आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर

10 Apr 2023 22:08:30
rte-admission-announced-education-department
ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ठाण्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्हातील ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झालेली आहे, अशा बालकांच्या पालकांनी १३ ते २५ एप्रिलपर्यंत पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
आरटीई अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील वंचित, दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.ठाणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता ६२९ पात्र शाळांमधुन १२ हजार २६७ जागा उपलब्ध आहेत. तेव्हा, ज्या बालकांची पहिल्या यादीमध्ये निवड झाली आहे, अशा बालकांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएसही आला असेल.
त्यांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका अथवा महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रथम पडताळणी समितीकडून पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी ३० एप्रिलपर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकांचा प्रवेश घ्यावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करावीत.
एसएमएसवर न विसंबता स्वतः पडताळणी करा
प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस प्राप्त झाले असतील. परंतु, फक्त एसएमएसवर विसंबून न राहता आरटीई पोर्टलवर 'अर्जाची स्थिती ' या टॅबवर अर्ज क्रमांक टाकुन आपल्या पाल्याची निवड झाली आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. अशा सूचना शिक्षण विभागाने पालकांना दिल्या आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका / मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0