डोंबिवली : प्रसिद्ध तबलावादक धनंजय पुराणिक व हार्मोनियम वादक विनोद पुराणिक यांचे वडील कै. विष्णुपंत काशिनाथ पुराणिक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त १८वर्षे संगीत संध्या आयोजित केली जात आहे. यावर्षी मात्र त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने तसेच योगायोगाने विद्वान आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व कै.विद्याधर गोखले यांच्याही जन्मशताब्दी वर्षानिमित्त ९ एप्रिल रोजी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात 'नांदीरंग' हा त्यांच्या नाटकांतील नांदी व नाट्यगीते यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे हा अधिकच रंगतदार झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत शाकुंतल नाटकातील पंचतुंड नररुंड व नंतर संगीत सौभद्र,संगीत शारदा, मानापमान विद्याहरण, स्वयंवर, संशयकल्लोळ तसेच मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या संगीत कान्होपात्रा नाटकातील व विद्याधर गोखले यांच्या मदनाची मंजिरी व जय जय गौरीशंकर या नाटकातील नांदी सौ शुभदा व श्रीकांत दादरकर यांच्या 'कै.विद्याधर गोखले संगीत-नाट्य प्रतिष्ठान'च्या ठाणे शाखेच्या पदवीप्राप्त कलाकारांनी गायल्या. या बहुरंगी व वेगळ्या धाटणीच्या सुरेल नांद्यां बरोबर काही नाट्यगीतांचे एकल गायन ही सादर झाले.
१९६० नंतर विद्याधर गोखले व पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत नाटकांना वेगळा आयाम दिला. कुलवधू, कट्यार काळजात घुसली, धाडिला राम तिने का वनी तसेच इतर नाटकांतील वद जाऊ कुणाला, स्वकर शपथ, मनरमणा, ऋतुराज आज, लेवू कशी वल्कला, जय गंगे भागीरथी, लागी करेजवा,प्रियकरा नसे ही नाट्य पदे गौरी फडके, भगवंत कुलकर्णी, अभिजीत कासखेडीकर, अनुजा वर्तक, आसावरी पुराणिक, प्राची जोशी, अनुराधा केळकर, अश्विनी जोशी यांनी अतिशय सुंदर रितीने सादर केली. मानसी मराठे, शर्वरी गोखले, स्मृति काणे, भाग्यश्री पर्वतीकर, सायली काजरोळकर, अश्विनी पुरोहित, आकांक्षा आठवले, सीमा गोडबोले यांनी गायलेल्या नांद्यांनी तर रसिक प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता दीक्षित यांनी केले. मार्गदर्शन अपर्णा हेगडे यांचे होते. या कार्यक्रमाला धनंजय पुराणिक यांनी तबल्याची तर विनोद पुराणिक यांनी ऑर्गन ची साथ दिली.या कार्यक्रमास विदुषी शुभदा पावगी व श्रीकांत पावगी, डॉ. सुनील भालेराव, डॉ. चिन्मय पतकी तसेच हेरंब म्युझिकल फाउंडेशनचे रवि पोंक्षे हे मान्यवर उपस्थित होते.
अतिशय सुरेल अशा नांदी व नाट्य गीतांचा हा अनमोल सांस्कृतिक ठेवा जतन करणे व पुढच्या पिढीपर्यंत त्याचा प्रचार व प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अखिल भारतीय कीर्तन संस्थेत तबला व हार्मोनियम वादक म्हणून पूर्ण हयात घालवलेल्या कै. विष्णुपंत पुराणिकांना त्यांचे स्नेही कै.विद्याधर गोखले यांच्या नाटकातील गीतांतून खऱ्या अर्थाने स्वरसुमनांजली वाहिली गेली.