अंत:काळी सोडवणारा राम...

09 Mar 2023 14:37:21

ram 
 
लेखक - सुरेश जाखडी
 
आयुष्याच्या अखेरची वर्षे समाधानात जाणे, याहून अधिक भाग्य नाही. तेच समाधान नामस्मरणाने मृत्यूसमयी टिकवून ठेवता येते. ज्याला मरणसमयी रामनाम आठवेल, तो उद्धरून जातो, असे समर्थांना सांगायचे आहे. म्हणून स्वामी म्हणतात, ‘जिवां सोडवी राम हा अंत:काळी’ यासाठी रामनाम व रामाचे अनुसंधान साधण्याचा अभ्यास शक्यतो लवकर सुरू करून आयुष्यभर तो सांभाळल्यास राम अंत:काळी तुमची सुटका करेल.
 
थोरामोठ्यांचे उदाहरण समोर ठेवून त्यांचे अनुकरण करावे, ही सर्वसामान्य जनांची मानसिकता असते. हे ओळखून समर्थ, रामाचे ध्यान करणार्याच व रामाचे गुण गाणार्यार भगवान शंकरांचा उल्लेख मनाच्या श्लोकांतून करीत असतात. भगवान शंकराविषयी बहुजन समाजाच्या मनात अतीव आदराची भावना व श्रद्धा आहे. त्यामुळे बर्यानच ठिकाणी मनाच्या श्लोकांत निरंतर रामनाम घेणार्याम व रामाचे गुण गाणार्या् महादेवाचा संदर्भ आलेला दिसून येतो. मागील श्लोक क्र. 83 मध्ये स्वामींनी स्पष्ट केले आहे की, अत्यंत ज्ञानी सामर्थ्यवान आणि वैराग्यशील असलेले महादेवही सतत रामनाम घेत असतात. आता यापुढील श्लोकात आणखी एक पाऊल पुढे जाऊन स्वामींनी पंढरपूरच्या विठोबाचा उल्लेख प्रथमच मनाच्या श्लोकात केला आहे-
 
विठोनें शिरीं वाहिला देवराणा।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥
निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी।
जिवां सोडवी राम हा अंत:काळी॥
 
पंढरपूरचा विठोबा हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत. विठ्ठलाची भक्ती, उपासना करणार्या् वारकर्यां चा मोठा समुदाय महाराष्ट्रात आहे. ज्ञानेश्वरांपासून सर्वच मराठी संतांनी पंढरपूरच्या विठोबाचा महिमा गायला आहे. वास्तविकपणे पाहता विठ्ठलभक्ती करणारा वारकरी संप्रदाय आणि रामनामाचा आदर्श समोर ठेवणारा समर्थ संप्रदाय हे दोन्हीही भक्तीसंप्रदाय आहेत, तेव्हा त्यांच्या मूळ भूमिकेत फरक करता येत नाही. त्यांच्यात कुणी भेद करू नये. तथापि समर्थ संप्रदायाने रामाला आपले आराध्य दैवत मानले. रामदासस्वामी राम आणि विठ्ठल यांच्यात भेद करीत नाहीत. स्वामी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले तेव्हा तेथे त्यांना प्रत्यक्ष रामाने विठ्ठलाच्या मूर्तीत दर्शन दिले. परंतु, वीर, प्रतापी, विवेकी, कोदंडधारी रामाची उपासना स्वामींनी तत्कालीन परिस्थितीत योग्य वाटली. विठ्ठलाचे दर्शन घेताना त्यांना अंतिम सत्याची जाणीव लगेच होत असे. असे असले, तरी समर्थवाड्मयात पांडुरंगाचा विठोबाचा उल्लेख क्वचितच पाहायला मिळतो. मनाच्या श्लोकातील 84व्या श्लोकात तो आलेला आहे. 20 दशकी दासबोधाच्या 7,751 ओव्यांपैकी एका ओळीत पांडुरंगाचा उल्लेख मला आढळला. तो असा आहे-
 
धन्य धन्य पांडुरंग।
अखंड कथेचा होतो धिंग।
तानमाने रागरंग।
नाना प्रकारीं॥ (18.1.13)
 
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात अखंड कथाकीर्तने, भगवंताचे गुणगान चाललेले असते म्हणून स्वामींनी पांडुरंगाला आदरपूर्वक धन्यवाद दिले आहेत. तसेच प्रस्तुत श्लोक क्र. 84 मध्ये विठ्ठलाचा संदर्भ मोठ्या खुबीने दिला आहे. पांडुरंग हे वैष्णवाचे दैवत आहे. तथापि विठ्ठलमूर्तीच्या डोक्यावर शिवपिंड कोरलेली आहे. त्याचा उल्लेख प्रस्तुत श्लोकात स्वामी करतात. स्वामी म्हणतात, बहुजन समाजाचे प्रिय दैवत विठोबाने ज्या शिवाला आदराने मस्तकी धारण केले, त्या शिवाला रामनामाचा ध्यास लागलेला आहे. याहून आणखी कोणत्या प्रकारे रामनामाचे महत्त्व सांगावे? महाराष्ट्रात वैष्णव व शैव उपासक यांच्यात कधीही झगडे झाले नाहीत. समर्थांनी तर महाराष्ट्रातील सर्व प्रचलित दैवतांविषयी समन्वयाची भूमिका घेतली आहे. कोणत्याही दैवताच्या उपासनेत श्रेष्ठ-कनिष्ठ हा भाव असूच शकत नाही, असे स्वामी म्हणतात. कारण, अखेरीस त्या सार्यात उपासना एका मूळ देवाकडे तुम्हाला घेऊन जातील, अशी स्वामींची शिकवण होती. श्रीकृष्ण हा भगवंताचा पूर्णावतार मानला गेला आहे. पांडुरंग हे श्रीकृष्णाचे बालरूप असे मानले जाते. या विठ्ठलाने मोठ्या प्रेमादराने शिवाला आपल्या मस्तकी धारण केले आहे, म्हणजे अत्यंत महत्त्वाचे स्थान विठ्ठलाने महादेवाला दिले आहे. अशा या महादेवाला रामनामाचा ध्यास लागलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? भगवान शंकर मोठ्या अभिमानाने सांगतात की, रामनाम हे इतके चांगले आहे की, त्याची भगवंताच्या इतर सहस्रनामांबरोबर तुलना करता येत नाही किंवा एका रामनामाचे महत्त्व इतर सहस्रनामाच्या तुलनेत अधिक आहे. हे भगवान शंकर मोठ्या प्रेमाने प्रिय पार्वतीला सांगत असल्याचा उल्लेख रामरक्षा स्तोत्रात पाहायला मिळतो.
 
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥
 
रामनामाचे सामर्थ्य असे की, शंकर रामानामाने विषबाधेपासून मुक्त झाले. समर्थ या श्लोकात म्हणतात, ’निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी’ म्हणजे रामनामाबाबत शिवाचा हा स्वानुभव आहे. तेव्हा स्वामी पुढे सांगतात की, ”लोकहो, शंकरासारखा तपस्वीसुद्घा रामनामाने शांत झाला, हे रामनाम तुम्हाला आयुष्याच्या शेवटी, अंत:काळ आला असता, जीवाला सोडवणारे आहे. या जीवाची अंत:काळाची स्थिती कशी असते, याचा अनुभव सांगण्यासाठी कोणी जीव मृत्यूनंतर परत आलेला नाही किंवा जीवाच्या अंत:काळाचा अनुभव कोणी लिहून ठेवलेला नाही. तथापि ती स्थिती कल्पनेने अथवा तर्काने जाणता येते. आयुष्यभर अनेक उलाढाली करणारे मन अनेक प्रापंचिक विचारांनी व अतृप्त वासनांनी भरलेले असते. त्यामुळे अंत:काळी ते स्थिर राहाणे कठीण आहे. या अत्यंत कठीण परिस्थितीतून फक्त रामच तुम्हाला सोडवू शकतो. जीव आपले भूतलावरील अस्तित्व सोडायला तयार नसतो. कारण, तो अनेक भावनांत, वासनांत अडकलेला असतो. अशावेळी नि:स्पृह रामाची आठवण राहिली, तर तो दयाघन राम निश्चितपणे या जीवाला जन्ममरणाच्या फेर्यां तून सोडवील असे स्वामी सांगतात. त्यासाठी आयुष्यभर रामनामाचा अभ्यास हवा, तरच ते अंत:काळी आठवेल, अन्यथा वासनांच्या फेर्याात ते प्रपंचात भटकत ठेवील. अंत:काळी राम या जीवाला सोडवणार आहे. यावर दृढ विश्वास ठेवून माणसाने धडधाकट, निकोप असताना नामस्मरणाच्या रूपाने रामाचे अनुसंधान कायम ठेवून तयाला अंत:करणात साठवून ठेवावा. कारण, तो अंत:काळी सोडवणारा आहे. जो आयुष्यभर नामस्मरणाचा अभ्यास करतो. त्यामुळे मन अंत:काळी स्थिर समाधानी असते. आयुष्याच्या अखेरची वर्षे समाधानात जाणे, याहून अधिक भाग्य नाही. तेच समाधान नामस्मरणाने मृत्यूसमयी टिकवून ठेवता येते. ज्याला मरणसमयी रामनाम आठवेल, तो उद्धरून जातो, असे समर्थांना सांगायचे आहे. म्हणून स्वामी म्हणतात, ‘जिवां सोडवी राम हा अंत:काळी’ यासाठी रामनाम व रामाचे अनुसंधान साधण्याचा अभ्यास शक्यतो लवकर सुरू करून आयुष्यभर तो सांभाळल्यास राम अंत:काळी तुमची सुटका करेल. हाच विचार चालू ठेवून स्वामींनी पुढील श्लोकात तो पुन्हा सांगितला आहे.
 
 
7738778322
 
 
Powered By Sangraha 9.0