नवी मुंबईत लोकसेवा आयोगाची नवी इमारत

01 Apr 2023 18:08:03
New Building of Public Service Commission in Navi Mumbai

मुंबई
: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोगाच्या नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी येथील नवीन सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते आज झाले.

यावेळी आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, सदस्य डॉ.प्रताप दिघावकर, डॉ.दिलिप पांढरपट्टे, सचिव डॉ.सुवर्णा खरात, सहसचिव सुनील अवताडे आदी उपस्थित होते.अध्यक्ष निंबाळकर यांनी अपर मुख्य सचिव गद्रे यांचे स्वागत केले.या नव्या इमारतीमुळे आयोगाच्या कामकाजाला आणखी गती येणार असल्याचे गद्रे यांनी यावेळी सांगितले. लोकसेवा आयोगाच्या वर्धापनदिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांना गद्रे यांनी शुभेच्छा दिल्या.

आयोगाचे नवीन कार्यालय त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सेक्टर ११, सरोवर विहार समोर, बेलापूर सीबीडी येथे स्थलांतरित होत आहे. हे कार्यालय भाडेतत्वावर घेण्यात आले असून या ११ मजली इमारतीतील ७ मजले आयोगाला देण्यात आले आहे. यामध्ये आयोगाचे अध्यक्ष, सदस्य यांच्या दालनासह मुलाखत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, मूल्यांकन कक्ष, हिरकणी कक्ष, परीक्षा विभाग, सरळसेवा विभाग, तपासणी विभाग अशी प्रत्येक विभागाला स्वतंत्र जागा या इमारतीमध्ये देण्यात आली आहे. आयोगाच्या स्वतंत्र कार्यालयाच्या इमारतीसाठी बेलापूर येथे जागा उपलब्ध झाली असून, स्वतःच्या जागेवरील बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.



 
Powered By Sangraha 9.0