राजकीय विषयांवर भाष्य करणारी नाटके व्हायला हवीत! : विजय केंकरे

13 Apr 2023 08:00:58
Vijay Kenkre interview
 
येत्या रविवारी, १६ एप्रिल रोजी होणार्‍या नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी जेष्ठ रंगकर्मी व दिग्दर्शक विजय केंकरे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या परिषदेच्या माध्यमातून नाट्यसृष्टीसाठी त्यांची काय उद्दिष्टे आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी मृगा वर्तक यांनी साधलेला संवाद..
नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे राहावे असे का वाटले?


-नाट्यपरिषद ही मातृसंस्था आहे. आणि म्हणूनच नाट्यपरिषद सर्व रंगकर्मींना एकत्र आणून विविध कामं करू शकते असे मला वाटते. मला कित्येकदा वाटत या कार्यात बाहेरून मदत करावी, परंतु ते नेहमीच जमतं असं नाही. जबाबदारी आली की आपणही त्यात स्वतःला झोकून देतो.

निवडून आलात तर नाट्य परिषदेच्या माध्यमातून रंगभूमी साठी काय करण्याचा विचार आहे?

- केवळ रंगभूमीसाठी नव्हे रंगकर्मींसाठीही कामं करणे गरजेचे आहे. दरवर्षी एक नाट्यसंमेलन होतं. इमारत बांधून पूर्ण झाली की कामं संपतनाही, तेव्हापासून ते सुरु होतं. ही तर सुरुवात आहे, अजून बरेच काम कारण्याची गरज आहे. अभिनयाचं शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी विद्यापीठांतून बाहेर पडतात. आपण म्हणतो, हे सर्व कोर्सेस व्यावसायिक आहेत. परंतु आपण उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची हमी देऊ शकत नाही. परिषद ही अशी संस्था आहे, जिच्या माध्यमातून रेपोर्टरी उभी करू शकलो, त्यात जर २५ मुले आली तर त्यांना केवळ या क्षेत्रात पुढे घेऊन जाता येईल. परिषदेने अशीही कामे करणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारच्या अनेक नाट्यविषयक योजना आहेत परंतु कलाकारांना त्याबद्दल काही मर्यादेपलीकडे माहितीच नाही. या योजनांचा लाभ घेतल्याने काही निर्मात्यानाच नव्हे तर संपूर्ण नाट्यसृष्टीलाच त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्याकडे या क्षेत्रात करियर घडवू पाहणार्‍यांसाठी शिष्यवृत्त्या नाहीत. परिपूर्ण वाचनालये नाहीत, या सर्व सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे असे मला वाटते. या सर्वच गोष्टीत मातृसंस्थेने लक्ष घालणे गरजेचं आहे. यात वेतन योजनेचाही अंतर्भाव करता येऊ शकतो. केंद्र सरकारकडून पडद्यामागच्या कलाकारांसाठी वेतन सुरु करता आले तर त्यानेही केवळ एका निर्मात्याला नाही तर संपूर्ण नाट्यसृष्टीला त्याचा फायदा होऊ शकेल. या योजनेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न असणार आहे.


आज चित्रपटांपेक्षाही रसिक नाट्यगृहांत गर्दी करतात. परंतु काही प्रायोगिक पठडीतील वाटणारी नाटकेही अपूर्ण नियोजनाने व्यावसायिक रंगमंचावर उतरतात. अशावेळी रसिकांचा हिरमोड होतो. या नाटकांसाठी काही नियंत्रण संस्था असावी असे तुम्हाला वाटते का?

 
- कोणत्याही प्रकारची कंट्रोलिंग बॉडी किंवा नियंत्रण संस्था असू नये हे माझे वैयक्तिक मत. मी माझी कला कोणत्याही माध्यमातून दाखवली, तर ती करा किंवा करू नका हे सांगणारी व्यवस्था लागतेच कशाला? प्रत्येकाला आपण काय पोहोचवतोय प्रेक्षकांकडे याची जाणीव असायला हवी. आणि ती असते. कलाकाराच्या या जाणिवेवर माझा विश्वास आहे. त्यामुळे याची चिकित्सा कुणीही करावी असे मला वाटत नाही. ज्याला जे हवे त्याने ते करावे.
 
आज वृत्तपत्रातून सहज नजर फिरवली तरी हलकी फुलकी, विनोदी नाटके दिसतात. तुलनेत वैचारिक, राजकीय आणि समाजप्रबोधनपर नाटकांचे प्रयोग फारसे होताना दिसत नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे?

- हे अर्धसत्य आहे. या विधानालाच माझा विरोध आहे आणि एक खंतही आहे. सांगतो. मुळात आज फक्त विनोदी आणि हलकीं फुलकीच नाटकं होतात असे मला वाटत नाही. एक काळ होता ज्यावेळी केवळ विनोदी नाटके होत होती. पण, आजच्या विनोदी नाटकांतूनही सामाजिक विषयांवर भाष्य केलं जातंय. ‘संज्या छाया, हरवलेल्या पत्त्याचा बांगला, ३८ कृष्ण वीला, देवबाभळी’ अशी कित्येक उदाहरणे घेता येतील. ही सर्व आजची नाटके आहेत. आणि या सर्वात आपण सस्पेन्स थ्रिलर नाटकांना कुठे ठेवतोय? ‘आज अडलंय का, देवमाणूस’ यासारखी नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर होतात. हे एक पुढचं पाऊलच आहे. पुन्हा तुझ्या प्रश्नच उत्तर देतो, अर्थात दुरावलेला प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे कोणत्या प्रकारच्या नाटकांतून वळेल त्यासाठी काही विषय निवडावे लागतात. तरीही एक खंत मात्र आहे. राजकीय विषयांवर भाष्य करतील अशी नाटकं मात्र आता होताना दिसत नाहीत. ती संख्येने अधिक व्हायला हवीत. त्यात छान वाद-विवाद असूदेत की, ज्या प्रमाणात ती बंगाल मध्ये होतात तेवढ्या मोठा प्रमाणात ती आपल्याकडे होत नाहीत. हेही तेवढेच खरे.




 
Powered By Sangraha 9.0