कार्याचा तो सन्मान!

महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

    16-Apr-2023
Total Views |
Dr. Appasaheb Dharmadhikari


खारघर
: ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा रविवारी प्रचंड उत्साहात झाला. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यासह अन्य भागांतुनही लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. मात्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कारात मिळालेली मानधनाची २५ लाख रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची मोठी घोषणा केली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.
 
हा भव्य कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्यांनी तयारी केली होती. या कार्यक्रमात आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मनुगंटीवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्ती सागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वात मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे. निरुपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात तसं ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करता तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांने होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

 
डॉ. सचिन धर्माधिकारी म्हणाले की, मन, मानव व मानवता या विचारातून कार्य सुरू आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते. चांगले संकल्प केले तर मानव व मानवतेचे विचार येऊ लागतात. सत्याचा संकल्प आला तर मानवतेचे दया, शांती, प्रेम हे विचार येऊ लागतात. हे विचार आले नाही तर समाजात हिंसा होते आणि हे समाजासाठी भयानक आहे. मन, मानव व मानवता हे सूत्रच बैठकीत दिले जाते. प्रशासन व सदस्यांच्या समन्वयातून एवढा मोठा कार्यक्रम होत असल्याचे ते म्हणाले. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले.