बोरघाटात अपघात प्रवण क्षेत्रात संरक्षक कठडे उभारण्याच्या कामाला सुरुवात

16 Apr 2023 21:09:10
Protective ramparts will be erected in accident prone areas in Borghat

खोपोली :
बोरघाटात शनिवारी (दि. १५ एप्रिल) पहाटे ढोल-ताशा पथकाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निश्चित करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅरिगेटिंग करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले होते. त्यानुसार रविवार, दि. १६ एप्रिल रोजी सकाळी बैठक होऊन सुरक्षेच्या उपायांच्या दृष्टीने आढावा घेतला गेला व त्यानंतर लगेचच ‘आयआरबी’ने त्याठिकाणी क्रॅशबॅरीयर्स बसवण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली.
 
बोरघाटात अंडा पॉईंट, शिंग्रोबाच्या वरच्या खिंडीपासून ते टाटा कॉलनी, सायमाळपर्यंत उतारावर अनेकदा बस, अवजड वाहने, रिक्षा पलटी होऊन अनेक माणसे दगावल्याची उदाहरणे आहेत. डिसेंबर-जानेवारीमध्ये तीन बस पलटी झाल्या होत्या. शाळकरी मुलांच्या सहलीची बसही पलटी झाली होती. त्यामध्ये दोन विद्यार्थी दगावले होते. या प्रत्येक वेळेला व त्यापूर्वीच्या अनेक वर्षातील शेकडो अपघातांमध्ये फक्त सुरक्षेच्या कारणांवर चर्चा होत असे. पण, कालच्या गंभीर घटनेनंतर आणि मुख्यमंत्री थेट घटनास्थळी दाखल झाल्यानंतर व त्यांचे आदेश आल्यानंतर २४ तासाच्या आत कामाला सुरुवात झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये काहीसे समाधान आहे. तसेच, शॉर्टकट म्हणून वाहनचालक चुकीच्या पद्धतीने येतात, तो रस्ताही बंद करण्यात येणार आहे. संरक्षक कठडे बसवण्याबरोबरच ज्या ठिकाणी धोकादायक वळणे कमी करता येतील, त्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0