प्रोजेक्ट टायगरची 50 वर्षं...

    10-Apr-2023
Total Views |


50 yrs of Project tiger
‘प्रोजेक्ट टायगर’ने पन्नाशी गाठली. जगातील 70 टक्के वाघ भारतात आहेत हे प्रोजेक्ट टायगरचे यश आहे. जाणून घेऊया त्याविषयी...
यशाची शिखरं गाठणारा भारत हळूहळू जगाच्या नकाशावर स्वतःच अस्तित्व मिळवायला सज्ज आहे, त्याच बरोबर भारतातील निसर्गप्रेमी समाज त्याची नैसर्गिक समृद्धी राखायला झटतोय. 140 कोटींहून अधिक लोकसंख्या असून, भारताने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वन्यजीवांचे मूळ निवासस्थान वाचवण्यात यश मिळवले आहे. गेल्या आठवड्यात आपण ’प्रोजेक्ट टायगर’चा सुवर्ण महोत्सव साजरा केला, आणि कालच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते ’ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2022’ चा ताजा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. 2022च्या अहवालानुसार, भारतात अंदाजे 3,167 वाघांचे अस्तित्व आहे. जगभरातील 90 टक्के वाघ भारतात आढळतात, म्हणजेच भारत हा वाघांचा बालेकिल्ला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

‘प्रोजेक्ट टायगर’ नक्की काय आहे आणि कशासाठी स्थापन झालं? एकेकाळी भारतात वाघांची संख्या 20,000 हून अधिक असल्याचा अंदाज असून 1970 मध्ये असं माहिती झाले की त्यांची संख्या दोन हजारहुन कमी झालेली आहे, त्यामुळे तातडीने प्रोजेक्ट टायगर ची स्थापना केली गेली. 1973 मध्ये जेव्हा ‘प्रोजेक्ट टायगर’ची स्थापना झाली, त्यावेळी भारतातील पहिले नऊ व्याघ्र प्रकल्प स्थापन केले गेले. त्यापैकी मानस (आसाम), पालामाऊ (झारखंड), सिमलीपाल (ओडिशा), कॉर्बेट (उत्तराखंड), रणथंबोर (राजस्थान), कान्हा (मध्य प्रदेश), मेळघाट (महाराष्ट्र), बांदीपूर (कर्नाटक) आणि सुंदरबन (पश्चिम बंगाल) हे त्याचा भाग होते. आताच्या घडीला भारतामध्ये 53 व्याघ्र प्रकल्प आहेत जे 75 हजार चौरस किलोमीटरहून अधिक वाघांसाठी क्षेत्र राखून ठेवतात. गेल्या 50 वर्षांत ‘प्रोजेक्ट टायगर’ने बरेच उतार-चढाव, यश-अपयश आणि घोटाळ्यांना साक्ष दिली.

वाघ हा मोठा सस्तन प्राणी आहे, ज्याला त्याच्या अस्तित्वासाठी मोठ्या लॅण्डस्केपची आवश्यकता असते. वाघांसारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन सतत फिरणे असते, स्वतःचा टेरिटरीचा विस्तार आणि त्यांचे संरक्षण करतात, अन्न आणि जोडीदार शोधतात. अशाप्रकारे, वाघ माणसाने नेमून दिलेल्या संरक्षित क्षेत्रामधून बाहेर पडतात आणि लगतच्या ग्रामीण भागात शिरतात. ग्रामीण भागात फिरण्याचे वाघाला काही फायदेदेखील असतात, उदाहरणार्थ- जंगलात हरणाची शिकार करायची असल्यास वाघाला हळूवारपणे लपत हरणाच्या जवळ जाव लागतं, हरणाला वाघाची जराशी चाहूल लागताच ते पळ काढते. अशावेळी वाघाचा शिकारीचा ’रेट ऑफ सक्सेस’ फार कमी होतो. याऐवजी गावात एखादी गाय किंवा वासराची शिकार करणं त्याला सोपं जात अशा कारणामुळे वाघ बर्‍याचदा मानवी वस्तीकडे आकर्षित होतात. जंगली वाघाचे कोणाच दारात नुसते दर्शन झाले, तरी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते आणि जेव्हा वाघ गुरेढोरे किंवा प्रिय व्यक्तीची शिकार करतो, तेव्हा त्याचा परिणाम मानव-वन्यजीव संघर्षात होतो. परिणामी, दोन्ही बाजूंच्या मालमत्तेचे आणि जीविताचे नुकसान होते. वाघांसह अनेक वन्यप्राणी संरक्षित क्षेत्राबाहेरील जागा व्यापत असल्याचे निदर्शनास येते. मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण ठेवून संकटग्रस्त वन्यजीवांचे रक्षण कसे करावे, हा प्रश्न पर्यावरणप्रेमी, धोरणनिर्मात्यांना आणि मंत्र्यांना पडतो.


50 yrs of Project tiger
वाघसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास, गेल्या 50 वर्षांत त्यांच्या संख्येत वाढ असली, तरी केवळ संख्येने प्रकल्पाच्या सर्वांगीण प्रगतीची मोजमाप करता येत नाही. वर सांगितल्याप्रमाणे, वाघांना त्यांच्या अस्तित्वासाठी मोठ्या अधिवासाची आवश्यकता असते. वाघांना जगण्यास योग्य क्षेत्रे ओळखून त्यांना कायदेशीर संरक्षण देणे ही बाब प्राधान्याने करायला हवी. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानाची गुणवत्ता तपासणे सर्वोपरी आहे. विशेषत: पूर्वेकडील प्रदेशात वाघांच्या अनेक अधिवासांमध्ये जंगली भक्ष्यांचे प्रमाण कमी आहे, ज्यामुळे त्या प्रदेशातील विद्यमान वाघांच्या लोकसंख्येवर परिणाम झालाय. भारतातील विविध वाघांच्या भूदृश्यांमध्ये शिकार वाढवण्याचे कार्यक्रम सुरू करावे लागतील. महाराष्ट्राच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकतेच चितळच्या रूपातील जंगली भक्ष्य सोडण्यात आले. मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेली गावे संरक्षित क्षेत्राबाहेर हलवावी लागतील. संरक्षित क्षेत्रातील लोकांना बाहेर हलवणं महत्त्वाचं आहे. कारण, त्यांचा जंगलातील स्थानामुळे अनेक विकासात्मक उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पातून गावांना बाहेर हलवण्यात आले आहे. त्यांचे पुनर्वसन जवळपासच्या गावांमध्ये केला गेलाय. वाघांपासून संघर्ष कमी करण्याचा एक मोठा भाग आहे. दाट संख्या असलेल्या वाघांच्या प्रदेशातून त्यांची संख्या कमी असलेल्या भागात स्थलांतरित करणे. हा उपक्रम अजूनतरी भारतात राबवला जात नाही. ताडोबासारख्या व्याघ्र प्रकल्पात, जिथे वाघामुळे संघर्षाची प्रचंड प्रकरणे समोर येतात, तिकडचे काही वाघ सह्याद्री सारख्या ठिकाणी स्थलांतरित करावे जिथे वाघांची संख्या जवळपास पाच ते सहा आहे. याविषयावर संशोधकांनी अजून अभ्यास करणं गरजेचे आहे. भारतातील सध्याची परिस्थिती ’वाघ विरुद्ध मानव’ अशी आहे, ज्यामुळे व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तडजोड होऊ शकते.

शेवटी, भारतातील व्याघ्र संवर्धन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यासाठी सरकार आणि जनतेकडून सतत प्रयत्न आणि समर्पण आवश्यक आहे. भारताने आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत, जसे की, व्याघ्र अभयारण्य निर्माण करणे, शिकारीविरोधात कायदे लागू करणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये लोकसमुदायाच्या सहभागास प्रोत्साहन देणे. तथापि, भारतातील वाघांचे सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. व्याघ्र संवर्धनाच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये स्थानिक समुदायांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. एकत्र काम करून, आपण हे सुनिश्चित करू शकतो की, भारतातील वाघ त्यांच्या नैसर्गिक अधिवासात भरभराटीला येतील आणि येणार्‍या पिढ्यांसाठी देशाच्या समृद्ध जैवविविधतेचा अविभाज्य भाग राहतील.


भारतातील व्याघ्र संख्येचा आलेख
वर्ष व्याघ्र संख्या
2006 - 1411
2010 - 1706
2014 - 2226
2018 - 2967
2022 - 3167


पेंचला ‘टीएक्स2 पुरस्कार’
भारतातील पेंच ‘टायगर रिझर्व्ह’ने वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ करणार्‍या यशस्वी संवर्धन प्रयत्नांची दखल घेत व्याघ्र संवर्धनाचा ‘टीएक्स2 पुरस्कार’ मिळवला. ’रिझर्व्ह’ने शिकारविरोधी गस्त, अधिवास पुनर्संचयित करणे आणि सामुदायिक सहभाग यासारख्या उपाययोजना अंमलात आणल्या. परिणामी, वाघांच्या संख्येत 53 टक्के वाढ झाली, ज्यामुळे ते वाघांच्या संवर्धनासाठी एक आदर्श ठिकाण झाले. 

सारिस्का’तील सावळागोंधळ
2005 मध्ये भारताच्या सारिस्का व्याघ्र प्रकल्पातील अयशस्वी वाघ संवर्धन प्रकरणाची घटना समोर आली, जिथे सर्व वाघांची शिकार करण्यात आली आणि ते नामशेष झाले. या घटनेतून अपुरे व्यवस्थापन आणि संरक्षण उपाय अधोरेखित झाले, ज्यामुळे भारतभर आक्रोश झाला आणि उर्वरित वाघांची संख्या वाचवण्यासाठी तातडीची कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले. 

- ओंकार पाटील