ठाणे : महापालिकेचे सार्वजनिक रुग्णालय दिव्यात तातडीने सुरू करून येथील माता भगिनी व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. या मागणीसाठी आ. संजय केळकर व भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने सोमवारी (दि.१०)दिवा बी.आर. नगर ते दिवा प्रभाग समिती असा मोर्चा काढुन धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
दिवा विभागाची लोकसंख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढली असून स्वस्त दरात घरे उपल्बध होत असल्याने येथे सोईसुविधांवर ताण पडत आहे. लोकसंख्या वाढली असुनही दिव्यात ठाणे महापालिकेचे एकही रुग्णालय किंवा आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना थेट कळवा अथवा डोंबिवली गाठावे लागते.दिव्यात पालिकेचे रुग्णालय व आरोग्य केंद्र व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे अनेकदा मागणी व आंदोलनेसुद्धा करण्यात आली.
मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. महापालिकेच्या विकास आराखड्यात रुग्णालयासाठी राखीव असलेल्या दिवा आगासन रोडवरील मौजे दातीवली सर्व्हे क्रमांक १४० हिस्सा नंबर ३ या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे.याबाबत भाजपने पालिकेकडे तक्रारी करूनही कारवाई केली नाही.तेव्हा, दिव्यात पालिकेचे सुसज्ज रुग्णालय व्हावे, या मागणीसाठी सोमवारी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. सायंकाळपर्यंत या महिलांनी प्रभाग समिती कार्यालय येथे धरणे आंदोलन केले.
जोपर्यंत सुसज्ज रुग्णालय होत नाही तोपर्यंत तातडीने उपलब्ध असणाऱ्या पालिकेच्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू करावे. अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.शेकडो महिला आरोग्याच्या प्रश्नावर या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या मोर्चात भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती राजकांत पाटील, शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर आदीसह अनेक पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.