संघशक्तीच्या सत्याचा प्रत्यय...

18 Apr 2023 20:53:54
the truth of Sanghashakti

तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळगम (द्रमुक) पक्षाच्या सरकारने जंगजंग पछाडल्यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन ते रोखू शकले नाही. या पक्षाच्या सरकारने आधी सत्तेच्या आणि नंतर न्यायालयाच्या माध्यमातून आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला यश आले नाही. रविवार, दि. १६ एप्रिल रोजी राज्यात ४५ ठिकाणी पथसंचलन झाले.

त्याला अपार प्रतिसादही लाभला. जनमानसांत चर्चा झाली आणि माध्यमांतही जागा मिळाली. जी गोष्ट नित्यनेमाने होणार होती, तिला अपशकुन करण्याचा प्रयत्न केला आणि एरवी जी दुर्लक्षित राहिली असती, तिला ठळकपण मिळवून दिले. द्रविडी अस्मितेच्या नावाने हडेलहप्पी करणार्‍यांच्या पदरी यातून काय पडले? काहीच नाही. मात्र, संघशक्तीच्या सत्याचा प्रत्यय मात्र पुन्हा आला.

तामिळनाडूत झालेल्या या ४५ पथसंचलनातील प्रमुख संचलन हे चेन्नईतील कोरट्टूर येथे झाले. रा. स्व. संघाचे दक्षिण क्षेत्र संघचालक डॉ. आर. वन्नीयराजन आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांचा त्यात प्रमुख सहभाग होता. याशिवाय ‘फेडरेशन ऑफ ऑल चेट्टियार’ संघाचे प्रदेशाध्यक्ष अरुणाचलम, तामिळनाडू नाडर संघाचे नेते प्रदेशाध्यक्ष मुथ्थू रमेश, वीर वन्नियार संघाचे प्रदेशाध्यक्ष जय हरी, बोयार संघाचे प्रदेशाध्यक्ष बालचंदर, सौराष्ट्र समुदायाचे अध्यक्ष एस. आर. अमरनाथ, माया वंश महासभेचे राज्य सचिव एस.के. शिवकुमार, ‘व्हिलेज पीपल्स वेलफेअर असोसिएशन’चे अध्यक्ष सी. पी. पच्छैयप्पन, ‘परियार असोसिएशन’चे रविकुमार इत्यादी सहभागी झाले होते. ही सर्व नावे देण्याचे कारण म्हणजे तामिळनाडूतील सर्व थरांतील आणि सर्व समुदायांतील प्रतिनिधी यात सामील झाले होते, हे लक्षात यावे.

या पथसंचलनाचे महत्त्व काय? वास्तविक संघाचे संचलन हा संघाच्या दैनंदिन व्यवहाराचा एक भाग आहे. सर्वसामान्य लोक आणि हिंदू समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि स्वयंशिस्त आणि प्रामाणिकपणा राखण्यासाठी हे संचलन असते. हिंदू समाज एकजुटीने, दृढतेने आणि स्थिरपणे कूच करू शकतो, हे दाखवून देणारी ही घटना असते. संघटना म्हणून रा. स्व. संघाच्या प्रक्रियेचा तो भाग आहे.

मात्र, तामिळनाडूतील द्रमुक सरकारला असे संचलन निघावे, हे पचनी पडले नाही. कार्यकर्ता आधारित पक्ष अशी स्वतःची टिमकी वाजविणार्‍या द्रमुकमध्ये अलीकडे कार्यकर्त्यांमध्येच विस्कळीतपणा आला आहे. दोन-तीन दशकांपूर्वी द्रविड चळवळीत (ती जी काही असो) किंवा द्रमुक पक्षामध्ये जो एकजिनसीपणा होता, तो कधीचाच विरून गेला आहे. रया गेलेल्या हवेलीसारखी आज द्रमुकची आणि तेथील सरकारची अवस्था आहे. घराणेशाहीला कंटाळलेल्या लोकांना नवीन पर्याय हवा आहे. शिवाय सत्तेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या गुंडगिरीबद्दलही लोकांमध्ये राग आहे. एकीकडे आपली अशी वाताहत होत असताना संघाच्या कार्यकर्त्यांचे बळ वाढतेय आणि ते आजही निष्ठेला धरून आहेत, हे एम. के. स्टॅलिन यांना सहन कसे होणार?

म्हणूनच त्यांनी संघाच्या संचलनावर बंदी घालण्याचा आपल्या नावाला साजेसा हुकूमशाही निर्णय घेतला. संघाचे संचलन होणार होते, दि. २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिनी. त्यासाठी चेन्नईसह ५० ठिकाणी संचलनाचे नियोजन संघाने केले होते. त्यासाठी रीतसर पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. मात्र, त्याच दिवशी चिरुत्तैगल विडुदलै कट्चि या पक्षाकडून मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले असल्याने कायदा-सुव्यवस्था प्रश्नाचे कारण देऊन ती परवानगी नाकारण्यात आली. यावर आधी मद्रास उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात खटलेबाजी होऊन सर्वोच्च न्यायालयाने संचलन व्हावे, असा निकाल दिला. तेव्हा कुठे हे पथसंचलन अखेर रविवारी पार पडले. त्यासाठीही पोलिसांनी १२ अटी टाकल्या होत्या. त्यांचेही पालन करून हे संचलन पार पडले.

राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये निघालेल्या संचलनाला जो प्रतिसाद लाभला तो उत्स्फूर्त होता. त्याची छायाचित्रे आणि दृश्यफिती सर्वत्र फिरत आहेत. एकट्या चेन्नईत कोरट्टूरमध्ये झालेल्या संचलनात पेरांबूर, तिरुवोट्टीयुर, अमपाथूर आणि वडपळनी भागांतील १,२०० हून अधिक स्वयंसेवक गणवेशात सहभागी झाले होते. दक्षिण तामिळनाडूत हा आकडा १२,३०६ आणि उत्तर तामिळनाडू प्रांतात ८,२२३ होता. याचा अर्थ दोन्ही प्रांत मिळून २० हजार ५२९ स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. दोन्ही प्रांतांत मिळून संचलनाला उपस्थित राहिलेल्या सामान्य लोकांची संख्या ३३ हजार, ७४८ असल्याची माहिती आहे. अगदी माध्यमांनीही त्याला ठळक प्रसिद्धी दिली. (यात द्रमुकच्या ’दिनकरन’सारख्या वृत्तपत्र किंवा वाहिन्यांचा अपवाद, पण कुजकेपणा ज्यांच्या नसा-नसात भरला आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा तरी काय करणार?) संघाचा भयगंड स्वतः पाळून आणि इतरांमध्ये निर्माण करून आपला हेकेखोरपणा चालविणार्‍यांना बसलेली ही चपराक आहे.

बरं, या संघद्वेषाला हिंदूभयाचीसुद्धा (हिंदूफोबिया) किनार आहेच. म्हणूनच राज्य सरकार आणि पोलिसांनी त्यापूर्वी ‘हिंदू मक्कल कट्चि तमिळगम’ या संघटनेलाही राज्यस्तरीय संमेलनाची परवानगी नाकारली होती. त्यालाही कारण तेच कायदा आणि सुव्यवस्थेचे. त्याही संघटनेला मद्रास उच्च न्यायालयाने दि. २९ जानेवारी २०२३ ला राज्यस्तरीय संमेलन घेण्याची परवानगी दिली होती.

‘सत्यमेव जयते’ हे आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीद आहे. त्याच न्यायालयाच्या आदेशाने, आपल्या लोकशाहीतील अधिकाराची अंमल करत, त्या लोकशाही व्यवस्थेबद्दल पूर्ण आदर बाळगत व दाखवत संघाने हे करून दाखविले आहे. ‘केला जरी पोत बळेंचि खालें ज्वाला तरी ते वरती उफाळे’ या न्यायाने संघाची सज्जनशक्ती पुन्हा जगासमोर आली.

देविदास देशपांडे



Powered By Sangraha 9.0