ज्ञानवापी खटल्यात हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलावर दिल्लीत हल्ला!

20 Apr 2023 16:06:47
varanasi-gyanvapi-shringar-gauri-case-advocate-jitendra-singh-visen-attacked-in-delhi

नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणातील वकिल तसेच विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह विसेन यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दिल्लीत दोन जणांनी त्याच्या डाव्या खांद्यावर सुई भोसकून पळ काढला. यामुळे त्यांना काहीवेळाने शारीरिक वेदनेला समोरे जावे लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, दि.१८ एप्रिल रोजी रात्री दिल्लीतील पटेल नगर येथील त्याच्या घरी रात्रीचे जेवण करून जवळच्या उद्यानात फिरायला गेले होते. फेरफटका मारत असताना मागून येऊन दोन जणांनी त्यांना पकडले. त्यापैकी एकाने त्याच्या डाव्या खांद्यावर सुईसारख्या वस्तूने वार केले. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच्या शरीरात वेदना, जळजळ आणि थरथर जाणवू लागली. यानंतर त्यांनी त्यांच्या घरी फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी त्यांना डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेले. रुग्णालयात रात्रभर उपचार केल्यानंतर त्यांना आराम वाटला. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र शरीरात वेदना कायम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जितेंद्र सिंह विसेन यांच्यावर हा हल्ला दिल्लीत झाला. इंजेक्शनद्वारे त्याच्या शरीरात विष, घातक औषध घुसवले गेले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे. उपचारासोबतच डॉक्टरांनी आवश्यक चाचण्या करून घेतल्या आहेत. अहवाल आल्यावर परिस्थिती स्पष्ट होईल असे देखील डॉक्टरांनी सांगितले. या हल्ल्याप्रकरणी डॉक्टरांनी सांगितले की, इंजेक्शनद्वारे त्याच्या शरीरात काही द्रव्य टाकले गेले असेल तर त्याचा परिणाम साधारण आठवडाभरानंतरच दिसून येईल. सध्या डॉक्टरांनी जितेंद्र सिंह यांना रक्त तपासणीसाठी आठवडाभरानंतर परत येण्याचा सल्ला दिला आहे.

 
दुसरीकडे, तक्रार मिळाल्यानंतर दिल्लीच्या पटेल नगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी सांगितले की, सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तपासानंतर जे तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल.तसचे जितेंद्र सिंह विसेन यांच्यावरील हल्ला झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या संदर्भात पोलिसांनी जितेंद्र सिंह यांचा जबाब घेतला आहे.

या सर्व प्रकरणी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचे ही जितेंद्र सिंह यांनी सांगितले. जितेंद्र सिंह विसेन हे वाराणसीतील ज्ञानवापी मशीद खटल्यातील याचिकाकर्त्या राखी सिंगचे वकील आहेत. त्यांच्या पत्नी किरण सिंग या बदली अर्ज प्रकरणात प्रतिवादी आहेत. यासोबतच ते लटभैरव तसेच मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी आणि मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा यासारख्या अन्य मुद्द्यांवर देशभरातील ११ प्रकरणांचा पाठपुरावा करत आहेत.





Powered By Sangraha 9.0