मुंबई (प्रतिनिधी) : नुकतंच भारताने प्रोजेक्ट टायगरची पन्नाशी गाठली. याचा आनंदोत्सव तर भारतभर साजरा झालाच शिवाय वेगवेगळ्या माध्यमातुन याच्या बातम्याही आल्या. या निमित्ताने भारतातील पहिल्या दहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये पेंच, ताडोबा, मेळघाट, नवेगाव नागझिरा, सह्याद्री आणि बोर असे एकुण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यातील गुणांकने लक्षात घेतली तर पेंच हा आठव्या क्रमांकावर येणारा व्याघ्र प्रकल्प आहे, जो सर्वोत्तम या दर्ज्यामध्ये येतो. यामागोमाग, ताडोबा १४व्या, मेळघाट १६व्या, नवेगाव नागझिरा २०व्या, सह्याद्री २७व्या तर बोर व्याघ्र प्रकल्प २९व्या क्रमांकावर स्थान मिळवले.
२०२२ च्या सर्वेक्षणानुसार भारतात असलेल्या ५० हुन अधिक व्याघ्र प्रकल्पांपैकी नागपुरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पाला ८ वे स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात असलेला पेंच व्याघ्र प्रकल्प २९२.८५ चौरस किलोमिटर एवढ्या परिसरात पसरलेला आहे. तसेच, दोन राज्यांमधुन जाणारा हा भारतातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे.