‘नमामि गोदा’ प्रकल्प ‘डीपीआर’ कामास गती

21 Apr 2023 17:43:46
Namami Goda Project in nashik

नाशिक : नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि गोदा‘ योजनेचा ‘डीपीआर’ तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. ऑगस्टअखेर ‘डीपीआर’ तयार करून शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीसह उपनद्या प्रदूषणमुक्तीचा चंग बांधला आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील नमामि गंगेच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘नमामि गोदा’ राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतल. प्रकल्पाच्या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, सल्लागार संस्थेमार्फत ‘नमामि गोदा’साठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. योजनेसाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात निधी मिळविण्याचे महापालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी बांधकाम, मलनिस्सारण आणि यांत्रिकी विभागातील प्रमुख अधिकार्‍यांचे पथक नुकतेच वाराणसी, प्रयागराजचा दौरा करून परतले.

‘या’ आहेत प्रकल्पातील प्रमुख बाबी ;

१)गोदावरीसह उपनद्यांया काठावरील मलवाहिकांची क्षमतावाढ, सुधारणा करणे

२) नदीपात्रात मिसळणारे मलजल अडवून मलनि:स्सारण केंद्रांकडे वळविणे

३)मखमलाबाद व कामटवाडे येथे नवीन मलजल प्रक्रिया केंद्र उभारणे

४)नव्याने विकसित होत असलेल्या रहिवासी भागात मलवाहिका टाकणे

५)नदीघाट सुशोभीकरण, प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर करणे.

ऑगस्टपर्यंत डीपीआरचे काम पूर्ण
गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नमामि गोदाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. ऑगस्टअखेर या योजनेच्या डीपीआरचे काम पूर्ण करून शासनाला सादर केला जाणार आहे.

- शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मनपा


Powered By Sangraha 9.0