हैदराबाद : तेलंगणातील वारंगल येथील एका ऐतिहासिक हिंदू मंदिरातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक मंदिरात ख्रिश्चन प्रार्थना करताना दिसले. आता या प्रकरणी पाद्री गंधम अरुण कुमार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात मांसाहार दिल्याचाही आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी हा देवतांचा अपमान असल्याचे म्हटले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेची माहिती एका नॉन प्रॉफिट एक्टिविस्ट ग्रुप 'लीगल राइट्स प्रोटेक्शन फोरम' ने ट्विटरवर शेअर केली आहे. मंदिरातील ख्रिश्चन प्रार्थनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपनिरीक्षक डी.सांबय्या यांच्या तक्रारीवरून पुजारी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित पाद्री अरुण कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध कलम २९५-ए, १५३ए, १५३बी, ५०४, ५०५ आर/डब्ल्यू ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या मंदिराचा व्हिडिओ व्हायरल झाला ते वारंगल किल्ल्यातील आहे. हे काकतीय घराण्याने बांधले होते. हे मंदिर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. त्याची देखभाल तेलंगणा एंडॉमेंट्स विभागाकडून केली जाते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाद्री आणि त्याच्या साथीदारांवर कारवाईची मागणी करत आंदोलन केले. हा हिंदू देवतांचा अपमान असल्याचे सांगण्यात आले.
हिंदू संघटनेच्या लोकांनी या प्रकरणाची तक्रार डीसीपी श्रीकांत राव आणि एसीबी रमाला सुनीता यांच्याकडे केली होती. तसेच मंदिरात ख्रिश्चन सभा, प्रार्थना आणि मांसाहार करणे हे धार्मिक अशांतता पसरवण्याचे पाऊल आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा हिंदू संघटनांनी दिला होता.