मुंबई : सरकारने विधवा महिलांना गंगा भागिरथी असं बोलण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सध्या चर्चेत असताना महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर खुलासा केला आहे. “जी काही नावं आली आहेत ती नावं चर्चेसाठी पाठवली आहेत. याबाबत काही निर्णय झाला नाही. माझा पुढाकार नाही. महिला आयोगाने पुढाकार घेतला. त्यांनी चार नावं सूचवली आणि आणखी काही लोकांनी नावं सूचवली. तेच नावं मी विभागाला चर्चेसाठी पाठवली.” असं लोढा यांनी सांगितलं आहे.
“विधवा महिलांच्या नावापुढे काय शब्द वापरावे याबाबत चर्चा होती. यामध्ये गंगा भागीरथी असा शब्दही सूचवण्यात आला होता. मी सर्व नावे विभागाकडे चर्चेसाठी पाठवले. पण याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अजून कुठलाही जीआर काढण्यात आलेला नाही. याबाबत काहीच निर्णय झाला नाही. एक पत्र आलं. ते पत्र फॉरवर्ड झालं. त्यामध्ये काय झालं? पूर्वीपण एक पत्र आलं होतं. तेही फॉरवर्ड केलं, आता हे पत्रसुद्धा फॉरवर्ड केलं.” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
“महिलांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. त्यामध्ये या प्रश्नाचा काही संबंध नाही. हा प्रश्न देखील नाही. आमच्याकडे मंत्र्यांना काही पत्र पाठवली जातात. तसंच हे पत्र मी विभागाला पाठवलं. ते पत्र चर्चेसाठी पाठवलं आहे. तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारा. त्यांनी नाव बदलण्यास सांगितलं होतं. त्यांनी नावं सूचवली होती. हा माझा पुढाकार नाहीय. महिला आयोग आमच्या सरकारचा भाग आहेत. त्यांनी जे पत्र दिलं ते पत्र मी पाठवलं. आणखी काही संघटनांनी पत्र पाठवलं ते पत्र मी विभागात पाठवलं.” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.