मुंबई : मशिदींच्या भोंग्यांवरून होणाऱ्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याविरोधात मुंबईतील एका माजी नौदल जवानाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांकडे ५०० वेळा तक्रार करूनही या दिशेने कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांना आता न्यायालयात जावे लागले आहे.७५ वर्षीय माजी नौदल जवान महेंद्र सप्रे यांनी सांगितले की, त्यांच्या घरासमोरील झोपडपट्टीतील मशीद आणि देवस्थानांवर लावलेल्या भोंग्यांमधून येणार्या मोठ्या आवाजामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना औषधे घ्यावी लागतात. त्यांच्या याचिकेवर १२ जून २०२३ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण मुंबईतील वडाळा भागातील आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर ७५ वर्षीय महेंद्र सप्रे हे आपल्या पत्नीसोबत वडाळा येथील फैकल्टी इमारतीत राहतात.त्यांची पत्नी देखील इंडियन केमिकल्स टेक्नॉलॉजी (ICT) मध्ये प्राध्यापक आहे. त्यांच्या इमारतीसमोर बंगालीपुरा झोपडपट्टी आहे. माजी नौदल जवानाचे म्हणणे आहे की, झोपडपट्टीतील मशिदी आणि धार्मिक स्थळांवर १९ हून अधिक भोंगे बेकायदेशीरपणे लावण्यात आले आहेत. या सगळ्यातून बाहेर पडणाऱ्या आवाजामुळे ते त्रस्त झाले आहेत.
महेंद्र सप्रे यांच्या हृदयावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांना अधिक विश्रांती आणि जास्तीत जास्त झोप घेण्याचा सल्ला दिला आहे. पण मशिदींच्या भोंग्यांमधून येणारा मोठा आवाज त्यांना झोपू देत नाही. याबाबत सप्रे यांनी स्थानिक पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अखेर त्यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली.सप्रे यांचे वकील प्रेरक चौधरी यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाच्या राहत्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केले जात आहे. तसेच त्यांच्या अशिलाची याचिका कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. ही समस्या परिसरातील सर्व लोकांची समस्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर १२ एप्रिल रोजी हायकोर्टात सुनावणी झाली. पुढील सुनावणीसाठी १२ जूनची तारीख देण्यात आली आहे. तसेच तक्रारदाराने अशीही माहिती दिली की त्यांनी त्यांची तक्रार पीएमओ ते गृह मंत्रालयाला ट्विटरवर टॅग केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.