भारताचे ‘कोलंबिया कनेक्शन’

20 Apr 2023 19:59:35
columbia

काँ‘ग्लोबल साऊथ’ म्हणविल्या जाणार्‍या गटातील एक महत्त्वाचा देश म्हणजे कोलंबिया. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला वसलेला हा एक प्रमुख देश. या देशाची भूराजकीय, भूव्यापारीदृष्ट्या जागाही तितकीच मोक्याची. उत्तरेला कॅरेबियन समुद्र तर पश्चिमेला अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर. तसेच, कोलंबिया हे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडांना जोडणार्‍या मार्गावरील एक प्रमुख व्यापारी केंद्र. कोलंबियाच्या उत्तरेला पनामा, पश्चिमेला इक्वेडोर आणि पेरु, दक्षिणेला ब्राझील आणि पूर्वेला व्हेनेझुएला असे सगळे लॅटिन अमेरिकन देश.

त्यामुळे कोलंबिया हा लॅटिन अमेरिकेचा जणू मुकूटमणी. अशा या व्यापारीदृष्ट्या अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या कोलंबियाशी भारताचेही अलीकडच्या काळात संबंध वृद्धिंगत झाले आहेत. तसेच, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर त्यांच्या आगामी लॅटिन अमेरिकेच्या दौर्‍यात कोलंबियाला भेट देऊन या द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देणार आहेत. त्यानिमित्ताने भारताचे हे ‘कोलंबिया कनेक्शन’ समजून घेणे क्रमप्राप्त ठरावे.

कोलंबिया हा ५२ दशलक्ष लोकसंख्येचा ख्रिश्चनबहुल देश. स्पेनची वसाहत असलेल्या या देशाने १८१० साली स्वातंत्र्य घोषित केले, तर १८१९ साली या देशाला स्वतंत्र देशाची मान्यताही मिळाली. म्हणजेच भारताच्या पुष्कळ वर्षे आधी स्वतंत्र झालेला हा देश. परंतु, दुर्दैवाने राजकीय अस्थिरतेमुळे या देशाचा विकास, प्रगती मात्र खुंटली. कम्युनिस्ट गुंडांची दहशत, वांशिक दंगली, राजकीय पक्षांमधील पराकोटीचे मतभेद, शेजारच्या देशांशी सीमावाद, कोकेन आणि ड्रग्जची मोठी बाजारपेठ, परिणामी अनियंत्रित गुन्हेगारी, मानवी तस्करी अशा राजकीय, सामाजिक, आर्थिक समस्यांनी कोलंबियाच्या विकासाला खीळ बसली. त्यातच अमेरिकेनेही सोयीस्कररित्या आपल्या स्वार्थासाठी कोलंबियामध्ये नको तितकी ढवळाढवळ केली.

 परिणामी, हा देश कायमच या ना त्या कारणास्तव अस्थिरतेने ग्रासलेला राहिला. आताही द. अमेरिकेतील आलेल्या गुलाबी लाटेमध्ये कोलंबियाच्या राजकीय इतिहासात प्रथमच कम्युनिस्ट विचाराचे गुस्तावो पेट्रो हे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. हा झाला कोलंबियाचा अगदी धावता आढावा. पण, कोलंबिया हा देश भारतासाठी इतका का महत्त्वाचा आहे, हे यानिमित्ताने समजून घ्यायला हवे. कोलंबिया हा उत्तर अमेरिकेच्या तसा अगदी जवळचा देश. विमानाच्या किंवा जहाजाच्या माध्यमातून थेट अमेरिकेत मालवाहतूक करण्यापेक्षा कोलंबिया मार्गे ही मालवाहतूक तुलनेने कमी खर्चिक ठरते.

म्हणजे भारतातून अमेरिकेत विमानामार्गे मालवाहतुकीचा दर हा ५.६३ किग्रॅम डॉलर इतका आहे, तर कोलंबिया ते अमेरिका विमानातून मालवाहतुकीचा दर हा केवळ १.१२ किग्रॅम डॉलर इतका. त्यामुळे साहजिकच कोलंबियाची उत्तर अमेरिका, द. अमेरिका, कॅनडा आणि इतर कॅरेबियन देशांशी विमान आणि बंदराच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी लक्षात घेता, भारतीय गुंतवणूकदार, व्यावसायिकांसाठी कोलंबिया हा स्वर्ग ठरावा. त्याचबरोबर या देशांशी असलेल्या मुक्त व्यापार धोरणांतर्गत हाच आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक किफायतशीर मार्गाने करणेही सोयीस्कर ठरते. तसेच, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये भारतीय कंपन्या सुरू करण्यापेक्षा त्या कोलंबियासारख्या देशात स्थापन करणे हेदेखील कमी खर्चिक.

त्यामुळे भारताने कोलंबियाशी संबंध वृद्धिंगत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले दिसते. परिणामी, भारत आणि कोलंबिया दरम्यानच्या व्यापारातही वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२१-२२ दरम्यान कोलंबियाची भारताला निर्यात ही तब्बल ६४० टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारी सांगते. यामध्ये प्रामुख्याने कोळसा, तेल आणि इतर उत्पादनांचा समावेश होतो. तसेच, कोलंबियामधील नवीन सरकारने औद्योगिकीकरणाच्या धोरणाला चालना देण्याचे ठरविले आहे. शेतीउद्योग, फार्मास्युटिक्लस, ‘आयटी’, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती यांसारख्या क्षेत्रांना कोलंबिया सरकारने प्राधान्यक्रम दिलेला दिसतो. या सगळ्याच क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे कोलंबियाच्या बाजारपेठेतही भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीची मोठी संधी दृष्टिपथात आहे. तसेच, दोन्ही देश विकसनशील वर्गात मोडत असल्याने एकत्रित काम करणे हे सोयीचे ठरावे. एकूणच काय तर भारताचे हे ‘कोलंबिया कनेक्शन’ सर्वार्थाने फलदायी ठरणार आहे, हे निश्चित!


Powered By Sangraha 9.0