संघाच्या नावे व्हायरल होणारे ते पत्र ‘फेक’ – सुनील आंबेकर

    11-Apr-2023
Total Views |
fake-letter-being-circulated-in-the-name-of-rashtriya-swayamsevak-sangh

नवी दिल्ली
: हिंदूंनी मुस्लिम मुलींशी विवाह करून त्यांचे धर्मांकरण करावे, असा मजकूर असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावे व्हायरल होणारे पत्र बनावट आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी मंगळवारी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि फेसबुक या समाजमाध्यमांवर रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या नावे एक बनावट पत्र व्हायरल केले जात आहे. त्या पत्रामध्ये, हिंदू मुलांनी मुस्लिम मुलींना महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, विद्यापीठे, कार्यालये आणि समाजमाध्यमांच्याद्वारे प्रेमाचे जाळ्यात अडकवावे. त्यांच्यासोबत शारिरिक संबंध प्रस्थापित करून त्यांना त्यांच्या कुटुंबास सोडून पळून येण्यास भाग पाडावे. त्यानंतर या मुस्लिम मुलींचे धर्मांतरण घडवावे, असे करणाऱ्या हिंदू मुलांना ५ लाख रूपये देण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.

मात्र, अशा प्रकारचे पत्र हे पूर्णपणे खोटे असल्याचे रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.