चरैवेति चरैवेति...

17 Apr 2023 21:00:58
Amey Katdare

वस्तीपातळीवर विकासात्मक काम उभे राहावे, यासाठी डोंबिवलीमध्ये लोकसहभागातून सातत्याने कार्यरत असलेले अमेय काटदरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा मागोवा...

"माझ्या आयुष्यात या ‘चरैवेति...चरैवेति’ संकल्पनेला खूप महत्त्व आहे. डोंबिवलीचे अमेय काटदरे सांगतात. जबरदस्त संघटन कौशल्य आणि नियोजनाची क्षमता असलेले अमेय काटदरे. बीई इलेक्ट्रिक अभियंता असलेले अमेय डोंबिवली परिसरातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. विविध आयामांतून समाजातील गरजूंसाठी मदतीचा हात उभा करण्याचे त्यांच्या कौशल्यामुळे डोंबिवलीमध्ये त्यांची समाजशील युवक म्हणून ओळख आहे. आधुनिक युगात समाजासमोर अनेक प्रश्न नव्याने उभे राहिले आहेत. या प्रश्नांना संघटित समाजच पुरून उरेल, याची जाणीव अमेय यांना आहे. त्यामुळे परिसरातील अनेक समस्यांना लोकसहभागातून सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.या नि:स्वार्थी सेवेचे बीज त्यांच्यात कुठे रूजले तर? त्यांचे वडील मधुकर आणि आई मनाली अतिशय शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत दाम्पत्य. घरी आर्थिक सुबत्ता नसली, तरी सांस्कृतिक संस्कार वैभव होते. मधुकर नेहमी अमेय यांना सांगत, ”व्यर्थ उधळपट्टी करायची नाही. मात्र, वेळ पडली तर गरजूंना मदत करायची.” ते नुसते बोलायचेच नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतही तसेच वागायचे. एका नातेवाईकाला त्याच्या मुलीच्या लग्नात पैसे कमी पडले होते.

मोठा बाका प्रसंग होता. त्यावेळी मधुकर यांनी पै-पै करून काढलेली ‘एफडी’ मोडली होती. माणुसकीने दुसर्‍याच्या गरजेला उभे राहणे महत्त्वाचे, हे संस्कार अमेय यांना घरूनच मिळाले. दुसरीकडे मनाली यांच्या माहेरी रा. स्व. संघाचे वातावरण. त्यामुळे अमेय यांनी शाळेत जाणे जितके आवश्यक तितकेच संघाच्या शाखेत जाणेही आवश्यकच, असे मनाली यांचे मत. त्यामुळे अमेय बालपणापासून संघाच्या शाखेत जाऊ लागले. खेळ, गाणी, बौद्धिक यातून त्यांच्यावर देवदेशधर्माचे माणुसकीचे संस्कार तिथेही घडतच होते. त्यांनी लहानपणापासूनच ठरवले होते की, अभियंता बनायचे. सगळे ठिकठीकाच होते. बारावीनंतर ते अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरीला आले आणि एक दिवशी ती घटना घडली. मनाली यांचे अपघाती निधन झाले. आईच्या मृत्यूने अमेय हादरून गेले. ते दु:ख विसरण्यासारखे नव्हतेच. मग २०-२१ वर्षांच्या अमेय यांनी विविध सामाजिक उपक्रमामध्ये स्वत:ला झोकून दिले. रत्नागिरीमध्ये विद्यार्थी क्षेत्रात, तर डोंबिवलीत आल्यावर रा.स्व.संघाच्या आयामांतून ते विविध समाजकार्यात सहभागी झाले.

डोंबिवलीमध्ये संगीता वाडी आहे. या परिसरात साधारण २५० इमारती आहेत. हजारो कुटुंब या इमारतीमध्ये राहतात. हिंदूबहुल वस्ती. आपले काम भले की आपण भले. या परिसरात प्रत्येक इमारतीचे आपापले प्रश्न होते. वस्ती म्हणून परिसराचे विशिष्ट प्रश्न होते, समस्या होत्या. पण त्या समस्या सोडवायच्या कुणी? प्रत्येक जण कामात किंवा त्या समस्या सोडविण्यासाठी कुणी वैयक्तिकरीत्या जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न. मग ती समस्या सांडपाण्याची असू दे, पाण्याची असू दे, स्वच्छतेची असू दे वा विजेच्या खांबांची असू दे. या समस्या सार्वजनिक होत्या. लोकसहभागातून त्या सुटणार होत्या. अमेय यांनी सहकार्‍यांच्या सोबत विचारविनिमय करून परिसरातील प्रत्येक इमारतीमध्ये ते गेले. तेथील इमारतीच्या समितीशी बोलले. संवाद साधण्याचा विषय एकच होता तो म्हणजे, परिसरातील २५० इमारतींनी एकत्र येऊया. काहीही समस्या असतील, तर त्या मिळून सोडवूया. परिसरात एकही नकारात्मक घटना घडू नये, परिसराचा विकास व्हावा यासाठी एकत्रितपणे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्या इमारतींची मिळून एक संघटन स्थापन करू. या संघामध्ये २५० इमारतींमधील प्रत्येक इमारतींच्या समितीतील एक पदाधिकारी सहभागी असेल. अशा प्रकारे २५० व्यक्तींचा एक संघ तयार होईल. अशा प्रकारे २०१३ साली संगीतावाडी, रघुवीर नगर रहिवासी संघ निर्माण झाला.
 
या संघाची एक कोअर टीम आहे, त्यात सागर घोेणे, रूपक पांडे, अजय शहा, गोरे मॅडम, आदित्य साठे, कुशल देवळेकर, प्रशांत जोशी, विवेक भोसले, उमेश पाटील असे सहकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून परिसरामध्ये विकासात्मक रचनात्मक कार्य होत आहेत.अमेय म्हणतात, या संघाची स्थापना करण्याची प्रेरणा रा. स्व. संघाच्या विचारकार्यातूनच मिळाली. रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अप्पा जोशी तसेच अनिल भालेराव यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. याच आयामातून अमेय यांनी आणखीन एक संकल्पना कार्यान्वित केली. ती म्हणजे, लोकसहभागातून विधायक, नि:स्वार्थी कार्य करणार्‍या वसतिगृहांना आवश्यकतेनुसार वस्तू आणि अन्नधान्य पुरवणे. दसरा ते दिवाळी दरम्यान धान्य आणि वस्तू गोळा करायच्या आणि त्या दिवाळीदरम्यान गरजू संस्थांना वितरित करायच्या. पहिल्या वर्षी ७० ते ८० किलो धान्य गोळा झाले. आज या संकल्पनेला डोंबिवलीकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दसरा ते दिवाळी दरम्यान १५०० किलो विविध प्रकारचे धान्य आणि आवश्यक वस्तू जमा होतात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचे संस्थांना वितरण केले जाते. अमेय म्हणतात, “पुढच्या काळातही समाजासोबत राहून समाजासाठीच काम करायचे आहे. मग परिस्थिती कशीही असो. कार्य छोटे किंवा मोठे नसते, तर त्यामागचा भाव आणि कार्यकारण महत्त्वाचे.” या परिघात अमेय यांसारख्या तरुणांचे काम समाजाला दिशादर्शकच आहे.


 
Powered By Sangraha 9.0