आयुर्वेदाप्रमाणे तारुण्यावस्था व प्रौढावस्था ही पित्तप्रधान अवस्था असते. या काळात, म्हणजेच वयात येतानाच्या मुला-मुलींमध्ये तेलकट त्वचा, मुरुमेयुक्त त्वचा, वर्णांच्या छटा इ. तक्रारी अधिक असतात. या वयातील पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ज्यांना तारुण्यपीटिका येतात, त्याची लक्षणे आणि परिणाम यांचा घेतलेला आढावा...
मागील लेखात वातप्रकृतीच्या व्यक्तींची स्वाभाविक त्वचा आणि प्रकृतीमधील त्वचेतील वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
पित्तप्रकृती असलेली व्यक्ती बहुदा गोरी असते. आयुर्वेदाने प्राकृत त्वचेचे चार वर्ण सांगितले आहेत. सित (गोरा), श्याम (सावळा), कृष्ण/आसित (काळा) व गव्हाळ. यामध्ये विविध छटा असतात. हे वर्ण भारताच्या भौगोलिक रचनेनुसार सांगितले आहेत आणि वर्णामध्ये सापेक्षेतेने बघणे गरजेचे आहे. उदा. दक्षिणेतील गोरा वर्ण हा उत्तरेतील गोरा वर्ण हा उत्तरेतील गोर्या वर्णापेक्षा वेगळा असू शकतो, तसेच जाती-धर्माच्या सापेक्षेतेनेही यातील छाटांमध्ये बदल आढळतो.
पित्ताधिक्य असतेवेळी त्वचेचा वर्ण बहुतांशी वेळेस गोरा ते निमगोरा असा असतो, जो गोरेपणाकडे अधिक झुकतो. लालबुंद गोरेपणा हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. उन्हात जाऊन आल्यावर गरम पाण्याने अंघोळ केल्यावर/ चेहरा धुतल्यावर किंवा रागावल्यावर लालबुंद चेहरा जो होता, तो बरेचदा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये होताना दिसतो. क्वचितप्रसंगी खूप काळा रंगही पित्तामुळे दिसतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्तीमधील त्वचेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे चेहर्यावर, मानेवर खूप तीळ असतात. त्वचेवर वर्ण क्वचितप्रसंगी एकसंग नसतो. तसेच शरीरात अत्याधिक उष्णता असल्यामुळे घामाचे प्रमाणही अधिक असते. घामाला विशिष्ट दुर्गंध असू शकतो आणि घामामुळे कपड्यांवर पिवळ्या रंगाचे डाग पडतात. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये, विशेषत: उन्हाळ्यात मुरुमे, फोड, गळू अधिक येतात, तसेच जखम झाल्यास ती चिघळते. त्यात पूनिर्मिती होणे, ती भरुन येताना जखमेचा डाग राहणे इ.चे प्रमाण अधिक असते. जखम, गळू, फोड इ. लालबूंद असतात.
जसा घाम जास्त येतो, तसाच चेहरा अधिक तेलकटही होतो. पितप्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा अधिक तेलकट व नाजूक असते. उन्हाचा त्रास त्वचेवर चटकन होतो. त्वचा तापणे, लालबूंद होणे, घाम येणे, अत्यधिक काळ धाम राहिल्यास अंगाला दुर्गंधी येणे, तीळ व अन्य बारीकसारीक डाग त्वचेवर असणे, जखम, इतर प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा अधिक लवकर चिघळणे इ. जर असेल, तर ती व्यक्तीपित्तप्रधान प्रकृतीची आहे, असे समजावे. आयुर्वेदाप्रमाणे तारुण्यावस्था व प्रौढावस्था ही पित्तप्रधान अवस्था असते. या काळात, म्हणजेच वयात येतानाच्या मुलांमध्ये (मुल-मुली दोन्ही) तेलकट त्वचा, मुरुमेयुक्त त्वचा, वर्णांच्या छटा इ. तक्रारी अधिक असतात. या वयातील पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ज्यांना तारुण्यपीटिका येतात, त्यांच्यामध्ये खालील वैशिष्ट्ये बघायला मिळतात. लालबूंद, आकाराने मोठ्या, त्यात बरेचदा भरपूर प्रमाणात पू असतो, स्पर्श केल्यास दुखतात व एकानंतर एक बरेचदा भरपूर प्रमाणात तारुण्यपीटिका येत राहतात. मुलींमध्ये मासिक पाळीच्या वेळेस या तारुण्यपीटिकेचे प्रमाण आणखीनच वाढते, तसेच, पुळ्यांना सतत स्पर्श केल्याने, त्या पुळ्या फोडल्याने त्याचे डाग व तारुण्यपीटिकांचे खड्डे तयार होतात व नंतरही ते बरेचदा भरून येत नाही.
पित्तप्रकृतीच्या व्यक्तींमध्ये स्वाभाविकत: लवकर वार्धक्याची लक्षणे उत्पन्न होतात, जसे त्वच्या सुरकुतणे, हे सापेक्षतेने लहान वयात होताना आढळते. त्वचा सुरकुतणे हे मुख्यत्वे करून चेहर्यावर सुरुवातीला जाणवते. त्या सुरकत्या उत्पन्न होण्याची तीन महत्त्वाची स्थाने आहेत. डोळ्यांच्या बाहेरच्या कोपर्यात, नाकाच्या दोन्ही बाजूंनी जीवणीपर्यंत व कपाळावर त्वचा सुरकुतू लागली की, सर्वांत प्रथम या तीन ठिकाणी होते. या पद्धतीने पित्तप्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा असते. काही विशेष काळजी, खबरदारी जर घेतली, तर वरील लक्षणांना आटोक्यात ठेवणे शक्य होते. म्हणजेच, वरील लेखात सांगितलेल्या विविध तक्रारींची सुरुवात जरा उशिराने व त्याची प्रकर्षता कमी प्रमाणात ठेवणे शक्य होते.
त्वचेची सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे त्याची स्वच्छता. उष्णता शरीरात अधिक असल्याने घामाचे प्रमाण अधिक असते व घाम अधिक चिकट असतो. अंग खाजते व खाजविल्यावर जखमा होऊ शकतात. या जखमा अधिक खोल/चिघळू शकतात. हे सगळं टाळण्यासाठी नियमित अंघोळ करणे अत्यावश्यक आहे. अंघोळ (विशेषत: उन्हाळ्यात) साध्या पाण्याने करावी. थंडीत व पावसाळ्यात ही खूप कडकडीत पाणी टाळावे. शारीरिक कष्टाचे, मेहनतीचे काम असल्यास, उन्हातून फिरण्याचे काम असल्यास, प्रवासात धूळ-धूर इ. संपर्क अधिक होत असल्यास, अंघोळ दिवसातून दोनदा करावी. खूप सुगंधित, रंगीत साबण व अन्य प्रसाधने वापरू नयेत, तसेच वारंवार प्रसाधने बदलण्याचेही टाळावे. कारण, पित्तप्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा नाजूक असते, संवेदनशील असते. एखाद्या प्रसाधनातील घटकाची अॅलर्जी होऊन ‘स्कीनरॅश’ व ‘अॅलर्जी’ होऊ शकते. तसेच, ‘मेक अप’ इ. खूप तेलकट नसावे. अशा प्रसाधनांनी त्वचेवरील रोमरेंद्र ‘ब्लॉक’ केली जातात, शरीरातील उष्णता व घाम आणि स्निग्धता अवरुद्ध होतात, ‘ब्लॉक’ होतात व यामुळे मुरुमे चटकन उत्पन्न होतात व एक लवकर पसरतात.
‘सनस्क्रिन’, ‘सनब्लॉक’ही ऑईली नसावे. नाहीतर वर सांगितल्याप्रमाणे अशा प्रसाधनांच्या वापरामुळे विविध त्वचेच्या तक्रारी उद्भवतात. त्वचेला खूप तीव्र रसायनांपासून सुरक्षित ठेवावे. उन्हात जाते वेळी ‘सनकोट’ घालावा, चेहरा सुती कापडाने गुंडाळावा व डोक्यावर गोल टोपी घालावी. उन्हात जाताना सुती कपडे, पूर्ण हाताचे कपडे व हलक्या रंगाचे कपडे घालावे, याने वातावरणातील उष्णता अधिक खेचली (शोषली जात नाही, घामदेखील त्वचेवर न राहता, कपड्यांमध्ये मुरतो. पूर्ण दिवस शारीरिक कष्ट/बाह्य वातावरणाशी जर संपर्क येत असेल, तर घरी आल्यावर अंघोळ करावी व स्वच्छ, सुती कपडे घालावेत. अशामुळे जखमा, इन्फेक्शन होणार नाही. (जखमा झाल्या असल्यास), चिघळणार नाहीत आणि स्रवणार नाहीत. आहारात, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत खूप चमचमीत, तिखट, तेलकट, खारट खाऊ नये. या आहाराने स्वाभाविकपणे वरील लक्षणांमध्ये वाढ होते. (कारण, या आहारामुळे पित्त वाढते.) तसेच, खूप उपाशी पोटीदेखील राहून शरीरात अत्यधिक उष्णता जर वाढली असल्यास ती कमी करण्यासाठी खालील उपचार / उपाय करावेत.
चेहर्याला/तळव्यांना चंदनाचा लेप लावावा. काळी किंवा संध्याकाळी दुर्वांवरुन/गवता वरुन चालावे. यामुळे अंगातील वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. पिण्याच्या पाण्यात वाळ्याचे गवत घालावे. चंदन, वाळा, गुलकंद, दूध आणि तूप, धणे-जिर्याचे पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत इ.ने शरीरातील पित्त शमते, त्याचा वापर करावा. तहान लागेल तेव्हा आणि लागेल तेवढेच पाणी प्यावे. पाणी पिताना बसून प्यावे (उभ्याने पाणी पिऊ नये) आणि तहान लागली की, तोंड आणि घशाला कोरड पडते. म्हणून पाणी पिताना भांड्याला तोंड लावून पाणी प्यावे. असे केल्याने तहान शमते व अतिरिक्त पाणी प्यायले जात नाही. फ्रीजचे पाणी पिणे टाळावे. त्यापेक्षा माठातले पाणी प्यावे. माठात वाळ्याच्या गवताची गुंडाळी टाकून ठेवावी. हे सुगंधी पाणी खूप गुणकारी आहे, विशेषत: पित्ताच्या उष्ण गुणाने होणार्या विविध व्याधींमध्ये.
अंगाची उष्णता कमी करण्यासाठी आयुर्वेदाने अजून एक बाह्य उपाय सांगितला आहे. माल्याधारण म्हणजे फुलांच्या माळांचे अंगावर/शरीरावर धारण करावे, घालावे. यामुळे शरीरातील व अतिरिक्त उष्णता तर शोषली जातेच पण, उष्णतेमुळे येणार घाम व त्याची दुर्गंधीदेखील झाकली जाते. स्थानिक पित्ताच्या तक्रारींसाठी जलौकावचरण व सार्वदैहिक पित्ताच्या विविध त्रासांसाठी ‘विरेचन’ व ‘रक्तमोक्षण’ ही पंचकर्मे आयुर्वेदामध्येसांगितली आहेत, सुचवली आहेत.त्याचा अवलंब करावा.
याचबराबेर अकारण चीडचीड, त्रागा, भांडण- तंटाही टाळावेत, यानेही पित्ताचा प्रकोप होतो व त्याचा त्वचेच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो. (क्रमश:)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९