जीवात्म्याचा स्वागत सोहळा!

    19-Apr-2023
Total Views |
garbhadhana sanskara

उत्तम संस्कारांच्या अभावी आज सर्वत्र अनिष्ट प्रवृत्ती उदयास येत आहेत. याचे कारण म्हणजे सुसंस्कारांचा अभाव व कुसंस्कारांचा अतिरेक. या दृष्टीने मानवांवर किंबहुना बालकांवर सूक्ष्म व स्थूल संस्कार होण्याकरिता वैदिक १६ संस्कारांचे प्रतिपादन अतिशय मोलाचे ठरते.

हे संस्कार म्हणजे एक प्रकारे मानवाची निर्मितीशाळाच! याच षोडश संस्कारांच्या माध्यमाने आई-वडील आपल्या बालकांचे जन्मापूर्वीचे आणि जन्मानंतरचेसुद्धा कुसंस्कार बदलून त्यात नवे संस्कार धारण करवू शकतात. हे ओळखून वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असलेल्या ‘वेदामृत ज्ञानसरिता’ या आध्यात्मिक सदरात यापुढे वैदिक १६ संस्कारांचे विवेचन करण्यात येत आहे. यांचे विश्लेषण वेद, उपनिषद, स्मृती व स्मार्त ग्रंथ तसेच महर्षी दयानंद विरचित संस्कारविधी, व इतर विचारवंतांच्या ग्रंथांच्या आधारे होईल. मागील एका लेखात ‘संस्कार महात्म्य’ या विषयाचे प्रतिपादन झाले. यापुढे संस्कारांची ही मालिका क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत.

विष्णु: योनिं कल्पयतु,
त्वष्टा रुपाणि विंशतु।
आ सिञ्चन्तु प्रजापति:,
धाता गर्भं दधातु ते॥
(ऋग्वेद-१०.१८४.१)
अन्वयार्थ

हे देवी, (विष्णु:) सर्वव्यापक असा परमेश्वर (ते) तुझ्या (योनिम्) गर्भस्थानाला (कल्पयतु) सुदृढ बनवो. (त्वष्टा) विश्वनिर्माता परमेश्वर (रूपाणि) गर्भाच्या गुण, रंग, रूप आदी विविध बाबींना (पिंशतु) सूक्ष्मरित्या घडवो. (प्रजापति:) समग्र प्राणिमात्रांचा अधिपती (आ+सिञ्चतु) गर्भाचे चांगल्या प्रकारे सिंचन करो. (धाता) जगातील प्रत्येक पदार्थाला धारण करणारा ईश्वर (ते) तुझ्या (गर्भम्) गर्भाला (दधातु) उत्तम प्रकारे स्थापन करो.

विवेचन

सबंध सृष्टीचा निर्माता परमेश्वर आपले कार्य करतो, ते जीवात्म्यांच्या साहाय्याने. ही सृष्टी म्हणजे त्या भगवंताची जणू काही कर्मशाळाच. पण, तो स्वतः येऊन कर्म करू शकत नाही. कारण, तो तर अजन्मा, अजर, अमर, निराकार, सर्वव्यापक इत्यादी गुणांनी परिपूर्ण आहे. मग तो आपली कामे करतो, ती असंख्य जीवात्म्यांच्या माध्यमाने. जीवात्मा हा कर्म करण्यास स्वतंत्र व कर्माची फळे भोगण्यास परतंत्र असल्याने त्याचे सृष्टीत गमनागमन होतच असते. मग या सृष्टीत येण्यासाठी हे असंख्य आत्मे योग्य अशा ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतात. आपणांस कोणत्या मातेचे उदर मिळणार? याच्या शोधात असतात. आत्म्याचे मातेच्या गर्भात बीजरूपात प्रवेशणे म्हणजेच ‘गर्भाधान’ होय. अशा रीतीने मात्या-पित्यांच्या माध्यमाने गर्भधारणाक्रियेद्वारे जीवात्म्यांचा विश्वात प्रवेश होतो, यालाच ‘गर्भधारण संस्कार’ असे म्हणतात. १६ संस्कारांपैकी हा पहिला संस्कार!

सुयोग्य वयातील तरुण मुला-मुलींच्या कुल, विद्या, गुण, रुप, वय, कर्म, स्वभावांची परीक्षा करून त्या दोघांचा सर्वांच्या साक्षीने विवाह केला जातो. पितृऋणातून मुक्त होणे आणि राष्ट्राला आदर्श प्रजा (उत्तम संतती) प्रदान करणे, या प्रमुख उद्देशाने संयमपूर्वक गार्हस्थ्यजीवन हे विवाहाचे ध्येय. विवाहानंतर कुटुंबातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत नववधूच्या ऋतुस्राव काळानंतर एका सुयोग्य दिवशी अग्निहोत्र आयोजित करून गर्भाधान संस्कार संपन्न होतो. यालाच आजकालच्या रूढभाषेत ‘सत्यनारायण पूजा’देखील म्हणतात. नवदाम्पत्यांना यजमानपदी बसवून यज्ञविधीत जे मंत्रोच्चार होतात, त्यांद्वारे पती-पत्नींना उत्तम संततीसाठी एक प्रकारे प्रेरणाच दिली जाते. पहिल्याच संततीच्या प्राप्तीसाठी नव्हे, तर दुसर्‍या संततीच्या वेळी देखील हा संस्कार केला जातो.

संतती म्हणजे प्रजा एका कुटुंबासाठी नव्हे, तर समाज व राष्ट्रासाठी मिळणारी संतती रूप आदर्श पिढी. म्हणून उत्तम संततीच्या आवाहनासाठी गर्भाधान संस्कार कार्यक्रमात कुटुंबासोबतच इतरही प्रतिष्ठित स्त्री-पुरुषांना आमंत्रित केले जावे. कारण, हा एक पवित्र धार्मिक संस्कार आहे. या सर्व मंडळींना साक्षी मानून त्यांच्या आशीर्वादाने या दोघा दाम्पत्यांना संतती निर्मितीच्या संदर्भात महत्त्वाची जाणीव करून दिली जाते. अशाच मंत्रांचा विनियोग याप्रसंगी होतो. यातील आशय असा आहे, ’हे दाम्पत्यांनो! आता तुम्हा दोघांच्या माध्यमाने समाज व राष्ट्राला आदर्श संतती मिळणार आहे. सामाजिक व राष्ट्रीय कार्यासाठी हातभार लावणारा पवित्र दिव्यात्मा (पुत्र किंवा पुत्री) लाभणार आहे. जेणेकरून भविष्यात त्यांच्या माध्यमाने देशात सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक अथवा औद्योगिक प्रगतीचे कार्य साधू शकेल.’ इतका उदात्त दृष्टिकोन यामागचा आहे.

म्हणूनच सुयोग्य बाळास जन्माला घालणार्‍या यजमान पती-पत्नींना कर्तव्याची जाणीव करून देणारा हा धार्मिक विधी. केवळ कामवासनेच्या आहारी जाऊन कशीतरी संतती आकस्मिकरीत्या जन्माला घालणे म्हणजे पवित्र अशा गार्हस्थ्य धर्माचा अवमान आहे. खरेतर ‘गर्भाधान संस्कार’ म्हणजे आपल्या घरी येणार्‍या एका महान आत्म्याचा स्वागत सोहळाच. एरवी घरी एखादा पाहुणा येणार, हे समजताच कुटुंबातील सर्वजण कसे आनंदाने तयारीला लागतात. स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होते. सगळ्यांना कितीतरी आनंद होतो. हे झाले चार-दोन दिवसांसाठी येणार्‍या अतिथींविषयी! मग आज तर आपल्या कुटुंबात येणारा हा पाहुणा नसून तो तर आपल्या कुटुंबाचा एक कायमस्वरूपी घटक आहे. मग त्याचे स्वागत उत्साहात नको का व्हायला? अगदी प्रसन्न अंत:करणाने सर्वांना त्या पवित्र जीवात्म्याच्या स्वागत व अभिनंदनास सज्ज राहावयास हवे. (क्रमश:)

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

९४२०३३०१७८