मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद पवार अभिनय , दिग्दर्शनाबरोबरच आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातील कारकिर्दीसाठी सुपरिचित आहेत. रंगभूमी क्षेत्रातील त्यांचे योगदानही वाखाणण्याजोगे आहे. नुकतीच त्यांची संगीत नाटक अकादमीच्या नाटक विभागाच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली. तसेच, संस्कार भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ते नाटक विधेचे प्रमुख संयोजक म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांनी अनेक नाटकांतून आपली छाप प्रेक्षकांवर पडली. झुंज, टिळक आणि आगरकर अशा अनेक विषयांवरची नाटके त्यांनी केली. आर्य चाणक्य, रायगडाला जेव्हा जाग येते, फक्त लढ म्हणा, इथे ओशाळला मृत्यू, जाता नाही जात, अनन्या ही आता आता गाजलेली त्यांची नाटके. या नाटकांतून भूमिका करत त्यांनी जनमनावर राज्य केले. गेली २० वर्षे संगीत नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन यासाठी मुंबई मराठी साहित्य संघ, नेहरू सेंटर यांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. संगीत नाटक अकादमीने केलेली नियुक्ती हा त्यांच्या आजवरच्या रंगभूमीसाठी केलेल्या कार्याचा गौरवच म्हणता येईल.