मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर गृहविभागाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. गृहविभागाकडून या प्रकरणी एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली त्यांना ४ ददिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ४०० पेक्षा अधिक जणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या हिंसाचारानंतर शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील जनजीवन सुरळीत करण्यास प्रशासनाला यश आले आहे. या घटनेच्या तपासासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) घोषणा करण्यात आली आहे.
छ. संभाजीनगरच्या किराडपुरा भागात गुरुवारी रामनवमीच्या दिवशी दोन गटांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर हे वातावरण बिघडले आणि दोन गटांमध्ये झालेल्या हिंसेत सार्वजनिक मालमत्तेसह पोलिसांच्या गाड्या कट्टरतावाद्यांकडून जाळण्यात आल्या होत्या. पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शहरात निर्माण झालेली तणावाची स्थिती निवळण्यास मदत झाली असून शहराची स्थिती पूर्वपदावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. ,मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून घटना घडलेल्या राम मंदिर परिसरासह किराडपुरा भागात शीघ्र कृती दल व राज्य राखीव पोलीस दल व दंगल नियंत्रक वाहने तैनात करण्यात करण्यात आली होती.
या घटनेच्या तपासासाठी संभाजीनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी ८ तपास पथके तैनात करण्यात आली असून अटकेच्या कारवाईनंतर आरोपींवर योग्य त्या सर्व कायदेशीर कारवाया करण्यात येतील अशी माहिती संभाजीनगर पोलिसांकडून देण्यात आली आहे.