शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, सरकार पूर्ण मदत करणार

10 Apr 2023 20:55:54
chandrashekhar-bawankule

नाशिक
: नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू, मकासह डाळिंब पिकांचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी आज पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला. झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे हताश होऊ नका, राज्य सरकार मदत करून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार, अशी ग्वाही आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कळताच ते सटाणा तालुक्यातील लखमापूर शिवारातील शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे पिकाचे झालेले नुकसान व इतर बाबी मांडल्या.

काही शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे नुकसान भरपाईसाठी तातडीने प्रक्रिया करण्याची मागणी केली. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. राज्य सरकारकडून तातडीने मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही देतानाच शेतकऱ्यांना निराश न होण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजपाचे प्रदेश व स्थानिक पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0