मुंबई : राज्यात मे महिन्याच्या मध्यामध्ये जाणवणारा उन्हाचा चटका आता एप्रिलमध्येच जाणवू लागला आहे. एप्रिलमध्येच वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्याने महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. याच पार्श्वभुमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता दि.२१ एप्रिलपासूनच दिली जाणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातल्या शाळांचा अहवाल मागवला आहे. ज्या शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत त्यांना सुट्टी मिळणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्य सरकार हा निर्णय घेणार आहे. सुट्टीत अभ्यास देऊ नये, अशा सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. १५ जूनला सगळ्या शाळा सुरू होतील. तर केवळ विदर्भातील शाळा २० जूनला सुरू होतील, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.