येऊ शकते. तणावातनिर्माण होणारे ‘कॉर्टिसॉल’सारखे तणाव संप्रेरक मेंदू आणि अंडाशयांमधील संकेतांमध्ये व्यत्यय आणतात. ज्यामुळे बीजनिर्मिती समस्या वाढू शकते. अशाप्रकारे वंध्यत्वाच्या तणावामुळे कदाचित शारीरिक आणि मानसिक घटनांचे एक दुष्टचक्र उद्भवू शकते. हे दोन्ही प्रकारे चालते, तणाव वंध्यत्वावर परिणाम करतो आणि वंध्यत्व तणावावर परिणाम करतो. आपण अशा जोडप्यांच्या असंख्य कथा ऐकल्या असतील, ज्यांनी गर्भधारणेची आशा सोडली होती आणि शेवटी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. नंतर चमत्कारिकरित्या त्या स्त्रियांना गर्भ राहिला किंवा ते त्यांच्या वंध्यत्वाच्या संघर्षाने त्यांचे सारे क्लेश विसरण्यासाठी एका सुंदर सुट्टीवर जातात आणि नंतर त्या तणावरहित वातावरणात गर्भवती होतात.
 
वंधत्व अनुभवत असताना सकारात्मक राहणे हे खरेतर एक मोठे आव्हान आहे. मानसिकदृष्ट्या ती सकारात्मकता सोडून दिल्याने गर्भधारणा होणे अधिक कठीण होऊ शकते. यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर अतिरिक्त भार पडतो आणि तुमच्या प्रजनन क्षमतेवर आणि नातेसंबंधांवर ताण येऊ शकतो. पाश्चात्य देशात उपयोगात आणलेला ‘मन शरीर तंत्र कार्यक्रम’ जीवनासाठी आवश्यक अशी कौशल्ये शिकवतो. अनेक महिलांनी यामुळे आपला तणाव, नैराश्य आणि चिंता कमी झाल्याची नोंद केली आहे. या महिलांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रजननक्षमतेच्या उपचारांदरम्यान आपण समाधान अनुभवत असल्याचे नमूद केले आहे.
 
आशा हा एक अविभाज्य घटक आहे, जो जोडप्यांना वंध्यत्वाच्या क्लिष्ट चढ-उतारांना तोंड देण्यास मदत करतो. अलीकडील इस्रायली अभ्यासात असे आढळून आले की, आयव्हीएफ उपचारांचा यशाचा दर सकारात्मकतेमुळे 14 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत दुप्पट झाला. डॉ. डॅनियल आमेन यांनी त्यांच्या ‘तुमचा मेंदू बदला, तुमचे शरीर बदला’ या पुस्तकात तणाव नियंत्रित करणे ही अनेक महागड्या प्रजनन उपचारांची पहिली पायरी आहे, असे नमूद केले आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, गर्भधारणा होण्याच्या काळात संतुलित आणि समाधानी राहिल्याने तुमच्या बाळाच्या विकासावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा तुमची तणावाची पातळी खूप जास्त असते, तेव्हा तुम्ही गर्भवती होणार नाही. कारण, तुमचा मेंदू तणाव आणि गर्भधारणा या दोन्ही गोष्टी एकाचवेळी पेलण्यासाठी नक्कीच सुसज्ज नाही. अनेक जोडप्यांच्या जीवनात आपल्या नकारात्मक मानसिक स्वसंवादावर पकड मिळवणे आणि नैराश्य येण्याआधीच ते रोखणे यामुळे खूप मोठा फरक येऊ शकतो आणि अगदी कठीण परिस्थितीतही नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता सुधारू शकते. सकारात्मक राहण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमचा प्रक्षोभ किंवा चिंता अनुभवू शकत नाही. जननक्षमतेच्या उपचारादरम्यान काळजी करत बसण्यापेक्षा, चलबिचल होण्यापेक्षा आणि अधीरतेने प्रतीक्षा करण्यापेक्षा सकारात्मक विचार करून प्रारंभ करा!
 
राग, दुःख आणि वेदना यासह तुमच्या भावना व्यक्त करणे, अधिक सकारात्मक वाटण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. तुमच्या ऊर्जेला प्रतिसाद न दिल्याबद्दल तुम्ही स्वतःच्या नशिबाला आणि जगाला दोष देता का? हे खरे तर आणखी अस्वस्थ करणारे आहे. कारण, हे जग आणि नशीब आपल्या नियंत्रणाच्या आणि समजण्याच्या पलीकडे आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे आपले सर्व तणावजन्य विचार आणि भावना मोकळेपणे प्रकट करू शकता. तुमचा प्रवास विधायक करण्याबद्दल आणि नातेसंबंध आणि इतर तणावाच्या मुद्द्यांशी निगडित हे तज्ज्ञ खूप आवश्यक सल्ला देऊ शकतात. भीती, चिंता किंवा निराशा या नकारात्मक भावनांना तिलांजली द्या. होकार, कृतज्ञता आणि असंदिग्ध हेतू निवडा. भविष्याची काळजी करण्यापेक्षा किंवा भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमान आणि आता या क्षणी जगावयाचे ठरवा. जगातील उत्तम आयव्हीएफ केंद्रांनीही गर्भवती महिलांना सभोवतालची नकारात्मकता दूर करण्याचा सल्ला देतात. नकारात्मक लोक टाळा, जे तुमचे नैतिक खच्चीकरण करू शकतात. सकारात्मक पुस्तकेदेखील वाचू शकता, मजेदार चित्रपट पाहू शकता आणि काही सकारात्मक आणि प्रेरणादायक छायाचित्रे (गोंडस बालकांची) देखील तुमच्या आसपास पेस्ट करू शकता.
 
मनाची शक्ती ही एक अद्भुत गोष्ट आहे. आपले जीवन अनेकदा आपल्या स्वतःच्या विचार पद्धतींचा परिपाक असतो, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक. गौतम बुद्ध म्हणतात की, यशाची व्याख्या हृदयात घडत असते. त्यामुळे तुमचा विश्वास असेल की, यशाच्या दिशेने तुमची पाऊले पडत आहेत, सकारात्मक विचारसरणीवापरून स्वत:ची मनोरथे पूर्ण करणारी भविष्यवाणी तुम्ही तयार करत आहात किंवा सकारात्मक विचारांचा सराव करून तुमची मानसिकता बदलत आहात, तर तुम्ही तुमच्या प्रजनन प्रवासात अधिक आशावादाने पुढे जाण्याची शक्यता आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा मनापासूनविचार करता, तेव्हा तुम्ही त्या विचारसरणीमध्ये एक प्रकारची विलक्षण ऊर्जा टाकता, जी तुमच्या वातावरणात सोडली जाते. आपण ज्यावर लक्ष केंद्रित करतो ते घडते आणि विस्तारते त्यामुळे सुपीक विचार करा!
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
Powered By Sangraha 9.0