देवीदेवतांच्या फेकून दिलेल्या तसबिरी आणि मूर्तींच्या पुनर्वापराची ‘संपूर्णम्’ नावाची अनोखी चळवळ सुरु करणार्या अॅड. तृप्ती श्रीकांत गायकवाड यांच्याविषयी...
अलीकडच्या काळात घराच्या नवनव्या संकल्पना समोर येऊ घातल्या आहेत. पारंपरिक घरांच्या पद्धती आता कालबाह्य ठरताना दिसतात. घरांचे आकर्षक आणि सुंदर असे ‘इंटिरिअर’ करताना जुने देव्हारे, जुन्या तसबिरी, मूर्तीदेखील मग साहजिकच बदलण्याकडे आजच्या पिढीचा कल दिसून येतो. आता या तसबिरी ओढ्याच्या, नदीच्या, समुद्राच्या किनार्याला आणि झाडांच्या मुळापाशी फेकलेल्या अवस्थेत दिसून येतात. हे चित्र असह्य झाल्याने पेशाने वकील असलेल्या अॅड. तृप्ती श्रीकांत गायकवाड यांनी सुरू केली एक नवी चळवळ ’संपूर्णम्.’
देवांच्या तसबिरी गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्याची भन्नाट ‘आयडिया’ तृप्ती यांना सुचली आणि मग काय, या तसबिरींच्या काचा, फ्रेम वेगळ्या करून चक्क ‘रिसायकलिंग’ची सुरुवात झाली. बघता बघता दोन वर्षांतच जमा झाले अशा प्रकारचे तब्बल ५५ हजार किलोंचे साहित्य...
मूळच्या नाशिकच्या असलेल्या तृप्ती पुण्यात वास्तव्यास होत्या. त्यांचे वडील श्रीकांत गायकवाड लहानपणापासूनचे नाशिकमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित कार्यकर्ते. घरातच समाजसेवेचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच तृप्ती यांच्या मनातही सामाजिक भान आपसुकच जागृत झाले. महाविद्यालयात शिकत असताना आणि नंतर वकिली व्यवसाय करताना त्यांचे लक्ष नेहमी रस्त्याच्या कडेला, नदीकाठी, ओढ्याच्या काठावर फेकून दिलेल्या या तसबिरी आणि मूर्तींकडे जायचे.
या भंगलेल्या, झिजलेल्या, खराब झालेल्या वस्तू पाहून त्यांना आपले देव असे रस्त्यावर का फेकून दिले जातात, असा प्रश्न पडायचा. देवावर माणूस इतकी श्रद्धा ठेवतो. तरीही देवाच्या तसबिरी, मूर्ती अशा का फेकल्या जातात? त्यातील देवत्व खरेच हरवते का? नव्या पिढीसमोर देव फेकून देण्याचा हा चुकीचा संदेश दिला जात आहे, असे अनेक विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. हे सगळे थांबवायचे असेल, तर काहीतरी अभिनव कल्पना मांडली पाहिजे, असे त्यांना सतत वाटू लागले. त्यातूनच जन्म झाला ‘संपूर्णम् सेवा फाऊंडेशन’ या संस्थेचा.
पुणे आणि नाशिकमध्ये ज्या ज्या ठिकाणी या तसबिरी फेकल्या जात होत्या, तेथून त्या गोळा करायला सुरुवात केली. तसेच मित्र, नातेवाईक, परिचित यांच्यामार्फत जुन्या तसबिरी, मूर्ती, देव्हारे नको असतील, तर संस्थेकडे द्या असे सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू या मोहिमेला प्रतिसाद मिळू लागला. थोड्या थोड्या प्रमाणात हे साहित्य जमा होऊ लागले होते. जमा झालेले हे साहित्य तृप्ती नाशिकला घेऊन जात असत. सुरूवातीला घरातच त्यांनी हे साहित्य ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे साहित्य त्यांनी एक जागा भाड्याने घेऊन तेथे ठेवण्यास सुरुवात केली.
साहित्य जमा होऊ लागल्यावर त्याचे आता करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. हळूहळू काचा वेगळ्या करणे, फ्रेमची लाकडे वेगळी करणे, लाकडी देव्हारे मोकळे करणे अशी कामे सुरू झाली. त्यामधून या साहित्यामधून आणखी काही नवीन वस्तू तयार करण्याची कल्पना पुढे आली. तसबिरींसोबत काही मूर्तीदेखील येऊ लागल्या. मातीच्या आणि शाडूच्या मूर्तींसोबत चिनी बनावटीच्या मूर्तीदेखील येऊ लागल्या. या मूर्ती माती आणि प्लास्टिकपासून तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा पुनर्वापर करणे अवघड असते.
पुनर्वापरायोग्य साहित्यामधून हळूहळू नव्या साहित्याची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. यामध्ये मतिमंद मुलांना रोजगारदेखील उपलब्ध झाला. त्यांच्याकडून काही खेळणी, रंगकाम वगैरे सुरू करून घेण्यात आले. या साहित्याच्या पुनर्वापरामधून ‘इनडोअर डेकोरेशन’च्या वस्तू, सापशिडी, लुडो, चेसबोर्ड अशी मुलांची खेळणी, वॉल हँगिंग, कापडापासून आकाश कंदील, सजावटीच्या वस्तू अशा अनेक वस्तू साकारू लागल्या. हे सर्व करीत असताना त्याचे पावित्र्य भंग होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जाते. जमा झालेल्या साहित्याची उत्तरपूजा केली जाते. हा उपक्रम उत्तमरीत्या पुढे सरकू लागल्यानंतर छ. संभाजीनगर, सोलापूर, मुंबई, संगमनेर, शिर्डी आदी शहरांमधील अनेकजण स्वत:हून या अभियानाशी जोडले गेले.
पुणे, नाशिक आणि वरील सर्व शहरांमध्ये आज अनेक स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने काम करीत आहेत. त्या-त्या शहरांमधून हे सर्व साहित्य जमविले जाते आणि ते मोठ्या प्रमाणावर साठले की, नाशिकला पाठविले जाते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्ली, बंगळुरू, चेन्नई याठिकाणीदेखील हा उपक्रम सुरू करण्यात आला. टेम्पोभरून या शहरांमधून हे साहित्य आणले जाते. ज्यांना ते पोहोचविणे शक्य नाही, असे नागरिक कुरिअरद्वारे हे साहित्य पाठवितात. कुरिअरचे पैसे ‘संपूर्णम्’कडून दिले जातात. देशभरामधून जवळपास २०० तरुण आणि प्रौढ या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.
या कामाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून तृप्ती यांनी त्यांचा वकिली व्यवसाय आता कमी केला. उर्वरित सर्व वेळ त्या याच उपक्रमाला देतात. देशातील आणि राज्यातील आणि शहरांमध्ये अशी संकलन केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. हिंदू देवदेवतांच्या तसबिरी आणि मूर्तींची होणारी विटंबना थांबवून, त्याला नवा आयाम जोडणार्या तृप्ती यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
लक्ष्मण मोरे
९८५०४४०५४३