स्वकर्तृत्वाचा प्रकाश...

11 Apr 2023 21:02:19
Prakash Joshi
 
मूळ अमरावतीचे प्रकाश भास्कर जोशी, आता नाशिकमध्ये स्थायिक झाले. विद्वता, व्यासंग आणि कर्तृत्व याआधारे त्यांनी समाजात स्थान मिळवले. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...

'हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक कंपनी’चे ‘असिस्टंट इंजिनिअर’ आणि पुढे ‘अ‍ॅडिशनल मॅनेजर’ पदावरून नियुक्त झालेले प्रकाश जोशी. ‘सुखोई फायटर एअर क्राप्ट’ या प्रोजेक्टचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहिली, तर अभियांत्रिकी शाखेचे पदव्युत्तर शिक्षण, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, डेन्मार्क येथून ‘ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी लीडरशिप’ हा कोर्स, तर सिडनी येथून ‘सकारात्मक मानसशास्त्र’ आणि ‘बौद्धिक आरोग्य’ या विषयाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पुढे जगभरातल्या अनेक देशांत भ्रमंती केली. हे सगळे करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो की इतर सहकार्य असो, प्रकाश नेहमीच अग्रेसर. आज नाशिक शहरात सुस्थापित, सर्वार्थाने संपन्न आयुष्य जगणार्‍या प्रकाश यांचे आयुष्य सरळ रेषेत गेले का?
 
जोशी कुटुंब मूळ अमरावती येथील येवती गावचे. भास्कर जोशी आणि प्रभावती यांना सात अपत्ये. त्यापैकी एक प्रकाश. भास्कर हे भिक्षुकी करत. घरची आर्थिकता यथातथाच.त्या पंचक्रोशीत जोशी यांचे एकमेव ब्राह्मणाचे घर. गावात सलोखा. पाचवीत असताना प्रकाश यांना ‘शिवलिलामृत’, ‘रामायण’, ‘महाभारत’ संस्कृतमधून ‘सत्यनारायण पूजा’, ‘प्राकृत गीता’ हे सगळे अगदी मुखोद्गत होते. पंचक्रोशीमध्ये ते पूजापाठ करण्यासही जात असत. प्रकाश यांनी चांगले शिक्षण घ्यावे, म्हणून प्रभावती यांनी त्यांना मोठ्या भावाकडे अकोल्याला शिकायला पाठवले. त्यांचा मोठा भाऊ सुबोध छोटीमोठी कामे करून स्वत: शिक्षण घेत होता आणि भावंडांच्या शिक्षणाचा खर्चही उचलत होता. या दादाच्या आणि इतर भावंडांचे कर्तृत्व आणि संघर्ष पाहून प्रकाश खूप काही शिकले.

असो, प्रकाश यांच्या शाळेच्या बाजूलाच रा. स्व. संघाची शाखा लागे. देशमुख नावाचे संघशिक्षक मुलांना खेळ शिकवत. खेळायला मिळेल म्हणून प्रकाश संघशाखेत जाऊ लागले. तिथेच विचारांची दिशा स्पष्ट झाली. प्रकाश दहावीला असतील, त्याच काळात इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. रा. स्व. संघाने या लोकशाहीविरोधी कृत्याला विरोध केला म्हणून संघ स्वयंसेवकांची धरपकड सुरू झाली. प्रकाश यांचे दहावीचे वर्ष होते. प्रतिकुल परिस्थितीमधून ते शिक्षण घेत होते. हे सगळे संघाचे ज्येेष्ठ पदाधिकारी जाणून होते. त्यामुळे रा. स्व. संघाचे तत्कालीन जिल्हा प्रचारक प्रकाश यांना म्हणाले, “बाळ, तुझे महत्त्वाचे वर्ष आहे. अभ्यास कर. तुझ्यासाठी काही निरोप असेल तर सांगू, तोपर्यंत घर आणि शाळा याव्यतिरिक्त दुसरीकडे लक्ष देऊ नकोस.” त्यांचे वक्तव्य ऐकून प्रकाश थोडे हिरमुसले. पण, वरिष्ठांचे म्हणणे त्यांनी टाळले नाही.

पुढे प्रकाश यांनी दहावी आणि बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळवले. त्यानंतर यवतमाळ येथे अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. इथे ग ते दोन विद्यार्थ्यांसोबत एक खोली भाड्याने घेऊन राहू लागले. तिघांचीही आर्थिक परिस्थिती सारखीच. मग हे तिघेही जण खाणावळीतून दोन डबे आणायचे आणि रात्री एकदाच संध्याकाळी तिघेजण हे दोन डबे वाटून घ्यायचे. या चार वर्षांत त्यांनी ना शिकवणी लावली, ना एकही पुस्तक विकत घेतले. महाविद्यालयाच्या वाचनालयातल्या पुस्तकावरच त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेणे सुरू केले. तिथे त्यांना ६०० रूपये स्कॉलरशिप मिळू लागली. आपल्या भावाने आपल्याला शिकवले, आपणहीलहान भावाला शिकवायचे, या उद्देशाने त्यांनी स्कॉलरशिपमधून लहाण भावाच्या शिक्षणाचा खर्च उचलला. पुढे त्यांना नोकरी लागली. या काळात अमेरिकेत जाऊन पीएच.डी करावी असे त्यांनी ठरवले. पण, परदेशात पीएच.डी करण्यासाठी प्रवेश परीक्षा होती. त्यामध्ये इंग्रजी भाषा उत्तमरित्या येणे अनिवार्य होते. मराठी भाषेतून शिकलेले आणि ग्रामीण भागातच राहिलेल्या प्रकाश यांनी दोन वर्षे इंग्रजी शिकण्यासाठी अक्षरश: खर्ची घातली.

अत्यंत खडतर परिश्रमाने ते परीक्षेत पास झाले. पण, अमेरिकेचा प्रवास, तिथे राहणे आणि इतर शैक्षणिक खर्च याचा ताळमेळ जमला नाही. त्यामुळे त्यांना अमेरिकेला जाता आले नाही. त्यावेळी त्यांना क्षणभर वाईट वाटले, पण क्षणभरच. आर्थिक स्थिती मजबूत व्हावी म्हणून चांगली नोकरी ते शोधू लागले. त्यातूनच नाशिकमध्ये ‘हिंदुस्थान ऍरोनॉटिक लिमिटेड’मध्ये नोकरी लागली. इथे नोकरी लागल्यानंतर त्यांच्या मनात आले की, आपण देशाच्या सुरक्षिततेच्या महत्त्वाच्या आयामासाठी काम करतो. आपण मातृभूमीचे ऋण फेडू शकत नाही. निदान या कारणाने तरी उतराई होऊ. त्यांनी आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा उपयोग आपल्या कामातून देशासाठी उपयोगात आणला. याच काळात कतृत्ववान उच्चशिक्षित प्राची यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रकाश आपल्या आयुष्याबद्दल म्हणतात, “आपण एकटे नाही, तर आपल्यासोबत एक ईश्वरी शक्ती आहे. आपला धर्म,समाज ,कुटुंब आहे, ही भावना मनात होती. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचे दु:ख वाटले नाही.” प्रकाश यांच्यासारख्या व्यक्ती परिस्थितीपुढे शरण जात नाहीत, तर आहे त्या परिस्थितीतून स्वत:चे विश्व निर्माण करतात. समाजासमोर आदर्श प्रस्थापित करतात.



 
Powered By Sangraha 9.0