दिवा डम्पिंगच्या मोकळ्या जागेसाठी दावेदारी

14 Apr 2023 07:01:57
BJP against Diva dumping


ठाणे
: अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिवा डम्पिंग कायमचे बंद झाले. दिव्यातील ही कचऱ्याने व्यापलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरु करताच मोकळ्या होणाऱ्या या जमिनीसाठी दावेदारी सुरु झाली आहे. त्यामुळे येत्या काळात जमिनीसाठी दिव्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठाणे शहरातील कचरा टाकल्या जाणाऱ्या दिवा डंपिंगमुळे दिवावासीय त्रस्त झाले होते. याविरोधात भाजपच्या नेतृत्वाखाली दिव्यातील नागरिकांनी वारंवार आंदोलने केली होती. भाजपच्या प्रयत्नाना अखेर यंदा जानेवारी अखेरीस यश मिळुन दिवा डंपिंग कायमचे बंद झाले. तेव्हा, कचर्याने व्यापलेली ही जमीन पूर्वी जशी होती तशीच मोकळी करुन दिली जाणार आहे. त्याचा सविस्तर आराखडा ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन तयार केला जात असुन यासाठी सुमारे ६५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यासाठी ४० कोटींचा खर्च केंद्राकडून अपेक्षित धरण्यात आला आहे. तर महापालिका त्यात २५ कोटींचा खर्च करणार आहे. परंतु मोकळ्या होणाऱ्या या जागेवर आतापासूनच अनेकांनी हक्क सांगण्यास सुरवात केली आहे.वनविभागाने ही जागा आपली असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे काही नागरीकांनी देखील यातील जमीन आपली असल्याचा दावा केला आहे. तर काही भूमिपुत्रांनी या जमिनीवर दावेदारी केली आहे.त्यामुळे भविष्यात ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता असुन यावरुन संघर्षाची ठीणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0