उच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दणका

17 Apr 2023 20:10:23
there-will-be-227-wards-in-mumbai-municipal-corporation-high-court-rejected-the-petition-of-thackeray-group

मुंबई
: सत्तेतुन पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत असून मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेला आव्हान देणारी ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा ठाकरे गटाला मोठा झटका मानला जात आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रभागांची संख्या २२७ इतकीच कायम राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्या. एम. डब्ल्यू. चंदवाणी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. याचिकेत काही तथ्य नसल्याची टिप्पणीही खंडपीठाने केली आहे.
 
राज्यात सत्तेत असताना मविआ सरकारने मुंबई महापालिकेत असलेली २२७ वॉर्ड संख्या वाढवून २३६ केली होती. हा नियम फक्त मुंबई महापालिकेसाठीच होता. कारण या महापालिकेसाठी वेगळा कायदा आहे. यानंतर फडणवीस-शिंदे सरकारने ही रचना बदलून पूर्वीचीच २२७ वॉर्ड संख्या कायम ठेवली होती.
 
या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणाची दखल घेऊन प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी १८ जानेवारी रोजीच पूर्ण झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर या प्रकरणी निकाल जाहीर करण्यात आल्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.



Powered By Sangraha 9.0